नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘सफाई अपनाओ - बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत असून नागरिकांचा उत्साही सहभाग सर्वच उपक्रमांमध्ये लाभताना दिसत आहे. नवी मुंबईत पोलीस - पालिका आणि नागरिक यांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
एक अभिनव स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने तृतीयपंथी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून वाशी विभागात राबविण्यात आला. या अंतर्गत वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ यांच्या नियंत्रणाखाली लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समित यांच्या मार्गदर्शनानुसार तृतीयपंथी नागरिकांनी सेक्टर-९ वाशी येथील फळ व भाजी मार्केटमध्ये जाऊन स्वच्छताविषयक जनजागृतीपर पत्रकांचे वाटप केले. यावेळी व्यावसायिकांना कचरा वेगवेगळा ठेवण्याचे महत्त्व सांगितले व भाजी व फळांचा कचरा योग्य ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनाही प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह धरावा, असेही व्यावसायिकांना सूचित करण्यात आले.
काही तृतीयपंथी नागरिकांनी सेक्टर-९ व १६ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नलला थांबणाऱ्या वाहनांच्या मालक, चालकांमध्ये कचरा वर्गीकरण तसेच एकल वापर प्लास्टिक बंदी या विषयी हातात ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ’ अभियानाचे फलक दाखवित जनजागृती केली.
वाशी विभागात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत प्लास्टिकचा वापर आढळलेल्या व्यावसायिकाकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून उपद्रव करणाऱ्या ३ व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला.
कोपरखैरणे विभागातील एमआयडीसी परिसरात सहा.आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने एकल वापर प्लास्टिक आढळल्याने भास्कर डेअरी यांच्याकडून दंडात्मक वसुली केली.