असे हवे रामराज्य... नवशक्ति- अक्षररंग
संपादकीय

असे हवे रामराज्य...

श्री रामाला राजकारण्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ‘हायजॅक’ केले. त्याचे नाव घेऊन सत्ताकारण केले. एरव्ही आदराने ‘राम राम’ म्हणणारी मंडळी अचानक आक्रमक होऊन ‘जय श्री राम’चे नारे देऊ लागली. समाजात दुहीचे बीज पेरू लागली. त्यामुळे देशात निरपराधांचे रक्त सांडून अशांतता, दंगली, अराजक माजण्याचा धोका निर्माण झाला.

नवशक्ती Web Desk

- दुसरी बाजू

- प्रकाश सावंत

श्री रामाला राजकारण्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ‘हायजॅक’ केले. त्याचे नाव घेऊन सत्ताकारण केले. एरव्ही आदराने ‘राम राम’ म्हणणारी मंडळी अचानक आक्रमक होऊन ‘जय श्री राम’चे नारे देऊ लागली. समाजात दुहीचे बीज पेरू लागली. त्यामुळे देशात निरपराधांचे रक्त सांडून अशांतता, दंगली, अराजक माजण्याचा धोका निर्माण झाला. म्हणूनच या देशाला शांतता, समता, बंधुभाव, न्याय, त्याग ही आदर्श नीतिमूल्ये जपणारा व मनामनात, घराघरात पुजला जाणारा प्रभू राम हवाय आणि रामराज्यसुद्धा!

'रामराज्य म्हणजे दैवीराज्य’ अशा शब्दात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्याची थोरवी वर्णिली आहे. माझ्यासाठी राम, रहीम एकच. मी सत्य आणि नीतिमत्तेच्या एकाच देवाशिवाय इतर कोणत्याही देवाला मानत नाही. रामराज्याचा प्राचीन आदर्श नि:संशयपणे लोकशाहीत आहे. ज्यात राजा आणि रंक समान आहे, असे महात्मा गांधी यांनी म्हटलेले आहे. त्यांचे हे म्हणणे ‘मन राम रंगी रंगले’ची प्रचिती आणून देणारे आहे.

समस्त भारतीयांच्या मनाच्या गाभाऱ्यात आदर्शवादी राम युगानुयुगे वसला आहे. भाऊ कसा असावा तर राम-लक्ष्मण-भरत यांच्यासारखा. आज्ञाधारक पुत्र कसा असावा तर तो रामासारखा. वडिलांच्या शब्दाखातर राज्याचा, सत्तेचा त्याग करणारा. त्याचप्रमाणे आदर्श राज्य कसे असावे, तर ते रामराज्यासारखेच, जिथे एका परिटाला आपल्या मनातील शंका उच्चारण्याचे स्वातंत्र्य असेल. प्रजेच्या मताला किंमत असेल. ही सार्वत्रिक जनभावना आजही कायम आहे. म्हणूनच जात, धर्म, पंथ, वंश, प्रांत, वर्ण, पेहराव आणि खाद्यसंस्कृतीवरून भेदभाव झाल्यास आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेलाच ‘हे राम’ म्हणावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गुरुदेव रवींद्र टागोर, स्वामी विवेकानंद, सरदार पटेल यांच्यासारखी गौरवांकित प्रतीके केवळ आमचीच आहेत. आम्हीच त्यांच्या विचारांचे सच्चे पाईक आहोत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांशी आपले भावनिक नाते आहे. शिवभक्त, हनुमानभक्त आणि रामभक्त आम्हीच. टेकगुरू, अध्यात्मगुरू, विश्वगुरूसुद्धा आम्हीच, अशी देशातील काही राजकारण्यांची भावना असते. या गौरवांकित प्रतीकांचे आपणच सच्चे अनुयायी असल्याचा दावा ही मंडळी सातत्याने करीत असतात. तथापि, त्यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे असल्याचे त्यांच्या उक्ती व कृतीतून दिसून येते. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून रामाच्या आचारविचारांचा लवलेशही दिसून येत नाही.

आपला देश केवळ हिंदूंचाच नव्हे, तर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसींसह साऱ्याच जनसमूहांचा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वधर्मीयांनी बलिदान केले आहे. विविध धर्मीयांच्या आस्था, आपुलकी व सहजीवनातूनच देशाचे ऐक्य व अखंडता आजवर टिकून आहे. तथापि, आजकाल काही राज्यकर्त्यांनी एका धर्मीयांना आवडत्यांच्या, तर दुसऱ्या धर्मीयांना नावडत्यांच्या यादीत टाकले आहे. आवडत्यांचा रात्रंदिन उदोउदो, तर नावडत्यांचा उठता-बसता तिरस्कार, द्वेष केला जात आहे. एक म्हणतो मशिदीत घुसून मारू, दुसरा सांगतो त्यांची कत्तल करू, तिसरा आवाहन करतो त्यांच्या दुकानांवर बहिष्कार टाका, चौथा म्हणतो औरंगजेबाची कबरच उखडून फेका, पाचवा बोलतो शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचेच राजे होते. हा जातीय विद्वेष, धार्मिक उन्माद आपलेच अनुयायी करीत असताना त्यावर सत्ताधारी चाणक्य सूचक मौन बाळगून आहेत. समाजमनाचा अंदाज घेऊन औरंगजेबाचा विषय कालसुसंगत नाही, असा निर्वाळा संघाची नेतेमंडळी देत आहेत. शिवाजी केवळ हिंदूंचे राजे नव्हते, तर ते शंभर टक्के धर्मनिरपेक्ष होते असे आता भाजपचे नेते म्हणू लागले आहेत. एकाने असंतोष, संभ्रम निर्माण करून वातावरण तापवायचे, दुसऱ्याने वातावरण विरोधात जाते आहे असे दिसताच सारवासारव करायची, याला दुटप्पी राजकारण म्हणतात. त्यामुळेच देशाच्या ऐक्य व अखंडतेला गंभीर व दूरगामी धोके संभवत आहेत. आपल्या एका टिपण्णीळे समाजमन अस्वस्थ होते. त्यांच्या मनात विष कालवले जाते. दंगली उद‌्भवून देशाचेच नुकसान होते. त्याचे कोणतेही भान समाजात दुहीची बिजे पेरणाऱ्यांना उरत नाही, कारण त्यांच्या कृतीत रामराज्य नाही व मनात राम नाही.

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक कविता सादर केली म्हणून त्यालाच नव्हे, तर त्याचा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही नोटिसा बजावल्या जात आहेत. केवळ मुस्लीम धर्मीय आरोपींना लक्ष्य करून त्यांच्या घरादारावर, दुकानांवर ‘बुलडोझर’ चालविला जात आहे. बीडसारख्या जिल्ह्यातील अमानूष घटनांवरून तिथे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली सामान्यजनांचा आवाज दडपण्याचाच नव्हे, तर विरोधकांचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न होत आहे. ही सहिष्णुता नाही, तर सूडबुद्धीचे राजकारण आहे.

ज्या देशात स्वायत्त संस्थांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या मर्जीनुसार निर्णय घेण्यास भाग पाडले जात असेल, तिथे समन्यायी न्यायाची अपेक्षा धरता येत नाही. ज्या देशात लोकप्रतिनिधींचा बाजार भरत असेल आणि सत्ताधाऱ्यांचा बाजार उठत असेल, तिथे लोकशाही व्यवस्था नांदू शकत नाही. एकीकडे मुस्लिमांचा द्वेष, तिरस्कार करायचा आणि मग त्यांच्याच मतांच्या बेगमीसाठी ‘मोदी की सौगात’चे वाटप करायचे, हा दुटप्पीपणा रामराज्यात असूच शकत नाही. ज्या देशातील नागरिकांमध्ये जाती, धर्मावरून भांडणे लावण्यात येत असतील, भ्रष्टाचार, वशिलेबाजीनेच निर्णय दिले जात असतील, तिथे रामराज्याची अपेक्षा करताच येणार नाही. जिथे सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना एक न्याय दिला जात असेल व दुसरीकडे विरोधकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असेल, तिथे रामराज्य आहे असे म्हणता येणार नाही. न्यायदेवताच उघड्या डोळ्यांनी अन्याय, अत्याचाराच्या, पक्षपाताच्या घटनांकडे हतबलतेने बघायला लागली, तर तिथे रामराज्य कसे वसेल, असे मन अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, श्री रामाचा आदर्शवादी व कृतिशील विचार प्रत्यक्षात आणणाऱ्या रामराज्याची देशाला नितांत गरज आहे. राज्यकर्त्यांच्या रूपात देशाला आता बहुजनांचा नायक असलेला राम व त्यांच्या आदर्शवादी विचाराने चालविले जाणारे व प्रजेचे जीवन सुसह्य करणारे रामराज्य हवे आहे.

prakashrsawant@gmail.com

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री