कोविडच्या सर्व्हेचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामटयाने खांदा कॉलनीत राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला पनवेलच्या मिरची गल्ली परिसरात नेऊन त्याच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या भामटयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव केशर शशिकांत सोनवणे (१९) असे असून तो खांदा कॉलनी परिसरात राहण्यास आहे. केशर हा टीवायबीएसीचे शिक्षण घेत असून सुट्टी असल्याने तो सध्या घरीच आहे. २ जून रोजी केशर खांदा कॉलनी ट्रायसिटी बिल्डिंग परिसरात मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकलवरून गेला असताना, एका भामटयाने त्याला कोविड सर्व्हे करण्यासाठी काही मुलांची गरज असल्याचे सांगून त्याला व त्याच्या मित्रांना आमीष दाखविले. त्यामुळे केशरने त्याच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर सदर भामट्याने घरून फाईल घेऊन येण्याच्या बहाण्याने केशरच्या मोटारसायकलवरून त्याला मिरची गल्लीत नेले. त्याठिकाणी त्याने केशरला एका बिल्डींगमध्ये नेऊन गळ्यातील सोन्याची चैन काढून खिशात ठेवण्यास सांगितले. केशरने यास नकार दिल्यानंतर त्याला बोलण्यात गुंतवून भामट्याने त्याच्या गळ्यातील चैन काढून घेतली. त्यानंतर सदर भामटयाने त्याला त्याच ठिकाणी बसवून पलायन केले. केशर बराच वेळ वाट पाहत बसला मात्र, भामटा त्याठिकाणी आला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे केशरच्या लक्षात आल्यानंतर त्याने कामोठे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.