मत आमचेही
- अॅड हर्षल प्रधान
आजची देशाची स्थिती केवळ लाडके मित्र, लाडके व्यापारी आणि लाडके शेठजी यांच्यासाठीच 'राष्ट्र स्वाहा' होताना दिसते आहे. रा. स्व. संघाची आजची राजकीय परिस्थिती पाहता 'उरलो केवळ शब्द बापुडा बुडबुड्यांपुरता' अशी झाल्याचे जाणवते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भाजपचे शीर्षस्थ नेते तरी गांभीर्याने घेत असतात का? आजच्या भाजपच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यावर हा संशोधनाचा विषयच आहे. पटतंय ना?
आपल्याला समाजात जसा बदल अपेक्षित आहे, तसे प्रत्येकाने स्वतः बनायला हवे, असे सांगणाऱ्या पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे चरित्र प्रेरणादायी असून, त्यांच्या चारित्र्यापासून प्रेरणा घेत प्रत्येकाने त्यातील काही अंश जरी स्वीकारले, तरी जगाला दिशा देणारा भारत उभा राहील, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मध्यंतरी केले. "तुझे तेज अंगी शतांशे तरीही उजाळून देऊ दिशा दाही." अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारांची प्रेरणा असे. आमच्या पिढ्या याच विचारांवर घडल्या आणि वाढल्या. राष्ट्र निर्माण करताना स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून स्वःचा विचार विसरून कार्यरत व्हावे लागते; मात्र आजची देशाची स्थिती केवळ लाडके
मित्र, लाडके व्यापारी आणि लाडके शेठजी यांच्यासाठीच राष्ट्र 'स्वाहा' होताना दिसते आहे. रा. स्व. संघाची आजची राजकीय परिस्थिती पाहता 'उरलो केवळ शब्द बापुडा बुडबुड्यांपुरता' अशी झाल्याचे जाणवते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भाजपचे शीर्षस्थ नेते तरी गांभीर्याने घेत असतात का? आजच्या भाजपच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यावर हा संशोधनाचा विषयच आहे. पटतंय ना? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक प्रार्थना आहे.
आजही ती कदाचित संघाच्या शाखामध्ये भिंतीवर चिटकवलेली पहायला मिळेल. आजच्या पिढीला अगदी संघ स्वयंसेवकांनाही ती पूर्ण पाठ असेल का? याबाबत शंका आहे. त्या प्रार्थनेचा सोप्या मराठी भाषेतला अनुवाद असा आहे की, "हे प्रेमळ मातृभूमी! मी तुला नेहमी नमस्कार करतो. तू मला आनंदाने वाढवलेस. हे शुभ पवित्र भूमी! माझा हा देह फक्त तुमच्या कार्याला समर्पित होवो. मी तुला पुन्हा-पुन्हा नमस्कार करतो. हे सर्वशक्तिमान देवा! आम्ही हिंदू राष्ट्राचे पुत्र तुम्हाला आदराने नमस्कार करतो. आम्ही फक्त तुमच्या कामासाठी सज्ज झालो आहोत. त्याची पूर्तता होण्यासाठी आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या. हे परमेश्वरा! आम्हाला अशी शक्ती दे की जगात कोणीही आव्हान देऊ शकणार नाही, असे शुद्ध चारित्र्य दे ज्यासमोर सारे जग नतमस्तक होईल. असे ज्ञान द्यावे की, हा काटेरी मार्ग स्वतःहून सुकर होईल. आपल्यामध्ये भयंकर शौर्याचा आत्मा जागृत झाला पाहिजे, जो सर्वोच्च आध्यात्मिक आनंद आणि सर्वात मोठी सांसारिक समृद्धी मिळविण्याचे एकमेव सर्वोत्तम साधन आहे. आपल्या अंतःकरणात प्रखर आणि अटल निश्चय सदैव जागृत राहू दे. हे माते, तुझ्या कृपेने, आमची ही विजयी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे रक्षण करू शकेल आणि या राष्ट्राला वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊ शकेल. भारत माता चिरंजीव होवो".. आज या प्रार्थनेचा अर्थ समजून घेऊन राष्ट्र निर्माणासाठी कार्यरत राहणारे अभावानेच पहायला मिळतात.
भाजपकडून अपेक्षा होती पण ..
भारताच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षात देशाला काँग्रेसने अनेक आश्वासक नेते दिले. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान मोठे होते; मात्र त्यांच्याबाबत सतत घराणेशाहीचा आरोप होत राहिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्यानंतर राजीव गांधी त्यांच्या पाठोपाठ सोनिया गांधी आणि राहुल गांधी अशी घराणेशाही या देशाने अनुभवली. त्यांच्या काळात देशात अनेक बदलही घडले. याच कालावधीत देशाने दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यांच्यासारखे हिंदुत्ववादी नेतेही पाहिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे नेते आजही कार्यरत आहेत; मात्र आजच्या भाजपमध्ये त्या देशप्रेमी हिंदुत्ववादी विचारांची अभावानेच दृष्टी समोर येते. त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विचारांनी पुन्हा त्यांची आठवण काढून त्यावर मार्गक्रमण करण्याबाबत वाच्यता केली असली, तरी आज ते कितपत शक्य आहे हा प्रश्नच आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व स्पष्ट करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, "जगण्यासाठी संघर्ष हे तत्व मानून मनुष्य जीवन सुरू आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी आजवर विविध प्रयोग झाले आहेत; पण जीवनात सुख, शांती निर्माण करण्यात ते सर्व अपयशी ठरले. दुसरीकडे परमोच्च बिंदू गाठत असलेला भौतिक विकास मानवतेला विनाशाकडे घेऊन जातो आहे, असे जगभरातील चिंतक मानतात. या पृष्ठभूमीवर सर्व समस्यांचे उत्तर आपल्या भारतीय परंपरेत आढळते. भारताने सर्व प्रकारचे विचार स्वीकारले. भूतकाळात कुणालाही नाकारले नाही. येथे आस्तिक आणि नास्तिक असे दोन्ही दर्शन एकत्र नांदतात. त्या सगळ्यांचा स्वीकार भारताने केला. विविधता मिटवून जबरदस्तीने एकता निर्माण करण्याऐवजी विविधतेला स्वीकारत आणि आपण सर्व एक आहोत हे मानत जगण्याची परंपरा भारतात आहे", असेही भागवत म्हणाले होते. त्यांच्या बोलण्याचा उद्देश आजच्या एककल्ली राजकारणावर प्रकाश टाकणारा आहे. ते म्हणतात की, "विविधता मिटवून जबरदस्तीने एकता निर्माण करण्याऐवजी विविधतेला स्वीकारत आणि आपण सर्व एक आहोत हे मानत जगण्याची परंपरा भारतात आहे." याचा अर्थ सध्या देशात जी खुलेआम लोकशाहीची हत्या करून कायद्याला आणि कायद्याच्या संस्थांना आपले बटीक बनवून देशातील सर्व शक्तिमान शक्तींना आपल्या ताब्यात घेण्याचा जो प्रकार सुरू आहे तो अयोग्य आहे असाच होतो; मात्र त्यांच्या विचारांना मानणार कोण हा खरा प्रश्न आहे. सरसंघचालक भागवत यांनी ज्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांना आदर्श मानून, "तुझे तेज अंगी शतांशे तरीही उजाळून देऊ दिशा दाही..." असे प्रबोधन केले
त्या विचारांना मानून आजचे राजकारण करणे शक्य होईल का या भाजपच्या नेत्यांना? हा खरा प्रश्न आहे.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म (अखंड) मानवतावाद
पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी 'एकात्म मानववाद' हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. अखंड मानवतावाद हे मानवी जीवन आणि संपूर्ण सृष्टी यांच्यातील एकमेव नातेसंबंधाचे तत्वज्ञान आहे. त्याचे संपूर्ण शास्त्रीय विश्लेषण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले आहे. अखंड मानवतावाद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २२ ते २५ एप्रिल १९६५ या काळात मुंबईत दिलेल्या चार व्याख्यानांच्या रूपात मांडले. भारतीय जनसंघाच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना १९६५च्या विजयवाडा अधिवेशनात घडली. या अधिवेशनात उपस्थित सर्व प्रतिनिधींनी कर्तळच्या नादाने अखंड मानवाचे तत्वज्ञान स्वीकारले. साम्यवाद, समाजवाद, भांडवलशाहीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. अखंड मानवतावादाकडे विचारधारा म्हणून पाहिले जाऊ नये. ज्यामध्ये व्यक्ती केंद्रस्थानी असते, व्यक्तीशी जोडलेले वर्तुळ म्हणजे कुटुंब, कुटुंबाशी जोडलेले वर्तुळ समाज, जात, नंतर राष्ट्र, जग आणि नंतर अनंत विश्वाचा समावेश आहे. या आकारात, एक प्राणघातक वस्तू दुसऱ्यामध्ये विकसित होते आणि नंतर दुसरीपासून तिसरी विकसित होते. एकमेकांशी जोडून आपले अस्तित्व साधताना सर्वच एकमेकांचे पूरक आणि नैसर्गिक सहयोगी आहेत. त्यांच्यात कोणताही संघर्ष नाही. अशी ढोबळ मानाने व्याख्या करता येईल. सर्व समान आहेत. जातीपातीने किंवा त्यामुळे कोणी विभक्त नाहीत. सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने प्रथम कुटुंबाचे, मग समाजाचे, मग राष्ट्राचे आणि जगाचे कल्याण करणे अपेक्षित आहे. असाही त्याचा सोप्या शब्दात अर्थ सांगता येईल; मात्र आज भाजप मधील स्वार्थ आणि स्वनियंत्रित व्यक्ती हा पंडितजींच्या विचारातील अखंड एकात्मवाद प्रत्यक्षात आणतील का? बोलायला आणि ऐकायला या विचार प्रवर्तक बाबी वाटतात खऱ्या पण ऐकतय कोण? त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विचारही 'शब्द बापुडे केवळ वारा' असेच झाल्यासारखे वाटत आहे.
(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)