देवाभाऊंचा हा विरोध! धाडस की डावपेच? 
संपादकीय

देवाभाऊंचा हा विरोध! धाडस की डावपेच?

भाजपमध्ये कोणाचीही विकेट कधीही जाते. पण एक गोष्ट नक्की. मुख्यमंत्र्यांचा हा डाव राजकारण असेल, तर तो फार काळ टिकणार नाही, कारण सह्याद्री आणि मुंबईची जनता खेळाचे नियम ओळखते. तो खरोखर कायद्याचा आग्रह असेल, तर त्याला त्यांच्या विरोधकांचाही पाठिंबा मिळेल.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

भाजपमध्ये कोणाचीही विकेट कधीही जाते. पण एक गोष्ट नक्की. मुख्यमंत्र्यांचा हा डाव राजकारण असेल, तर तो फार काळ टिकणार नाही, कारण सह्याद्री आणि मुंबईची जनता खेळाचे नियम ओळखते. तो खरोखर कायद्याचा आग्रह असेल, तर त्याला त्यांच्या विरोधकांचाही पाठिंबा मिळेल.

एकाच आठवड्यात दोन घटना घडल्या आणि महाराष्ट्रात प्रश्न विचारला जाऊ लागला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक अदानींच्या विरोधात का उभे राहिले? ११ नोव्हेंबरला त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना पत्र लिहून मुंबईतील १४ आंतरराष्ट्रीय मार्ग नवी मुंबई विमानतळावर हलवण्याच्या योजनेला विरोध केला. आधी टर्मिनल १ बी उभारा, मग १ ए तिथे हलवा, मग जुने पाडा, असा त्यांचा प्रस्ताव आहे. त्यानंतर १३ नोव्हेंबरला तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पावर वनविभागाने काम थांबवण्याचा आदेश काढला. यातून फडणवीस या उद्योगपतीला अंगावर घेत आहेत का असा प्रश्न पडला अर्थात त्यांच्या साम्राज्याला त्यामुळे धक्का बसलेला नाही, पण कुछ तो गडबड है दया!!

विमानतळाच्या प्रकरणात वस्तुस्थिती अशी की मूळ प्रस्ताव त्या उद्योगपतीच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचा आहे, ज्यात त्या समूहाचा ७४ टक्के हिस्सा आहे. गल्फ एअर आणि सौदिया या कंपन्यांनीही विरोध केला. सौदियाने तर हज आणि उमराहच्या वेळापत्रकाचा मुद्दा मांडला, कारण गेल्या वर्षी सुमारे २६,००० यात्रेकरू मुंबईहून रवाना झाले होते. म्हणजे फडणवीसांचा विरोध प्रवासी, विमान कंपन्या आणि मुंबईकरांच्या सोयीच्या मुद्द्यावर आहे. तो त्या उद्योगपतीला अडवण्यासाठी आहे, असे मानण्याचे कारण नाही. शिवाय नवी मुंबई विमानतळात सिडकोमार्फत राज्य सरकारचाही २६ टक्के हिस्सा आहे. राज्याचा स्वतःचा आर्थिक हितसंबंध असलेल्या विमानतळाला झुकते माप देण्याऐवजी मुंबईच्या विमानतळाचा आग्रह धरला जात असेल, तर तो निर्णय कोणत्या तराजूत तोलला, हेही सांगितले पाहिजे. शेवटी निर्णय केंद्रातील मोदी सरकारचे नागरी उड्डाण मंत्रालय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांचे पत्र ही विनंती आहे, आदेश नाही.

तारळीचा मुद्दा अधिक गंभीर आहे. प्रकल्पाचा खर्च केंद्रीय पर्यावरण मंजुरीत ५,६७५ कोटी असताना प्रतिज्ञापत्रात तो ५६.७५ कोटी झाला आणि चार टक्क्यांनुसार भरावयाची २२७ कोटींची वन्यजीव रक्कम सुमारे २.२७ कोटींवर आली. कंपनीचा खुलासा असा की ५६.७५ कोटी हा केवळ सुरुवातीच्या टप्प्यातील, म्हणजे सर्वेक्षण आणि तपासणीसारख्या कामांचा खर्च होता आणि प्रकल्प कोयना अभयारण्यापासून ३.२ किलोमीटरवर खासगी, वनेतर जमिनीवर आहे. हा खुलासा खरा मानला तरी प्रश्न संपत नाहीत. वन्यजीव मंडळाच्या अटींनुसार रक्कम प्रकल्पाच्या एकूण खर्चावर आधारित असते, मग नोटरीकृत प्रतिज्ञापत्र देताना एकूण खर्च का दाखवला गेला नाही? मंजुरी आणि बांधकामासाठीची संमती एप्रिल २०२५ मध्ये मिळाली, तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. मग वनविभागाच्या शब्दांत 'प्रलंबित मंजुरी' असताना बांधकाम सुरू कसे झाले? वनविभागाने सुधारित खर्च स्वीकारला की नाही, याबाबतही त्यांच्याकडून परस्परविरोधी माहिती आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ६ नोव्हेंबरला प्राधान्याने चौकशीचे निर्देश दिले, हे विसरता येणार नाही. ही चौकशी रोहन भाटे या मानद वन्यजीव रक्षकाच्या तक्रारीमुळे सुरू झाली. फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे नाही.

वन्यजीव संरक्षण कायदा

कायदा या प्रकरणात स्पष्ट आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम २९ आणि ३५(६) नुसार अभयारण्यातील किंवा त्याच्या परिणामक्षेत्रातील कामांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ उल्लंघनाला शिक्षा देते. प्रतिज्ञापत्र खोटे ठरले तर भारतीय न्याय संहितेतील खोट्या पुराव्याच्या कलमांखाली कारवाई शक्य आहे. 'एम. सी. मेहता विरुद्ध कमलनाथ' (१९९७) मधील सार्वजनिक विश्वस्ताचे तत्त्व आणि 'वेल्लोर सिटिझन्स वेल्फेअर फोरम' (१९९६) मधील सावधगिरीचे तत्त्व सांगते की अनिश्चितता असेल तर लाभ जंगलाला मिळायला हवा, उद्योगाला नाही. नियमांचे पालन होत नसेल तर तीन दिवसांची नोटीस हे उत्तर नाही.

राजकारण काय म्हणतेय

'तो उद्योगपती अमित शहांच्या अधिक जवळ गेला म्हणून फडणवीस भिडत आहेत', 'फडणवीस अंबानींना खूश करण्यासाठी त्या उद्योगपतीला अंगावर घेत आहेत', अशा दोन चर्चा रंगल्या आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर दोन्हींना सध्या कोणताही पुरावा नाही. उद्योगपती आणि शहा दोघेही गुजरातचे आहेत, हे खरे. पण त्यावरून दिल्लीतील समीकरणे सिद्ध होत नाहीत. अंबानींचा सिद्धांत तर निव्वळ तर्क आहे आणि राजकारणातील तर्क पुराव्याशिवाय सत्य मानता येत नाहीत. फडणवीसांची प्रत्येक कृती मोजून-मापून आहे. विमानतळावर पत्र लिहून चेंडू केंद्राकडे टोलवला आहे. तारळीत वनविभागाच्या नावाने तीन दिवसांची नोटीस देऊन चर्चा घडवली आहे. जनतेचा रोष शांत करायचा आणि कोणाशीही कायमचे भांडण मांडायचे नाही, हा हिशेब या दोन्हीत दिसतो. त्यातच एक अडचण आहे. याच फडणवीसांनी २०२४ मध्ये धारावी पुनर्विकास हा 'सरकारी भागीदारीतून' होत असल्याचे सांगून त्या उद्योगपतीचे समर्थन केले होते. तळोजा येथील टॉवर सेमीकंडक्टरच्या १० अब्ज डॉलरच्या प्रकल्पाला त्यांच्याच उपस्थितीत मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला होता. ज्या मुख्यमंत्र्यांनी वर्षानुवर्षे मुंबई आणि महाराष्ट्राची मोक्याची जमीन आणि प्रकल्प त्या उद्योगपतीला दिले, ते अचानक 'नियमाचे पक्के' ठरतात, असे मानायचे असेल तर त्यांना तशी कृती सलगपणे सिद्ध करावी लागेल. जर देवाभाऊ खरोखर नियमांच्या बाजूने असतील, तर त्यांचे स्वागतच. पण ते स्वागत शब्दांनी नव्हे, तर कृतीने सिद्ध करावे लागेल. तारळीचे काम राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळेपर्यंत लेखी आदेशाने थांबवावे. ५,६७५ कोटी आणि ५६.७५ कोटी यातील तफावतीची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी. मूळ खर्चानुसार २२७ कोटी वसूल करावेत. वीज कंपनीच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी व्हावी आणि तक्रारदार रोहन भाटे यांना संरक्षण द्यावे. मुंबई विमानतळाच्या निर्णयात प्रवासी, हज यात्रेकरू आणि विमान कंपन्यांचे हित प्राधान्यावर ठेवून सर्व कागदपत्रे जनतेसमोर ठेवावीत. या कसोट्या सरकारने पार केल्या, तर त्या उद्योगपतीशी वैर आहे की नाही, हा प्रश्न गौण ठरेल.

भाजपमध्ये कोणाचीही विकेट कधीही जाते

भाजपमध्ये कोणाचीही विकेट कधीही जाते. पण एक गोष्ट नक्की. मुख्यमंत्र्यांचा हा डाव राजकारण असेल, तर तो फार काळ टिकणार नाही, कारण सह्याद्री आणि मुंबईची जनता खेळाचे नियम ओळखते. तो खरोखर कायद्याचा आग्रह असेल, तर त्याला त्यांच्या विरोधकांचाही पाठिंबा मिळेल. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांचा 'अदानी-विरोध' नको, कायद्याचे राज्य हवे आहे आणि कायद्याचे राज्य ठरवते की सत्तेचा झुकाव कोणाकडेही असो, सह्याद्रीच्या छातीवर नियम वाकवता येणार नाहीत.

प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

आजचे राशिभविष्य, २५ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू