देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
मोठ्या संख्येने रोबोट तयार करण्यामागे चीनचा केवळ उत्पादन विक्रीचा हेतू नसू शकतो. अधिक रोबोट म्हणजे अधिक प्रयोग; अधिक प्रयोग म्हणजे अधिक डेटा; अधिक डेटा म्हणजे अधिक सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता.
माणसासारखा दिसणारा, दोन पायांवर चालणारा, हातांनी वस्तू उचलणारा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णय घेणारा रोबोट पाहिला की भविष्यातील जग आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. कारखान्यात काम करणारे रोबोट, घरातील कामे करणारे रोबोट, वृद्धांना मदत करणारे यंत्रमानव आणि माणसाच्या नोकऱ्या हिरावून घेणारी यंत्रे - या सगळ्या कल्पना आता विज्ञानकथेपुरत्या राहिलेल्या नाहीत. विशेषतः चीनने ह्युमनॉइड रोबोटच्या क्षेत्रात घेतलेली झेप जगाचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, माणसासारखा दिसणारा रोबोट माणसासारखा विचारही करू शकतो का? उत्तर सध्या तरी नाही असे स्पष्ट आहे.
चीनमध्ये ह्युमनॉइड रोबोटस क्षेत्रात १५०हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. २०२५ मध्ये जगभरात सुमारे २० हजार ह्युमनॉइड रोबोट पाठवले गेले. त्यापैकी तब्बल ९५ टक्के चीनमध्ये तयार झाले. २०२६ मध्ये चीन एक लाखांहून अधिक ह्युमनॉइड रोबोट तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आकडे मोठे आहेत; पण प्रत्यक्ष वापर आणि व्यावसायिक व्यवहार्यता याबाबतचे चित्र मात्र तेवढे आश्वासक नाही. यातून चीनच्या महत्त्वाकांक्षेचे कौतुक करायचे की या तंत्रज्ञानामागील आर्थिक फुगवट्याबद्दल सावध व्हायचे, हा प्रश्न उभा राहतो.
ह्युमनॉइड रोबोटचे प्रात्यक्षिक पाहताना सर्वप्रथम लक्ष वेधले जाते ते त्याच्या हालचालींकडे. रोबोट नाचतो, धावतो, बॉक्सिंग करतो, कुंग फूच्या हालचाली करतो किंवा अवघड कसरती करतो. सोशल मीडियावर अशा व्हिडिओंना मोठी लोकप्रियता मिळते. मात्र उद्योगासाठी या कौशल्यांचे महत्त्व मर्यादित आहे. कारखान्याच्या व्यवस्थापकाला रोबोट नाचतो की नाही यापेक्षा तो दिवसभर एकच काम सातत्याने, अचूकतेने आणि कमी खर्चात करू शकतो का, हा प्रश्न महत्त्वाचा असतो. याच ठिकाणी ह्युमनॉइड रोबोटची खरी परीक्षा सुरू होते.
चीनमधील प्रशिक्षण केंद्रात शंभरहून अधिक रोबोट्सना खोकी वर्गीकृत करणे, नूडल्सचे पॅकेजिंग करणे किंवा कॉफी बनविणे यांसारखी साधी कामे शिकवावी लागत आहेत. माणसासाठी सहज असलेली कृती मशीनसाठी किती गुंतागुंतीची आहे, हे यातून दिसते.
टेबलवरचा ग्लास उचलताना किती दाब द्यायचा? तो ग्लास अपेक्षेपेक्षा जड असेल तर पकड कशी बदलायची? समोरचा माणूस अचानक बाजूला झाला तर शरीराचा तोल कसा सांभाळायचा? जमिनीवर एखादी वस्तू पडली तर तिच्यावर पाय न ठेवता मार्ग कसा बदलायचा? माणूस ही कामे विचार करून नव्हे, तर अनुभवातून जवळपास सहज करतो. रोबोटला मात्र प्रत्येक हालचालीमागे डेटा, सेन्सर आणि संगणकीय प्रक्रिया लागते. यंत्राला चालता येणे सोपे होत आहे; पण परिस्थिती समजून घेणे अजूनही कठीण आहे.
ह्युमनॉइड रोबोटसमोरील सर्वांत मोठ्या तांत्रिक अडचणींपैकी एक म्हणजे हातांची अचूकता—‘डेक्स्टेरिटी’. मोठी हालचाल करणे सोपे आहे. रोबोटिक्समधील खरी लढाई शेवटच्या दहा सेंटीमीटरची, शेवटच्या एका सेंटीमीटरची आणि अखेरीस शेवटच्या एका मिलिमीटरची आहे. माणसाची हुबेहुब नक्कल करणे आणि माणसाच्या क्षमतेची पुनरावृत्ती करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
गेल्या महिन्यात चीनच्या तियांगोंग अल्ट्रा या ह्युमनॉइड रोबोटने १०० मीटर अंतर ८.६४ सेकंदांत पूर्ण केले. हा वेग उसैन बोल्टच्या ९.५८ सेकंदांच्या विक्रमापेक्षा अधिक आहे. तसे पाहता हा मानवापेक्षा मशीन श्रेष्ठ असल्याचा पुरावा वाटू शकतो. पण धावताना रोबोट अडथळ्यावर धडकला. म्हणजे तो वेगाने धावू शकला; पण योग्य वेळी थांबू किंवा दिशा बदलू शकला नाही. माणसापेक्षा वेगवान असणे म्हणजे माणसापेक्षा बुद्धिमान असणे नव्हे. योग्य वेळी थांबता येणे हीदेखील बुद्धिमत्ताच आहे. एका अहवालानुसार २०२६च्या पहिल्या सहामाहीत चीनमधील केंद्र आणि स्थानिक सरकारांनी ह्युमनॉइड रोबोट व संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी किमान २३० दशलक्ष डॉलर खर्च केले. वर्षभरापूर्वी हा खर्च सुमारे ६२ दशलक्ष डॉलर होता. ग्राहक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते या तिन्ही भूमिका सरकार बजावत असेल, तर बाजारातील खरी मागणी किती आहे हे मोजणे कठीण होते.
माणसासाठी तयार केलेल्या वातावरणात माणसासारखा रोबोट वापरणे हा त्याचा एक मोठा फायदा मानला जातो. पण जर एखाद्या कारखान्यात विशिष्ट कामासाठी आधीपासूनच स्वस्त आणि अधिक कार्यक्षम औद्योगिक रोबोट उपलब्ध असेल, तर त्याच कामासाठी दोन पायांचा, दोन हातांचा आणि अधिक गुंतागुंतीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा ह्युमनॉइड का तयार करायचा? याच कारणामुळे ह्युमनॉइड रोबोटची खरी बाजारपेठ विशिष्ट क्षेत्रांत असू शकते—धोकादायक कामे, गोदामे, आपत्ती व्यवस्थापन, वृद्धांची मदत, घरगुती सेवा किंवा अशा ठिकाणी जिथे वातावरण वारंवार बदलते. म्हणजेच भविष्यात प्रत्येक कामासाठी ह्युमनॉइड रोबोट आवश्यक असेलच असे नाही.
ह्युमनॉइड रोबोट अजून मोठ्या प्रमाणावर मानवी रोजगाराची जागा घेण्याच्या स्थितीत नाहीत. काही प्रशिक्षण केंद्रांमध्ये त्यांची कार्यक्षमता मानवी कामगिरीच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे दिसते. मात्र यावरून भविष्यातील धोका नाकारता येणार नाही. संगणकाच्या सुरुवातीच्या काळात त्याची क्षमता मर्यादित होती. मोबाईल फोन कधीकाळी अवजड आणि महाग होते. इंटरनेट अत्यंत संथ होते. तंत्रज्ञानाने वेळ घेतला, पण समाज बदलला. त्यामुळे ‘आज रोबोट अपयशी आहेत’ याचा अर्थ ‘ते उद्याही अपयशीच राहतील’ असा नाही.
जर रोबोट स्वस्त झाले, त्यांच्या हालचाली अधिक अचूक झाल्या, त्यांना मोठ्या प्रमाणावर वास्तविक जगातील प्रशिक्षण डेटा मिळाला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक सक्षम झाली, तर रोजगाराच्या बाजारपेठेवर परिणाम होणे अपरिहार्य ठरू शकते. म्हणून प्रश्न रोबोट नोकरी घेईल का, हा नसून रोबोटच्या आगमनानंतर माणसाकडे कोणती कौशल्ये उरतील आणि कोणती नवी कौशल्ये निर्माण होतील, हा आहे.
आजचा रोबोट जर अपयशी ठरला तरी त्यातून मिळालेला डेटा उद्याच्या रोबोटला अधिक हुशार करू शकतो. हीच या शर्यतीची खरी ताकद आहे. भारताकडे मोठे तरुण मनुष्यबळ आहे आणि त्यामुळे रोजगारनिर्मितीची गरज चीनपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ह्युमनॉइड रोबोट्सना अंधानुकरणाने स्वीकारणे किंवा रोजगाराच्या भीतीने त्यांना नाकारणे, दोन्ही टोकाची भूमिका ठरेल. भारताने रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर तंत्रज्ञान, अँक्च्युएटर्स, बॅटरी, चिप्स आणि उत्पादनक्षमता यांची एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, खाणकाम, अंतराळ संशोधन, धोकादायक औद्योगिक कामे आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत भारतासाठी ह्युमनॉइड तंत्रज्ञानाची विशेष उपयुक्तता निर्माण होऊ शकते.
माणसाची कल्पनाशक्ती, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक संदर्भ समजून घेण्याची क्षमता, नैतिक निर्णय आणि अनिश्चित परिस्थितीत विवेकाने वागण्याची क्षमता अजूनही वेगळी आहे. मशीनकडे वेग, सातत्य, अचूकता आणि थकवा न येण्याची ताकद आहे. म्हणून भविष्यातील खरी दिशा संघर्षाची नसून सहकार्याची असू शकते. चीनच्या ह्युमनॉइड रोबोटचीि्य खिल्ली उडवणे जितके चुकीचे आहे, तितकेच त्याला उद्याचा सर्वशक्तिमान कामगार समजणेही चुकीचे आहे. आजची मर्यादा उद्याची क्षमता बनू शकते. म्हणून चीनच्या रोबोट क्रांतीकडे भीतीने नव्हे, तर चिकित्सक नजरेने पाहायला हवे. कारण या शर्यतीत अंतिम विजय सर्वांत चांगली तंत्रज्ञान-परिसंस्था, सर्वांत मोठा डेटा, सर्वांत सक्षम मनुष्यबळ आणि सर्वांत योग्य आर्थिक उपयोग निर्माण करणाऱ्याचा असेल. उद्याच्या जगात कदाचित रोबोट माणसाची जागा घेणार नाही. पण रोबोटसोबत काम करायला शिकलेला माणूस, रोबोटसोबत काम करायला न शिकलेल्या माणसाची जागा नक्कीच घेऊ शकतो.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.