संपादकीय

करंट अफेअर्स अर्थात ताज्या भानगडी

मुकुंद परदेशी

करंट अफेअर्स हा जरी आता स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा एक विषय असला, तरी तो अगदी शालेय जीवनापासूनच आमच्या आवडीचा आणि सखोल अभ्यासाचा विषय होता. अर्थात तो काही आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता, अशा नावाचा एखादा विषय अभ्यासक्रमात असू शकतो याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती, पण त्यासाठीची उपजत आवड असल्यामुळे शाळेत असो की बाहेर असो आमचा 'करंट अफेअर्स' या विषयाचा अखंड आणि सखोल अभ्यास सुरूच असायचा. या एकाच रसाळ विषयाच्या अभ्यासात अधिक रुची घेतल्यामुळे आणि अधिक वेळ घालवल्यामुळे मग बाकीच्या निरर्थक आणि निरस विषयांच्या अभ्यासासाठी आम्हाला वेळही मिळत नसे आणि त्यात आमचे मनही लागत नसे. परिणामी, प्रत्येक इयत्तेत साधारणपणे दोन ते तीन वर्षे घालवल्यामुळे दहावीत जाईपर्यंत आम्ही शाळेत शिकविण्यासाठी नवीनच लागलेल्या काही गुरुजींपेक्षाही जास्त थोराड दिसू लागलो होतो. एवढ्या बालवयात या मंडळींना पोटापाण्यासाठी नोकरी करावी लागावी याचा आम्हाला विलक्षण खेद वाटत असे, पण सभ्यतेच्या मर्यादा पाळण्यासाठी आम्ही ते त्या गुरुजनांना कधीच बोलून दाखविले नाही. उलटपक्षी, 'एवढा मोठा घोडा झालास, पण अजून दहावी पास झाला नाहीस,' असं त्यांचं कुजकट बोलणं निमूटपणे ऐकून घेतलंं. असो.

तर काय सांगत होतो की, शाळेत असल्यापासूनच आमचा 'करंट अफेअर्स' या विषयाचा दांडगा अभ्यास होता. आठवीत असतानाच आमच्या पुढच्या बाकावर बसलेल्या दीपकने शेजारच्या बाकावर बसलेल्या शोभाला दिलेली चिठ्ठी आमच्या चाणाक्ष नजरेने अचूकपणे टिपली. पुढे आपल्या कुलदीपकाने लावलेले 'दिवे' त्याच्या बापाला कळू नये म्हणून आणि शोभाची तिच्या घरच्यांसमोर 'शोभा' होऊ नये म्हणून पुढचे जवळपास तीन महिने दररोज आम्ही त्या लैला-मजनू जोडीकडून रावळगावची चॉकलेट्स वसूल करीत होतो. दहावीचा शेवटचा पेपर संपला की, काळेंची कुमुद, तिमासेंच्या तुषार सोबत शाळेतूनच परस्पर पळून जाऊन आपल्या बापाच्या तोंडाला काळं फासणार आहेत, हा आमच्या 'करंट अफेअर्स'च्या अभ्यासातून निघालेला निष्कर्ष खरा ठरल्याच्या आनंदात, आम्ही दहावीत तिसऱ्यांदा नापास झाल्याचं दुःख कुठल्या कुठे विरून गेलं होतं! आमचे गणिताचे शिक्षक आणि भूगोलाच्या बाई लवकरच विवाहबद्ध होण्याच्या मार्गावर आहेत हे गुपित आम्ही वर्गातल्या सर्व मुलांना सांगितल्यामुळे वर्गातली मुलं त्या दोघांच्या तासाला फिदीफिदी हसत आणि त्यांचा मार खात असत! 'हसत करावे कर्म भोगावे मग रडत तेचि.' यालाच म्हणत असावेत का? असो.

तर काय सांगत होतो की, जे शाळेत तेच कॉलनीत! १२ नंबरच्या 'सदगुण'मध्ये राहणारे गुणे त्यांच्या ऑफिसमध्ये काय गुण उधळतात याची बित्तंबातमी आम्हालाच असे. ऑफिस सुटल्यावर गुणे आधी त्यांच्या शेजारच्या टेबलावर बसणाऱ्या शैला मॅडमला आपल्या स्कुटरवरून तिच्या घरी सोडतात आणि नंतर घरी येतात, ही बातमी आम्ही गुणे मावशींना दिल्यामुळेच त्यांनी गुणेंना त्यांच्या स्कुटरचं बंद पडलेलं स्पिडोमीटर दुरुस्त करायला लावून रोज मीटर रीडिंग घेणं सुरू केलं! रानड्यांचा आशिष 'बजरंग व्यायामशाळे'त जातो असं सांगून त्याच्या वर्गमत्रिणीला घेऊन बागेत जातो आणि व्यायामशाळेच्या फीच्या नावाने घेतलेल्या पैशातून तिला भेळ खाऊ घालतो, अशी 'निर्भेळ' बातमी आम्ही त्याच्या तीर्थरूपांना दिल्यानंतर 'आफ्टर कन्फरमेशन' त्यांनी त्याचा 'बजरंग' केला, पण आमच्या हेरगिरीचं मूल्य अवघे ५० रुपये केलं होतंं! हेही असो.

तर काय सांगत होतो की, दहावीपासूनच शाळेने आम्हाला टाकून दिलं, पण बालपणापासून घेतलेला 'करंट अफेअर्स' अर्थात ताज्या घडामोडींच्या अभ्यासाचा वसा काही आम्ही टाकला नाही. त्यामुळेच तर देशपांडेंच्या माहेरी आलेल्या लताला तिच्या नवऱ्याने टाकून दिली आहे, हे सगळ्यात आधी आमच्याच लक्षात आलं. आजही कॉलनीतली मंडळी ऑफिसला गेली की, आम्ही घरच्या मंडळीची नजर चुकवून आजूबाजूच्या घरांमध्ये, ' भाभीजी घरपर है' अशी प्रेमळ साद घालत (अर्थातच मराठीतून) घुसून त्यांच्या वर्तमानपत्रांवर कब्जा करून राजकारणातल्या 'करंट अफेअर्स'चा फडशा पाडत असतो. त्यातूनच मग काळे झालेले कपडे धुवून पांढरे शुभ्र करण्यासाठी जशी कपड्यांची लॉन्ड्री असते, तशीच काळा पैसा पांढरा करण्यासाठीसुद्धा एक लॉन्ड्री असते, जिच्यात टाकून कोटीच्या कोटी काळे रुपये पांढरे करता येतात आणि अशा या पद्धतीला 'मनी लॉन्ड्रींग' म्हणतात, अशी बहुमोल माहिती आम्हाला कळते.

सत्ताधारी पक्षात असताना असा प्रकार करणे हा 'अदखलपात्र गुन्हा' असतो, तर विरोधी पक्षात असताना असा प्रकार करणे हा 'दखलपात्र गुन्हा' असतो, हे ज्ञानही आम्हाला 'करंट अफेअर्स'च्या अभ्यासातूनच मिळाले आहे. 'ईडी' नावाने वावरणारी काही माणसं कोणत्याही 'सीडी'च्या धमकीला न घाबरता पुरातत्व विभागात कामाला असल्यागत खोदकाम करून 'गड़े मुर्दे' उकरून काढत असतात आणि 'उखाड़ लिया!' अशी पोकळ गर्जना करणाऱ्यांची अवस्था पळताभुई थोडी अशी करून सोडत असतात, हे कळण्यासाठी 'करंट अफेअर्स'चाच अभ्यास करावा लागतो! हेही असोच असो.

जाता जाता - यूपीएससीसाठी जर दहावी नापास हे कॉलिफिकेशन चाललं असतं, तर आमच्या 'करंट अफेअर्स'च्या अभ्यासाच्या जोरावर आम्ही त्या परीक्षेत नक्कीच देशात पहिले आलो असतो आणि सरकारनेही विरोधी पक्षांची कुलंगडी बाहेर काढण्यासाठी एखादं नवं खातं निर्माण करून आम्हाला त्याचं मुख्य सचिव करून टाकलं असतं! पुन्हा हेही असोच असो.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का