Navi Mumbai International Airport : पहिल्या वर्धापनदिनापूर्वीच ४१ लाख प्रवाशांचा टप्पा; अवघ्या ११ महिन्यांत ३१ हजार विमानांची ये-जा; नऊ नव्या देशांतर्गत मार्गांचा समावेश 
नवी मुंबई

पहिल्या वर्धापनदिनापूर्वीच ४१ लाख प्रवाशांचा टप्पा; अवघ्या ११ महिन्यांत ३१ हजार विमानांची ये-जा; नऊ नव्या देशांतर्गत मार्गांचा समावेश

Navi Mumbai International Airport : व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या ११ महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४१ लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या या विमानतळावर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण ४१ लाख १ हजार ४०९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या ११ महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४१ लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या या विमानतळावर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण ४१ लाख १ हजार ४०९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. पहिल्या वर्धापनदिनापूर्वीच मिळालेले हे यश मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

विमानतळाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४० लाख ८८ हजार ८४० देशांतर्गत, तर १२ हजार ५६९ आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये २० लाख २३ हजार २४१ आगमन करणारे, तर २० लाख ७८ हजार १६८ प्रस्थान करणारे प्रवासी आहेत.

या कालावधीत ३१ हजार ४३ विमानांची ये-जा झाली असून, त्यात ३० हजार ९४० देशांतर्गत आणि १०३ आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. याशिवाय सामान्य विमान वाहतुकीच्या १ हजार ९२ हालचालींची नोंद झाली आहे.

विमान वाहतुकीमध्ये इंडिगो आघाडीवर असून, कंपनीच्या २४ हजार ७७७ विमानांची ये-जा झाली आहे. त्याखालोखाल अकासा एअरची ३ हजार १२५, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ हजार ९५५, फ्लाय ९१ ची १३२ आणि स्टार एअरची ५४ विमानांची वाहतूक झाली आहे.

पहिल्या वर्षपूर्तीपूर्वीच ४१ लाख प्रवाशांचा टप्पा गाठणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पूर्ण क्षमता विकसित झाल्यानंतर वर्षाला नऊ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

मालवाहतुकीतही आंतरराष्ट्रीय विस्तार

प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीतही विमानतळाने चांगली कामगिरी केली आहे. १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ४० हजार ८६८ मेट्रिक टन मालाची हाताळणी करण्यात आली. यामध्ये ९ हजार २१६ टन देशांतर्गत, तर ३१ हजार ६५२ टन आंतरराष्ट्रीय मालाचा समावेश आहे. १८ मालवाहतूक विमान कंपन्यांच्या माध्यमातून ॲमस्टरडॅम, फ्रँकफर्ट, हाँगकाँग, सिंगापूर, बाकू आणि अदिस अबाबासह २४ आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी मालवाहतुकीची जोडणी निर्माण झाली आहे.

जेद्दाहसाठी १५ डिसेंबरपासून थेट सेवा

हिवाळी वेळापत्रकानुसार विमानतळाची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. देशांतर्गत ४५, तर आंतरराष्ट्रीय दोन ठिकाणांशी विमानसेवा उपलब्ध होणार आहे. अगत्ती, बागडोगरा, दरभंगा, गुवाहाटी, जळगाव, जोधपूर, रांची, सिंधुदुर्ग आणि उदयपूर या नऊ नव्या देशांतर्गत मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. अगत्तीसाठी गोवा-मोपामार्गे विमानसेवा उपलब्ध होणार आहे.जुलै २०२६ मध्ये अबुधाबी विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता १५ डिसेंबरपासून सौदी अरेबियातील जेद्दाहसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक कारणांसाठी सौदी अरेबियात जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात घोंघावतेय जलसंकट! पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट

वेळ हीच मुख्य अट मानून करार रद्द करता येत नाही; ४२ वर्षांच्या लढ्यात मूळ भाडेकरूच्या वारसदारांना दिलासा

Kurla Couple Assault Case : उद्यानाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष आक्रमक

अध्यक्ष, सदस्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द; महाधिवक्त्यांचे मत घ्या; ग्राहक पंचायतची मागणी

Mumbai : पर्यटक बस सेवेला मुदतवाढ; इलेक्ट्रिक बसच्या वापराला प्रोत्साहन