मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या जून महिन्यात होईल, अशी माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी दिली. यापूर्वी या विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी करण्याचे घोषित केले होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला गौतम अदानी यांनी रविवारी भेट देऊन त्याची पाहणी केली. या भेटीची माहिती त्यांनी ‘एक्स’वर टाकली आहे. ते म्हणाले की, "भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची भविष्यातील एक झलक! आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. एक जागतिक दर्जाचे विमानतळ आकार घेत आहे. या जूनमध्ये उद्घाटनासाठी ते तयार असेल. भारतासाठी ही एक खरी भेट असेल. अदानी एअरपोर्टची टीम व भागीदार स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत करत आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळ आहे. तो अपुरा पडत असल्याने आणखीन एका विमानतळाची उभारणी नवी मुंबईत करण्यात आली. नवी मुंबई विमानतळ हा दोन कंपन्यांच्या भागीदारीतून बनवण्यात आला आहे. या विमानतळ कंपनीत अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे ७४ टक्के, तर सिडकोचे २६ टक्के समभाग आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन केले होते. या विमानतळासाठी १६,७०० कोटी रुपये खर्च झाला आहे. मुंबई विमानतळावरील ताण कमी करायला हा नवीन विमानतळ बांधला आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी सांगितले की, १७ एप्रिल २०२५ पासून या विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची आमची तयारी आहे. स्थानिक उड्डाणे मेपासून, तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे जुलैच्या अखेरीपासून सुरू होतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन धावपट्ट्या असून चार टर्मिनल आहेत. हा पाच टप्प्यांचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ९ कोटी असणार आहे.