Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे रेल्वे उड्डाणपूल जीर्ण आणि धोकादायक झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे रेल्वे उड्डाणपूल जीर्ण आणि धोकादायक झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ठाण्याकडून तुर्भेमार्गे वाशी आणि मुंबईकडे जाणारा उड्डाणपुलावरील मार्ग २५ नोव्हेंबरपासून ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था दुरुस्तीपलीकडे गेल्याने त्याचे विघटन करून नव्याने बांधकाम करणे आवश्यक असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, मे. एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून पुनर्बांधणी केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ३१ मार्च २०२७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संबंधित मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

वाहतूक पोलिसांचे आवाहन

ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या, जड आणि अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वाहनचालकांनी सायन-पनवेल महामार्गावरून पुढे जाऊन शिरवणे पूल किंवा एलपी पुलाखालून उजवे वळण घ्यावे. त्यानंतर पनवेल-सायन मार्गावरील जुईनगर-तुर्भे उड्डाणपुलामार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास करावा. पुलाच्या पुनर्बांधणीच्या काळात वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान; टाटा ट्रस्टची मुंबई उच्च न्यायालयात धाव