मत आमचेही
केशव उपाध्ये
डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळ वायू दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. युनियन कार्बाइडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडर्सन यांना अटक करण्यासाठी गेलेल्यांना दिल्लीतून रोखण्यात आले. दिल्लीहून अँडरसन मायदेशी परतले. हाच काँग्रेसचा ताठ कणा.
युपीआय व्यवहारांसाठी सामान्य ग्राहकांकडून नव्हे तर व्यापाऱ्यांकडून नाममात्र कर वसूल करण्याच्या मुद्द्यावरून ‘दिमागी नक्षली’ टोळीचे सरदार राहुल गांधी पुठ्ठयाची तलवार घेऊन पुन्हा मैदानात आले आहेत. ‘हा कर रद्द करा, अमेरिकेसमोर झुकू नका, ताठ कणा दाखवा,’ अशी शाब्दिक फुलबाजी राहुल गांधींनी केली आहे. राजकारणात सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाने विरोध करणे अभिप्रेतच आहे. संसदीय लोकशाहीचा हाच आत्मा आहे. मात्र विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या नेत्याला पक्षाला तारतम्य नसेल, राजकीय आकलनशक्ती नसेल तर तो नेता आक्रस्ताळा बनून आपले हसे कसे करून घेतो याचे राहुल गांधी हे उत्तम उदाहरण आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करून प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळविण्याचा राहुल गांधी सातत्याने प्रयत्न करीत असतात. युपीआय व्यवहारांवर एमडीआर शुल्क लावण्याच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधींनी सवयीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी ताठ कणा दाखवावा, अमेरिकेसमोर झुकू नये आणि हे शुल्क रद्द करावे, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले आहे. आपण आक्रमक विरोधी नेते आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींना त्यासाठी बिनबुडाची वक्तव्ये करण्याची सवय लागली आहे. असे बोलल्यामुळे राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयापुढे माफी मागावी लागली आहे, तरीही त्यांची बेताल बडबड करण्याची सवय काही सुटत नाही. राफेल लढाऊ विमाने खरेदी मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत अवमानास्पद भाषा वापरली होती. कोणतेही पुरावे नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याबद्दल राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयापुढे नाक घासत माफी मागावी लागली होती.
युपीआय वरील शुल्काचे निमित्त करून राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे खोटी नाटी माहिती पसरवून जनतेच्या मनात संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सरकारने ताठ कणा दाखवावा वगैरे वगैरे बाष्कळ बडबड करताना आपण २००४ ते २०१४ या काळात कितींदा ताठ कणा दाखवला , आपल्या पिताश्रींनी, आज्जीने कसा ताठ कणा दाखवत अमेरिकेपुढे, पाकिस्तानपुढे शरणागती पत्करली होती याचे इतिहासातील अनेक पुरावे राहुल गांधींना दाखवावे लागतील. अर्थात या पुरव्यांकडे राहुल गांधी सवयीप्रमाणे दुर्लक्ष करतील आणि आपली झूठ की गुंज सुरु करतील यात काही शंका नाही. २००४ ते २०१४ या काळात डॉ . मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेत असताना राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे सरकारचा रिमोट कंट्रोल होता. या दहा वर्षांत देशात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी थैमान घातले होते. पाकिस्तानी दहशतवादी मनात येईल तेव्हा भारतात बॉम्बस्फोट करत होते. मनमोहन सरकार दहशतवाद्यांचा निषेध करण्याखेरीज काहीच करीत नव्हते. त्यामुळे पाकिस्तानने २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी पाठवून मुंबईवर हल्ला चढविला. मूठभर अतिरेक्यांनी त्यावेळी संपूर्ण देशाला वेठीस धरले होते. पाकिस्तानने एवढी मोठी आगळीक करूनही काँग्रेसच्या मनमोहन सरकारने त्याबद्दल निषेधाचे कागदी खलिते पाठ्वण्याखेरीज काहीही केले नाही. त्यावेळी राहुल गांधींना आपल्या मातोश्रींना, मनमोहन सिंग यांना ताठ कणा दाखवा आणि पाकिस्तानला धडा शिकवा, असे सांगण्याची हिम्मत दाखविता आली नव्हती. सप्टेंबर २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेदरम्यान त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपले पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींनी शरीफ यांचा निषेध करण्याचे धाडस दाखविले नव्हते. या आमसभेवेळी त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भेटल्यानंतर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या सहाय्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. मनमोहन सिंग यांचे वागणे एखाद्या गावंढळ महिलेसारखे आहे, असे नवाझ शरीफ त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळी राहुल गांधी , सोनिया गांधींनी मिठाची गुळणी धरली होती. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांच्या वक्तव्याचा कडक शब्दांत समाचार घेतला होता. राहुल गांधींचे पिताश्री राजीव गांधी पंतप्रधान असताना डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळ वायू दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हजारो सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो लोकांना कायमचे अपंगत्व आले. अनेकांची दृष्टी गेली. या वायू गळतीला कारणीभूत असलेल्या युनियन कार्बाइड या अमेरिकी कंपनीच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलीस अधिकारी युनियन कार्बाइडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडर्सन यांना अटक करण्यासाठी गेल्यावर त्यांना दिल्लीतून आदेश गेले. अँडर्सन यांना अटक करण्याऐवजी त्यांना विशेष विमानाने दिल्लीला पाठवले गेले. दिल्लीहून अँडरसन मायदेशी परतले. हजारो निरपराधांचे जीव घेणाऱ्या कंपनीचा सर्वेसर्वा बिनबोभाट सुटला. हाच काँग्रेसचा ताठ कणा. १९७१ च्या बांगला मुक्ती संग्रामानंतर पाकिस्तानचे ९३ हजार युद्ध कैदी सोडण्यासाठी अमेरिकेने दबाव आणला होता. आपले युद्धकैदी मायदेशी परत आणा, पाकव्याप्त काश्मीर परत घ्या मगच पाकचे युद्धकैदी सोडा, अशी मागणी जनसंघातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे ९३ हजार युद्धकैदी सोडून दिले. इतिहासात असे अनेक दाखले आहेत. हा इतिहास राहुल गांधींनी विसरू नये.
भाजप उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश