नवी मुंबईत भोंदूबाबांची जोडगोळी जेरबंद; २४ तासांत दोन आरोपींना अटक  (संग्रहित फोटो)
नवी मुंबई

नवी मुंबईत भोंदूबाबांची जोडगोळी जेरबंद; २४ तासांत दोन आरोपींना अटक

नवी मुंबईत काळी जादू आणि अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबईत काळी जादू आणि अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा, सागर शिंदे उर्फ एकलहरी बाबा असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तींची नावे आहेत.

या प्रकरणातील पीडित महिलेवर वारंवार संकटे येत होती.त्या नैराश्यातून ती नेमकी एकलहरी बाबा आणि त्याचा गुरु टनटन बाबा यांच्या संपर्कात आली. दोघांनी मिळून तुझ्यावर कोणीतरी जादुटोणा, करणी केली असल्याचे भासवले. तसेच स्वतःला ‘बाबा’ म्हणून ओळख देणाऱ्या या आरोपींनी तिच्यावर काळी जादू झाल्याचा बनाव केला. त्यावर उपाय म्हणून विविध पूजा व विधी करण्याचे सांगून आरोपींनी तिच्याकडून मोठी रक्कम उकळली.

महिलेने रोख रक्कम तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण सुमारे १ लाख ९० हजार रुपये आरोपींना दिल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला.या कारवाईत अर्जुन भरत चव्हाण (२९) उर्फ टनटन बाबा , सागर शिवाजी शिंदे उर्फ ‘एकलहरी बाबा’ (२४) या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत एकच तक्रार

या बाबत अधिक माहिती देताना परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींचे वय कमी असले तरी ते बोलण्यात गुंगवून ठेवतात. आपल्याकडे त्यांच्या विरोधात एकच तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र त्यांनी भोंदूगिरी करत अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. याबाबत चौकशी सुरु आहे. या भोंदू बाबाने कोणाची फसवणूक केली असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन ही पोलीस उपायुक्त काळे यांनी केले आहे.

Mumbai : कचरा टाकणाऱ्या ठिकाणी CCTVची नजर; बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे सक्त निर्देश

राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे; किडनी रुग्णांना दिलासा

केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय

AIचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार; राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर, ५ वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे