काऊंटर पॉइंट
रोहित चंदावरकर
महाराष्ट्रात निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना प्रचारामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे येणे हा एक नवा भाग दिसू लागला आहे, यामागची कारणे काय आणि याचा काय परिणाम होईल? यामुळे मुस्लिम मतांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला होईल का हिंदू एकटवतील?
राज्यात निवडणुकीचा प्रचार आता अगदी शिगेला पोहोचला आहे. या परिस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन एका भाषणादरम्यान जो नारा दिला त्यावरून आता वादविवाद सुरू झाले आहेत. या आधीच लोकसभा निवडणुकीचे अवलोकन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्याविरुद्ध व्होट जिहाद झाला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संभाषणामध्ये आणि त्यांच्या प्रचारामध्ये आता हिंदू मतांना साद घालण्याचा उद्देश दिसू लागला आहे. अर्थात या संभाषणामध्ये किंवा नाऱ्यांमध्ये हिंदुत्वाचे ध्रुवीकरण करण्याचा उद्देश दिसतो. हे कशामुळे झाले आहे हे पाहणे स्वारस्याचे ठरेल.
पारंपरिकदृष्ट्या विचार केला तर भारतीय जनता पक्षाची मदार ही कायमच हिंदुत्ववादी प्रचारावर राहिली होती. पण ते करत असतानाच भारतीय जनता पक्षाने विकासाचा मुद्दा गेला काही वर्षांत उचलून धरला. मोठे रस्ते, महामार्ग, फ्लाय ओव्हर, पूल आणि अन्य प्रकल्प म्हणजे विमानतळ किंवा नवे रेल्वे मार्ग वगैरे याची बांधणी आमच्या काळात सर्वाधिक प्रमाणात आणि सर्वाधिक वेगाने झाली, असा भारतीय जनता पक्षाचा प्रचार असतो.
भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीवर भर दिला आहे हे तर खरेच आहे आणि समृद्धी महामार्ग असो किंवा वंदे भारत ट्रेन असो ही सगळी विकासाची आयकॉन म्हणता येईल अशा पद्धतीची उदाहरणे आहेत. पण हे जरी खरे असले तरी या सगळ्या विकासाच्याच मुद्द्यांवर मतांची मागणी हा पक्ष का करीत नाही, असा एक प्रश्न आता निर्माण झाला आहे. जर भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची होण्याकडे प्रवास करत असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा अन्य अनेक विषय असो, त्यामध्ये देशाने प्रचंड प्रगती केलेली असेल, तर ऐन निवडणुकीच्या काळात हिंदुत्ववादी प्रचार करण्याची गरज भारतीय जनता पक्षाला का पडते? असा प्रश्न भाजपच्या काही नेत्यांना खासगीमध्ये विचारला असता ऑफ द रेकॉर्ड माहिती म्हणून ते सांगतात की, विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर जातीय मुद्द्यांवर ध्रुवीकरण झाल्याचा अनुभव आम्हाला मागच्या लोकसभा निवडणुकीत आला. आम्ही कितीही विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला आणि केवळ अर्थव्यवस्था सुधारणे किंवा विकासाचे मुद्दे यावरच भाषणे केली तरी समोरची बाजू जर ‘संविधान खतरे मे है’ अशा तऱ्हेचे फेक नरेटिव्ह पसरवत असेल आणि त्याचा परिणाम मतदानावर होणार असेल तर आम्हाला ‘हिंदुत्व’ या मुद्द्यावर समाजाचे एकत्रीकरण करणे आवश्यकच आहे. याचा परिणाम असा की महाराष्ट्रात होणारी विधानसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना प्रचाराच्या दोन बाजू पाहता एकीकडे ‘जातीय ध्रुवीकरण’ आणि दुसरीकडे ‘हिंदुत्वावर घातलेली साद’ अशा आहेत. भाजप सर्व हिंदूंनी एक होऊन हिंदूंच्या हितासाठी मतदान करावे, अशा पद्धतीचे नरेटिव्ह मांडत असून दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष काँग्रेस हा समाजातील ओबीसी-एससी-एसटी आणि अन्य प्रवर्गातील घटकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे जातीय जनगणना झाली पाहिजे, असा मुद्दा उचलून धरताना दिसतो आहे. याचाच अर्थ काँग्रेसचा प्रचार हा पूर्ण जातीय ध्रुवीकरणाच्या दिशेने जातो आहे.
‘संविधान खतरे मे है’ अशी मांडणी जरी लोकसभा निवडणुकीच्या काळात झाली असली तरी ती राष्ट्रीय निवडणुकीसाठी ठीक होती आणि केंद्र सरकारच्या निवडीमध्ये असा संविधानाचा मुद्दा चालू शकतो आणि त्याचा लाभ काँग्रेसला मिळालाही. पण राज्याच्या विधानसभा निवडणुकीत असा लाभ काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला मिळणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे मत आहे. पण नीट पाहिल्यास हे लक्षात येईल की जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थाने ‘संविधान खतरे में है’ या मांडणीचे दुसरे पैलू आहेत. कारण ‘संविधान खतरे मे है’ या मांडणीमध्ये मुख्यतः जाती आधारित आरक्षण संपेल, अशी भीती समाजात निर्माण होणे हा भाग होता आणि जाती आधारित जनगणना व्हावी अशी मागणी करणे, हा सुद्धा त्याचाच दुसरा पैलू आहे.
एका बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची विभागणी झाली आणि त्यांची मूळ चिन्हे त्यांच्या नेत्यांकडून काढून घेण्यात आली. त्याचा परिणाम मतदानावर दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला जाती आधारित ध्रुवीकरणाच्या आधारावर काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांनी लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी जागा मिळवल्या. याला उत्तर म्हणून हिंदुत्ववादी प्रचार करणे हे असू शकते का? कारण एकदा हिंदुत्ववादी प्रचार शिगेला पोचला की पुन्हा एकदा मुस्लिम आणि दलित मतांचे ध्रुवीकरण होऊन ती महाविकास आघाडीकडे वळतील, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.
म्हणजे जर ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा पद्धतीचे नारे दिले गेले तर त्यामुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण होऊन ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे सुद्धा वळू शकतात, अशी शक्यता काही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात. तसे झाले तर त्याचा सरळ सरळ फायदा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडीला मिळू शकेल.
पण भारतीय जनता पक्षातील काही जणांचे म्हणणे असे आहे की गेल्या निवडणुकीमध्ये असंख्य मतदारसंघांमध्ये आम्ही अक्षरशः एक टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने हरलो. तसे पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही विकासाबरोबरच इतर जे कुठले मुद्दे जनतेला अपील होतील ते म्हणजे हिंदुत्वाचे मुद्दे किंवा अन्य मुद्दे हे आता चर्चेत आणत आहोत.
अनेक तज्ज्ञांना असे वाटते की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हिंदुत्व आणण्याचा उद्देश हा पारंपरिक संघ कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते यांना चार्जअप करणे आणि त्यांना कामासाठी प्रोत्साहित करणे, हा आहे. म्हणजे त्यांनी हिरिरीने बुथवर सक्रिय व्हावे, मतदारांना मतदान करायला घरातून बाहेर काढण्यात पुढाकार घ्यावा, असा उद्देश त्या सगळ्या मागे आहे. कदाचित हिंदुत्वाचा नारा अशा कामी येऊ शकतो की पारंपरिक कार्यकर्ते जे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या पक्षाला मोठा विजय मिळणार आहे असे गृहीत धरून फारसे कामासाठी बाहेर उतरले नाहीत, ते थोडे प्रोत्साहित होऊन बाहेर उतरू शकतात. पण हे होत असतानाच दुसऱ्या बाजूला महायुतीतील सदस्य असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वारंवार आम्ही हिंदुत्वाच्या मार्गाने जाणार नाही, असे जाहीर सभांमध्ये सांगणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यांच्या तशा बोलण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांवर किंवा पक्षांवर काय परिणाम होतो हे तपासून बघितले पाहिजे. आता तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी सुद्धा कर्मठ हिंदुत्वाचे नारे द्यायला नको आणि निवडणुकीत हे विषय आणायला नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे सगळे अधिकच स्वारस्याचे झाले आहे. महाविकास आघाडीतील एक नेत्या सुप्रिया सुळे यांनी असा दावा केला की, ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्यावरून भाजपमध्येच अंतर्गत मतभेद निर्माण झालेले आहेत.
प्रखर हिंदुत्व प्रचारात आणल्यास त्याचा कसा परिणाम होईल याचा अंदाज वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीने मांडत आहेत, असे दिसते आहे. अजित पवार यांनाच असे वाटते की अशा प्रचारामुळे आपले अल्पसंख्यांक मतदार आपल्यापासून दूर जातील, दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी किंवा पंकजा मुंडे यांच्यासारखे सीनियर नेते सुद्धा याबद्दल सावध भूमिका घेताना दिसत आहेत. एका बाजूला हिंदुत्व आणि दुसऱ्या बाजूला जातीय ध्रुवीकरण अशी विभागणी झाली आहे, यात शंका नाही. यातून कोणाला राजकीय लाभ जास्त मिळतो, हे आता येणारा काळच ठरवेल.
लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.