ग्राहक मंच
अभय दातार
आर्थिक व्यवहारांबाबत आजही म्हणावी तशी साक्षरता नाही आहे. उच्चशिक्षित मंडळीही अनेकदा आर्थिक फसवणुकीला बळी पडत असतात. योग्य ती माहिती असेल तर या प्रकारांना आळा घालता येतो. फसवणूक जशी टाळता येते त्याचप्रमाणे आपले आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करता येतात. जो पैसा आपण कष्टाने मिळवलेला आहे तो अधिकाधिक योग्य पद्धतीने गुंतविणे गरजेचे आहे.
रोजचे वर्तमानपत्र उघडले की कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या फसवणुकीची बातमी आढळतेच. आपल्याला प्रश्न पडतो की इतके लोक एखाद्या भीतीला किंवा मोहाला कसे बळी पडतात? फसवणूक हा काही नवीन प्रकार नाही, तर तो पूर्वापार चालत आला आहे. फक्त कालानुरूप त्याचे प्रकार बदलले. जसजसे अत्याधुनिक तंत्रज्ञान रोजच्या वापरात येऊ लागले, तसतसे हे प्रकार वाढत चालले आहेत. बँका, विमा, म्युच्युअल फंड अशा विविध आर्थिक क्षेत्रातही फसवणूक होऊ लागली आहे. याला कारणे जरी अनेक असली, तरी एक सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपले अपुरे आर्थिक ज्ञान; वर पुन्हा त्यातल्या खाचाखोचा समजून घेण्याची अनिच्छा. (सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत.) मग प्रश्न पडतो की या विषयी अधिक ज्ञान कोठून मिळवावे? यावरील अगदी सोपा उपाय म्हणजे रोजच्या वर्तमानपत्रातील आर्थिक क्षेत्रासंबंधी असलेली पुरवणी नीट वाचणे. त्यातील मजकुराचे योग्य आकलन करून घेणे. बँकिंग क्षेत्राचा विचार केला, तर बँकांची बँक असलेल्या भारतीय रिझर्व बँकेने जनतेमध्ये या क्षेत्रातील साध्या साध्या गोष्टींबद्दल जागृती व्हावी म्हणून भरपूर माहिती आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. आजच्या लेखात आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
रिझर्व बँकेचे https://www.rbi.org.in/commonperson/English/Scripts/FAQs.aspx?SID=32 हे संकेतस्थळ आहे. यावर क्लिक केले की Financial Education अर्थात आर्थिक शिक्षण असा एक पर्याय दिसतो. या अंतर्गत अनेक विषयांवर माहिती दिलेली आहे. काही ठिकाणी व्हिडीओ सुद्धा आहेत. ही माहिती इंग्रजी आणि हिंदीबरोबरच काही प्रमाणात भारतीय भाषांमध्येही दिली आहे; आणि पहिलाच विषय आहे, ‘आरबीआय कहेता है’. चला तर, पाहूया रिझर्व बँक काय सांगतेय ते. अर्थातच आपल्या सोयीसाठी हे सगळे मराठीत जाणून घेणार आहोत. मात्र तुम्हीही या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि स्वत: प्रयत्न करून सगळे समजून घ्यावे.
आरबीआय म्हणते, ‘जाणकार व्हा, सावध राहा.’ यात तब्बल बत्तीस विषय असून त्या त्या विषयावर प्रत्येकी एक छोटेखानी व्हिडीओ आहे. इतकेच नव्हे, तर जोडीला सोप्या शब्दात माहितीही दिली आहे. आपण जो विषय निवडू त्यावर क्लिक केले की व्हिडीओ आणि माहिती आपल्यासमोर उलगडते. शिवाय समजायला अधिक सोपे जावे म्हणून वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरेही आहेत. आवश्यक तिथे आरबीआयची परिपत्रकेही आहेत. हे विषय असे आहेत –
प्राथमिक बचत खाते – हे असे एक खाते आहे ज्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही इतर काही मर्यादित लाभ उपलब्ध आहेत. तुमचे नुकसान कसे कमी करता येईल याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या फसवणुकीद्वारे सायबर गुन्हेगार आपल्या बचतीवर डल्ला मारतात. त्यामुळे होणारे आपले नुकसान कसे टाळता येईल, ते कसे कमी करता येईल, ते इथे सांगितले आहे.
सोयीचे बँकिंग – प्रत्यक्ष बँकेत न जाता बँकेचे व्यवहार कसे करता येतात ते सर्वांनी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी जाणून घ्यावे. वरिष्ठ नागरिकांसाठी सोयीचे बँकिंग उपलब्ध आहे. काही सेवा घरबसल्या मिळतात. त्या कोणत्या, तसेच इतर काय सोयी आहेत ते यात सांगितले आहे. दावा न केल्या गेलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवींचा दावा कसा करावा ते समजून घ्या. व्यवहार नसल्यामुळे बंद पडलेले खाते परत कसे चालू करावे याबद्दलही माहिती जाणून घ्या.
वेगवेगळ्या नोटांविषयी जाणून घ्या - नोट खरी आहे की खोटी ते कसे ओळखावे ते यात सांगितले आहे. खराब / फाटक्या नोटा कशा प्रकारे बदलून घेता येतात त्याची माहिती घ्या. एकाच किमतीची परंतु वेगळे नक्षीकाम असलेली नाणी एकाच वेळी चलनात असू शकतात. त्यावरून अनेकदा अफवा पसरवल्या जातात. अशा वेळी काय करावे ते वाचा. दृष्टीदोष असलेल्यांसाठी खास सोयी आहेत. कोणतीही नोट हाताळताना ती किती रुपयांची आहे, खरी आहे की खोटी आहे ते ओळखण्यासाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.
धोका आणि परतावा - या दोन बाबींचा परस्परसंबंध यात उलगडून दाखवण्यात आला आहे. अवाजवी परतावा खूप धोकादायक असू शकतो. त्यामुळे हे समजून घ्यावे. फसव्या ईमेल, फोन कॉल, SMS – याद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण चिंताजनक आहे. काय करू नये, काय करावे, याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
बँकिंग लोकपाल – आपली बँक योग्य सेवा देत नसेल किंवा बँकेतील आपल्या व्यवहारांबद्दल आपली काही तक्रार असेल, तर आपण आरबीआयच्या बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता. याविषयीचे मार्गदर्शन घ्या.
डिजिटल बँकिंगची सुरक्षा – आपण जे ऑनलाईन व्यवहार करतो, त्यावेळी काय काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते नीट समजून घ्या.
वारस नेमणे आणि दावा दाखल करणे – बँकेतील आपली बचत खाती, मुदत ठेवी इत्यादींसाठी वारस (नॉमिनी) नेमणे का आवश्यक आहे आणि त्यामुळे ठेवीदाराच्या मृत्युनंतर दावा दाखल करणे कसे सोपे जाते ते यात विशद करून सांगितले आहे.
(पूर्वार्ध)
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com