नवी मुंबई : नवी मुंबईच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्या आणि गुंतागुंतीच्या कायदा-सुव्यवस्था परिस्थितीचा विचार करून राज्य शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेला मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत नव्या बेलापूर परिमंडळाची निर्मिती होणार असून, आता आयुक्तालयात तीन पोलीस उपायुक्त परिमंडळे वाशी, बेलापूर आणि पनवेल कार्यरत राहणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) गृह विभागाने जारी केला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९ नोव्हेंबर १९९४ रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला येथे आठ पोलीस ठाण्यांचा समावेश होता. पुढे १५ जून २००६ रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचीही भर घालण्यात आली. वाशी व पनवेल परिमंडळाचे उपायुक्त कायम ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्वात क्रीम पोस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी पोलीस आयुक्तांनी अद्याप कोणाची नियुक्ती न केल्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी म्हणून सध्या नवी मुंबई व नवी मुंबई बाहेरील पोलीस उपायुक्तांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यासाठी अनेक उपायुक्त दोन दिवसापासून गृह विभागात जोडे झिजवत आहेत.
अशी असणार परिमंडळाची पुनर्रचना
परिमंडळ-१ वाशीमधील पोलीस स्टेशनची संख्या आता ७ करण्यात आली आहे. यात रबाळे विभाग सहाय्यक पोलीस आयुक्तांची वाढ होणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली रबाळे, रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे या ३ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी यांच्या अधिपत्याखाली वाशी, एपीएमसी, तुर्भे आणि सानपाडा या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. नवे परिमंडळ-२ बेलापूर मधील पोलीस स्टेशनची संख्या ८ करण्यात आली आहे. बेलापूर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली सीबीडी, एनआरआय, नेरूळ व प्रस्तावित विमानतळ या ४ पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर पोर्ट विभागाच्या अधिपत्याखाली उलवा, न्हावाशेवा, उरण आणि मोरा सागरी या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. परिमंडळ-३ मधील पोलीस स्टेशनची संख्या ७ होणार असून यात खारघर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भर पडणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली खारघर, कळंबोली, कामोठे आणि तळोजा या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे, तर पनवेल विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर या ३ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे.
३८.१८ लाख रुपये खर्चास मंजुरी
बेलापूर परिमंडळ स्थापनेनंतर परिमंडळ-१ : वाशी, परिमंडळ-२ : बेलापूर (नवे), परिमंडळ-३ : पनवेल अशा तीन स्वतंत्र उपायुक्त परिमंडळांची रचना करण्यात आली आहे. नव्या परिमंडळासाठी पोलीस उपायुक्त (१) व सहाय्यक पोलीस आयुक्त (२) अशी तीन पदे नव्याने निर्माण करण्यात आली असून, यासाठी शासनाने ३८.१८ लाख रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. हा खर्च मंजूर अनुदानातून केला जाणार आहे.
बेलापूर परिमंडळ उपायुक्तपदी अमित काळे
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत नव्याने तिसरे (बेलापूर) परिमंडळ स्थापन करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांची नव्याने स्थापन झालेल्या बेलापूर (२) परिमंडळाचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन परिमंडळ स्थापित झाल्याने आणखीन दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची नवी मुंबईत नियुक्ती होणार आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच
नवी मुंबई विमानतळ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज असल्याने पोलीस आयुक्तालयाने विमानतळ पोलीस स्टेशन देखील प्रस्तावित केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे पोलीस स्टेशन देखील कार्यान्वित होणार असल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.