संपादकीय

भाजप आणि अजित पवारः विचारधारेतील भिन्नतेची ठिणगी?

हिंदुत्ववादी विचाराशी संबंधित काही प्रकाशनांनी अनेक महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना बरोबर घेण्याची खरंच आवश्यकता होती का? याबद्दलचे लेख प्रसिद्ध केले होते.

नवशक्ती Web Desk

काउंटर पॉइंट

- रोहित चंदावरकर

हिंदुत्ववादी विचाराशी संबंधित काही प्रकाशनांनी अनेक महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना बरोबर घेण्याची खरंच आवश्यकता होती का? याबद्दलचे लेख प्रसिद्ध केले होते. तेव्हापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील कार्यकर्ते, नेते या सर्वांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेण्याबद्दल कशी अस्वस्थता आहे, त्याचे दर्शन होऊ लागले. आता तर अजित पवार आणि भाजप यांच्यामधील वैचारिक संघर्ष टोकाला जातो की काय? अशी परिस्थिती आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नवाब मलिक यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरुन माध्यमांमध्ये आणि विविध पक्षांमध्ये वादविवाद सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर सरळ जाहीरच केले की, नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असले तरीही भाजप त्यांच्या मतदारसंघात त्यांचा अजिबात प्रचार करणार नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक अधिकृत पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी असे सांगितले होते की, नवाब मलिक यांना पक्षात कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे पद दिले जाऊ नये, कारण त्यांच्याविरुद्ध काही गंभीर आरोप आहेत आणि त्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांना महायुतीत सहभागी करून घेऊ इच्छित नाही. त्यानंतरही नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विधानसभेतील बाकांवर अधिवेशनादरम्यान बसल्याचे सर्वांना दिसले.

या विषयाबद्दल आतापर्यंत फार विचारविनिमय झाला नाही किंवा मीडियामध्ये हा विषय फार दिसला नाही, याचे मुख्य कारण आत्तापर्यंत निवडणुकीचे वातावरण फार तापलेले नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. आता प्रत्येकच पक्ष आपण जितक्या जागा लढवू त्यातील प्रत्येक जागा आपल्याला कशी मिळेल याबद्दल जागरूक होत आहे. वातावरण अत्यंत स्पर्धात्मक झाले आहे.

या परिस्थितीत अजित पवारही त्यांना ज्या ५३ जागा मिळाल्या आहेत त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या पाहिजेत, यासाठी दक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षालाही आपण लढवत असलेल्या १४८ जागांपैकी सर्वाधिक जागा आपण निवडून आणल्या पाहिजेत, असे वाटत आहे. या स्पर्धेतूनच नवाब मलिक किंवा झिशान सिद्दीकी किंवा सना मलिक असे मुंबईतले तीन उमेदवार निवडून येणे हे अजित पवार यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे ते सरळ सरळ भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वावादी विचारसरणीपासून थेट फारकत घेताना दिसत आहेत. गेल्या काही आठवड्यांत अजित पवार यांच्या बारामतीमध्ये किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या प्रचारा सभा झाल्या, त्यातील अनेक सभांमध्ये अजित पवार असे बोलताना दिसले की, "मित्रांनो, आपण आपली विचारसरणी सोडलेली नाही, राजकारणात आल्यापासून आपण महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीचाच अवलंब करत आहोत. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आपण पुढे चालणार आहोत."

थोडक्यात अजित पवार यांना ही जाणीव आहे की, त्यांच्या मतदारांपैकी बहुसंख्य मतदार है काँग्रेसच्या विचारसरणीतून आलेले आणि राष्ट्रवादीचे मतदार बनलेले म्हणजेच एका अथनि सेक्युलर विचारांचे किंवा पुरोगामी विचाराचे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवार खुलेआम भारतीय जनता पक्षाच्या बाजूला गेल्यामुळे या मतदारांकडून त्यांना पुरेसे मतदान झाले नाही. विशेषतः मुस्लीम मतदारांकडून अजित पवार यांना अजिबात मतदान झाले नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा स्ट्राइक रेट हा इतर कोणत्याही पक्षापेक्षा कमी राहिला आणि त्यांच्यासाठी ती धोक्याची घंटा समजली जाते. अशा परिस्थितीत आता मुस्लीम मतदार, दलित मतदार किंवा अन्य विचारसरणीचे मतदार आपल्याबरोबर आले पाहिजेत, ही अजित पवार यांची तीव्र इच्छा उघडपणे दिसते आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुंबईतील तीनही जागा मुस्लीमबहुल मतदारसंघातल्या घेतल्या आहेत आणि ते तीनही उमेदवार राज्यातील अन्य विभागातील उमेदवारांप्रमाणेच निवडून आले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी कशी असणार आहे किंवा विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये त्यांना मिळणाऱ्या मतातला फरक किती कमी असणार आहे, याची जाणीव भारतीय जनता पक्षाला अगदी पक्की आहे. त्यामुळे आपल्या वाट्याची एकही जागा हरता कामा नये, याची काळजी घेतानाच प्रत्येक ठिकाणी केवळ विकासाचे मुद्दे नव्हे, तर जातीय ध्रुवीकरण आणि हिंदुत्व है विषयही राजकीयदृष्ट्या कसे कामी येतील याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होणार आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या एका गटाने गेल्या काही आठवड्यांपासून हार्डकोअर हिंदुत्व लाईन घेतली आहे. पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व शक्तिमान नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही भागांमध्ये 'व्होट जिहाद' झाला, असे शब्द वापरणे हा या रणनीतीचाच भाग होता. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत 'हिंदुत्व' हा मुद्दाही लावून धरण्याचे ठरवले आहे.

अशा परिस्थितीत अजित पवार यांनी वारंवार फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीलाच आपण प्राधान्य देणार, असे माणणे आणि तेही जाहीर सभांमध्ये माणणे यावरून अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये वैचारिक मतभेदाची सुरुवात होत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे एकदा मतदान झाले आणि निकाल आले की, अजित पवार यांना किती जागा मिळाल्या आहेत या गोष्टीची तपासणी करून त्यांना महायुतीमध्ये कायम ठेवायचे की नाही, याचा निर्णय भारतीय जनता पक्ष घेईल, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हे मतभेद टोकाला जाऊन अजित पवार आणि भाजप वेगळे होतात का? याचे उत्तर निकाल आल्यावर मिळेल.

पण राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून झालेला बाद हे केवळ हिमनगाचे टोक आहे, हे मात्र नक्की. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक बांची पाठराखण करत त्यांना राष्ट्रवादी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी घोषणा केली. यातील स्वारस्याचा एक भाग असा की, ज्या प्रकारचे आरोप नवाब मलिक यांच्या जमीन व्यवहारांबद्दल झाले, त्याच्याशी साधर्म्य असलेले आरोप हे प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील मालमत्तेसंदर्भात सुद्धा झाले आणि त्यातून त्यांची प्रवर्तन निर्देशलयाने चौकशी सुरू करुन त्यांची मालमत्ता जप्त केली होती. पण त्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. त्यांना राज्यसभेवर घेताना महायुतीतील मतभेद वगैरे काही दिसले नाहीत. प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावरील केसेस, तसेच नवाब मलिक यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावरील केसेस, यामध्ये फार मोठा फरक नाही. पण भारतीय जनता पक्षाने प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत फारसे आक्षेप घेतले नाहीत आणि नवाब मलिक यांच्या बाबतीत मात्र अगदी पत्र लिहून वगैरे आक्षेप घेतले आहेत. हे असे का, याबद्दलची उत्तरे राजकीय निरीक्षकांना माहीत आहेत. पण तो आत्ताचा चर्चचा विषय नाही म्हणून त्यावर फारसा वादविवाद माध्यमांमध्ये होताना दिसत नाही.

या सगळ्या घडामोडींवरुन हे स्पष्टपणे दिसते आहे की, अजित पवार यांच्यासाठी हा निकराचा लढा आहे. त्यांच्यासाठी केवळ मुंबईतील नव्हे, तर राज्यातील सर्व भागातील अल्पसंख्यांक समाजाची मते महत्त्वाची आहेत. भारतीय जनता पक्षाला मात्र असे वाटत आहे की, प्रचारामध्ये हार्डकोर हिंदुत्वाचा मुद्दा असला पाहिजे. त्यावरच ते अनेक भागांमध्ये प्रचार करणार आहेत. यातून भाजप आणि अजित पवार यांच्यातील वादविवाद कुठपर्यंत जातो आणि भाजप यावर मतदान झाल्यानंतर काय निर्णय घेतो, हे अंतिमतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतात त्यावरच ठरणार आहे. सध्या तरी भाजप आणि अजित पवार यांच्यातील विवाद हा धगधगता आहे आणि त्याचा 'विस्फोट' कधीही होऊ शकतो!

लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

ठाण्यात महायुतीतील उमेदवारांचे टेन्शन वाढले?घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रचाराला मारली दांडी

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत