संपादकीय

पन्नाशी वयाची आणि अगणित आठवणींची! प्रिय सचिन...

वानखेडे स्टेडियमवर आजही भारताचा किंवा मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील सामना असला तरी तुझ्या नावाचा जयघोष

ऋषिकेश बामणे

‘स्वप्नांचा पाठलाग करा, ती नक्कीच पूर्ण होतात...’ असे २०१२ मध्ये शतकांचे शतक साजरे केल्यावर तू ठामपणे म्हणाला होतास. माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांमध्ये स्वप्नांची उमेद निर्माण करण्याचे कारण तूच आहेस. आज तू वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेस. परंतु तुझ्यातील अनेक गोष्टी कायमस्वरूपी चिरंजीव राहणाऱ्या आहेत. निवृत्तीनंतरही तू मनात घर करून आहेस. मुळात तू कधी परका वाटलाच नाहीस. त्यामुळेच तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक सोहळाच.

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर यांसारख्या अनेक बिरुदावलींनी जगभरातील क्रीडा चाहत्यांनी तुला हृदयात स्थान दिले. मात्र माझ्यासाठी ‘सचिन तेंडुलकर’ या नावातच विश्व सामावले आहे. कपिल देवच्या संघाने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आणि तू क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतलास. खरे सांगायचे तर, तुझ्या या निर्णयाने अनेकांचे आयुष्य सार्थकी लागले. वानखेडे स्टेडियमवर आजही भारताचा किंवा मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील सामना असला तरी तुझ्या नावाचा जयघोष हा ओघानेच होतो.

वयाच्या १६व्या वर्षी पाकिस्तानच्या धडकी भरवणाऱ्या गोलंदाजांसमोर नाक रक्तबंबाळ झालेले असतानाही तू नेटाने उभा राहिलास. अब्दुल कादीरच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘दूध पिता बच्चा’ आभाळाएवढा मोठा कधी झाला, ते कळलेच नाही. तेथून तू कधीच मागे वळून पाहिले नाहीस. तुझ्या विक्रमांविषयी जितके बोलावे तितके कमीच. कदाचित अन्य क्रिकेटपटूंच्या नशिबी तुला लाभलेले प्रेम, जिव्हाळा का नाही आला किंवा तुला इतके मोठेपण का, हा प्रश्न यापुढेही विचारला जाईल. मात्र, भारतीय क्रिकेटसाठी तू दिलेले योगदान त्यांना कधीच समजणार नाही.

शाळेला दांडी मारून तुझी फलंदाजी पाहण्यात, तू शतक मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामधून तुझे छायाचित्र कापून संग्रह करण्यात वेगळीच नशा होती. विश्वचषक असो किंवा एखादा मालिकेतील सामना, तू बाद झाला तर भारताचा पराभव पक्का... हे जणू समीकरणच झाले होते. मूळात सध्या जग ‘फास्ट फॉरवर्ड’ होत असताना, समाजमाध्यमांमध्ये हरवत असताना तू नदीच्या नितळ पाण्याप्रमाणे स्वत:चे स्थान अढळ करून गेलास. भविष्यात तुझ्यापेक्षाही महान खेळाडू भारताला किंवा विश्वाला गवसतील. तुझे विक्रमही मोडले जातील. जो कोणी हे सर्व करेल, तोही नक्कीच महान असेल. परंतु तो सचिन होऊ शकत नाही. आमच्यासाठी विशेषत: १९८० ते २००० या दोन दशकांत जन्मलेल्यांसाठी तू नेहमीच सूर्याप्रमाणे चमकत राहशील.

तुला शतके झळकावण्याची सवय आहे. आता फक्त अर्धशतक पूर्ण झालेय. पुढील ५० वर्षेही असाच आमच्या डोळ्यातील तारा बनून चमकत राहा. हॅप्पी बर्थडे सचिन..!

तुझाच एक निस्सीम चाहता

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी