संपादकीय

पौरोहित्याची नवी भाषा, नवा वेश

काळाच्या ओघात पौरोहित्य या व्यवसायावर अनेक प्रश्नचिन्ह लावली जात आहेत. काही आधुनिकतेच्या प्रभावातून येतात, तर काही जातीव्यवस्था आधारित असतात.

Swapnil S

- स्वाती पेशवे

खास बात

काळाच्या ओघात पौरोहित्य या व्यवसायावर अनेक प्रश्नचिन्ह लावली जात आहेत. काही आधुनिकतेच्या प्रभावातून येतात, तर काही जातीव्यवस्था आधारित असतात. काळानुरूप अनेक पारंपरिक व्यवसायांमध्ये बदल होत आहेत. काही पारंपरिक व्यवसाय नष्ट होत आहेत, तर काही व्यवसाय नवे रूप धारण करत आहेत. हे असेच पौरोहित्याच्या व्यवसायातही होणे आवश्यक आहे. प्रसिद्ध पुरोहित सुमित ढेरे यांच्या उदाहरणावरून हे प्रकर्षाने जाणवत आहे. उत्तम कारकीर्द, उत्तम अर्थार्जन ही आजची यशाची सरधोपट व्याख्या झाली आहे. त्यातही विशिष्ट शाखांमधील शिक्षण, विशिष्ट क्षेत्रांमध्ये व्यवसाय अथवा नोकरी आणि पाच आकडी पगार म्हणजे आयुष्य स्थिरस्थावर होणे, असे मानले जाते. अशा मुला-मुलींच्या प्रापंचिक आयुष्याची गाडीही वेळेवर मार्गस्थ होताना दिसते. मात्र या झापडबंद संकल्पनेतून बाहेर पडून कारकीर्दीच्या दुर्लक्षित राहिलेल्या वा जाणीवपूर्वक दुर्लक्षित होत असणाऱ्या पर्यायांकडेही सजगतेने पाहण्याची गरज आता जाणवू लागली आहे.

पौरोहित्य हे असेच एक कार्यक्षेत्र आहे. घरात या कामाची परंपरा असली, तसे संस्कार असले आणि पोषक वातावरण असले तरी अनेकजण हे काम करणे नाकारतात. काहीही झाले तरी मी ‘भिक्षुकी’ करणार नाही, असे त्यांचे म्हणणे असते. मात्र पौरोहित्य हे अत्यंत प्रतिष्ठेचे काम आहे. तसेच आजही हे काम करणाऱ्यांना मान-प्रतिष्ठा आहे, यात शंका नाही. खरे सांगायचे तर हे काम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका एखाद्या समुपदेशकासारखीच असते. पुरोहिताने अडचणीत असणाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. या धारणेतून केवळ अर्थार्जनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीनेही या कार्यक्षेत्राची निवड केली जाते. हेच सत्य ओळखून घरातील ही परंपरा समर्थपणे सांभाळणारे तसेच पौरोहित्याच्या कामामध्ये नवता आणून बदलत्या काळानुसार त्यात आधुनिक संकल्पना आणणारे एक नाव म्हणजे सुमित ढेरे. हे काम करण्यामागील त्यांचे विचार आणि दूरदृष्टी अभ्यासण्याजोगी तसेच अनुसरण्याजोगी आहे.

सुमित ढेरे यांनी घरातील पौरोहित्याची परंपरा जतन करत याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि रितसर पाठशाळेत राहून आवश्यक ते सगळे शिक्षण पूर्ण केले. हे काम करत असताना संस्कृतवर प्रभुत्व हवे, हे जाणून त्यांनी हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. बऱ्याच वेळा लोक गुरुजींना वास्तुविषयक, भविष्यविषयक प्रश्नही विचारतात. गुरुजींना त्यातील सगळे कळते, असा काहीजणांचा समज असतो. हे जाणून थातूरमातूर उत्तरे न देता योग्य ती माहिती सांगता यावी, या हेतूने त्यांनी नामांकित संस्थेतून वास्तुभूषण, वास्तुविषारद आदी परीक्षाही दिल्या. काळानुसार बदलायला हवे तसेच आपल्या क्षेत्रात अपडेट व्हायला हवे, हाच त्यांचा यामागील विचार होता. खेरीज केवळ विधी पार न पाडता लोकांना तो समजावून सांगणे महत्त्वाचे आहे, हेदेखील त्यांना जाणवत होते. याचे कारण आजची पिढी मागच्या पिढीसारखी नाही हे ते जाणून होते. आता करतो त्या प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगणे आणि आजच्या काळाचे, परिस्थितीचे दाखले देऊन त्यांची सांगड स्पष्ट करणे ही आजच्या गुरुजींची वाढलेली जबाबदारी आहे, याचे भान त्यांना होते.

सुमित ढेरे यांना पहिल्यापासूनच तांत्रिक बाबी समजून घेण्याची आवड होती. संघटनात्मक कौशल्य अंगी होते. यातून ते चार पावले पुढे येऊ शकले आणि आजच्या पिढीला पटणारी, त्यांच्या क्षेत्राशी संबंधित दाखले वा उदाहरणे देऊन संदर्भ स्पष्ट करण्याची हातोटी अंगी बाणवू शकले. इथे अवांतर वाचनाचा चांगला उपयोग झाला. या अनुषंगाने येणारी बाब म्हणजे मोठ्या माणसांच्या प्रसिद्ध वचनांचे स्मरण करणे. उदाहरणार्थ, नव्या-जुन्या विचारांचा संगम साधणारी समाजपुरुषांची वक्तव्ये प्रसिद्ध असतात. संदर्भ जाणून घेत ती समोर मांडली तरी वेगळा प्रभाव पडतो. सध्या नानाविध माध्यमांमधून असे कोट्स, मेसेजेस आपल्यापर्यंत पोहोचत असतात. हा उत्तम साठा सुमित यांच्या कामी येत गेला. मुद्दा समजावून सांगताना आजच्या काळाला सुसंगत ज्ञानाची, वचनांची पेरणी केल्यामुळे त्यांच्या कामाची वेगळी ओळख निर्माण होत गेली.

अशातच इंग्रजीतून लग्नविधी करण्याची एक नामी संधी त्यांच्याकडे चालून आली. अमेरिकन मुलगी आणि मराठी मुलगा असल्यामुळे परदेशी मंडळींना लग्नविधी इंग्रजीतून समजावून सांगावेत, अशी यजमानांची मागणी होती. चार-पाच महिन्यांनंतर तो लग्नसोहळा पार पडणार होता. सहाजिकच हातात पुरेसा वेळ असल्यामुळे सुमित यांनी त्यांना होकार दिला आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यानुसार आधी त्यांनी सगळी माहिती इंग्रजीमध्ये लिहून काढली आणि परदेशी मंडळींना समजेल अशा पद्धतीने सादर केली. हा प्रयत्न भलताच यशस्वी झाला. हे आगळे पौरोहित्य उपस्थितांना प्रभावित करून गेले. मग त्या एका लग्नातून पुढचे काम, त्यातून आणखी काम असे करत करत एक वेगळीच वाट त्यांच्या पायाखाली आली. आजपावेतो त्यांनी अनेक भारतीय वधू-वरांची लग्नं त्यांच्या अमेरिकन, जर्मन, फ्रेंच, इटालियन, व्हिएतनामी, ग्रीक आदी देशांमधील जोडीदारांशी लावली आहेत. काही वेळा दोघेही भारतीय वंशाचे असतात. कोणी काश्मिरी पंडित असतो तर जोडीदार अय्यर असतो. मुलगी मराठी असते तर मुलगा उत्तरेकडील असतो. अशा वेळी दोन्ही कुटुंबीयांना समजणारी भाषा म्हणून इंग्रजीची निवड केली जाते. सुमित हे काम चोख निभावतात. अशा लग्नांचे पौरोहित्य करत असतानाच पुढे त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजाही इंग्रजीत सांगण्याची मागणी येऊ लागली. म्हणजे पूजा नेहमीप्रमाणेच करायची, पण कथा इंग्रजीतून सांगायची. त्यांनी हे आव्हानही स्वीकारले आणि ‘इंग्रजीतून सत्यनारायण सांगणारा पुरोहित’ अशी नवी ओळखही गाठीशी जोडली.

एकदा परदेशात स्थायिक झालेल्या एका जोडप्याला आपल्या मुलाची मुंज करायची होती. मात्र मुलाचा जन्म आणि पुढचे संगोपन तिकडेच झाल्यामुळे मराठीतले मंत्रोच्चार वा मुंज म्हणजे नेमके काय असते, हे सांगून समजणार नव्हते. अर्थातच त्यांनी सुमित यांना हे सगळे उपचार इंग्रजीमध्ये सांगण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी इंग्रजीत विशेष प्रावीण्य असणाऱ्या एका मैत्रिणीच्या साह्याने मुंजीचे सगळे उपचार इंग्रजीमध्ये भाषांतरित करून घेतले आणि हा आगळा प्रयोगही यशस्वी झाला. पौरोहित्य करण्यामागील हा नवा विचार या कामाला वेगळे वलय देऊन जाणारा आहेच, खेरीज कोणत्याही कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरदाराला मिळेल इतक्या अर्थार्जनाची संधीही समोर ठेवणारा आहे.

पौरोहित्य करणाऱ्या मुलांना लग्नात बऱ्याच अडचणी येऊ शकतात, अशी एक भीती असते. मात्र सध्या विचार बदलले आहेत. गुरुजींनी सतत धोतर नेसूनच वावरले पाहिजे, ही अपेक्षा आता राहिलेली नाही. हे काम करणारी व्यक्ती तसेच त्यांची पत्नी आणि अन्य कुटुंबीय सामान्य माणसासारखे वागू शकतात. सोवळ्या-ओवळ्याचे तितकेसे अवडंबर न राहिल्यामुळे मुलींनी त्याची अवाजवी काळजी करण्याचे कारण नाही. शेवटी सगळ्यांप्रमाणे या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही हौसमौज असते. त्यांनाही मनोरंजनाची, बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असू शकते. त्यामुळेच समाजाने हेदेखील स्वीकारले पाहिजे. अर्थातच हे सगळे करत असताना आपल्या कामाचे स्वरूप लक्षात घेणे आणि त्यातील मर्यादांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी इतकी लवचिकता दाखवल्यास पौरोहित्य हे देखील कारकीर्दीचे उत्तम माध्यम ठरेल यात शंका नाही.

अलीकडे महिलाही या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. सगळ्याच जातींना पौरोहित्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही पुढे येत आहे. काळाच्या ओघात पौरोहित्याचे व्यवसायानेही आधुनिक मूल्य आणि नवे रूप धारण केले पाहिजे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक