Freepik
संपादकीय

वाढते पर्यटन बिघडवते पर्यावरण

पर्यटकांची वाढती वर्दळ सर्व प्रकारच्या प्रदुषणात भर घालत आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, रिसॉर्ट बांधण्यासाठी, संबंधित गावात रस्ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते. ध्वनिप्रदुषणात वाढ होते.

नवशक्ती Web Desk

- मंगला गाडगीळ

ग्राहक मंच

पर्यटन म्हणजे आनंदासाठी केलेला प्रवास. पण आज पर्यटन हा एक फार मोठा व्यवसाय बनलेला आहे. पर्यटकांची वाढती वर्दळ सर्व प्रकारच्या प्रदुषणात भर घालत आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, रिसॉर्ट बांधण्यासाठी, संबंधित गावात रस्ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते. ध्वनिप्रदुषणात वाढ होते. स्थानिक जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. यामुळेच आता स्पेनमधील नागरिक पर्यटनाला विरोध करत आहेत, तर इटलीचे सरकार पर्यटकांवर वेगवेगळे निर्बंध घालत आहे.

पर्यटन व्यवसायामुळे साधा चणे-फुटाणे वाला, चहावाला पैसे कमावतो, त्याचप्रमाणे पंचतारांकित हॉटेलं सुद्धा चांगली कमाई करतात. या शिवाय दुकानदार, बस/ रिक्षा वाले, घोडेवाले सगळेच चांगला नफा कमावतात. काही पर्यटन स्थळी तर वर्षातील सहा-आठ महिने काम करूनही वर्षभराची कमाई होत असते. सरकारलाही करांच्या रूपात व इतर कारणांनी फायदा होत असतो. त्यामुळे पर्यटन स्थळे निर्माण करणे आणि अस्तित्वात असलेल्यांची निगा राखणे ही कामे सरकार प्राधान्यांनी करत असते. सर्वच देशांची सरकारे पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देत असतात. या सर्व व्यवसायिकांबरोबरच पर्यटन स्थळ ज्या गावात आहे तिथले स्थानिक नागरिकही खुश असतात. त्यांच्या हाताला काम मिळते. थोडे पैस खिशात खुळखुळू लागतात. तसेही आपल्याकडे 'अतिथि देवो भव' असे मानले जाते. स्थानिक लोक त्यामुळे पर्यटकांची नेहमीच वाट पाहत असतात. त्यांना पर्यटक त्यांच्या गावात/ शहरात/ देशात यायला हवे असतात.

असे असूनही नुकतीच एक विचित्र घटना एका बातमीत वाचायला मिळाली. ही घटना आहे स्पेनमधील मॅलोर्का बेटाच्या 'पाल्मा' या राजधानीच्या शहरातील. पर्यटनाच्या भर मोसमातील मे महिन्यात स्थनिक लोकांनी एक मोर्चा काढला. त्यांच्या हातात फलक होते. त्यावर लिहिलेले होते की 'पर्यटकांनो परत जा' आणि 'पर्यटनावर आम्ही जगतो पण पर्यटन आम्हाला जगू देत नाही.'

आपली भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, आम्ही काहीशा विचित्र परिस्थितीत सापडलो आहोत. आमची स्वतःची घरे नाहीत. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्हाला आताशा भाड्यानेही घर मिळत नाही. घर मालकांनी त्यांची घरे पर्यटकांना देण्यासाठी सज्ज करून ठेवली आहेत. थोड्या दिवसांकरिता ती 'होम स्टे'साठी मिळतात पण जास्त कालावधीसाठी मिळत नाहीत. तसेच भाडेही वाढवून ठेवले आहे. अशी महाग घरे आम्हाला परवडत नाहीत. एका टॅक्सी चालकाने सांगितले की मी स्वतः गेले दोन महिने माझ्या गाडीतच रात्रीचा झोपतो आहे. या शिवाय इतर वस्तूंची भाववाढ होते आणि महागाई वाढते. पर्यावरणाचे नुकसान होते ते वेगळेच.

इटलीमध्ये सुद्धा महागाई, पर्यावरण ऱ्हास असे मुद्दे पुढे आले आहेत. तिथे तर पुढे जाऊन पर्यटक संख्येवर निर्बंध आणले गेले आहेत. टॉरसेल्लो, मुरानो, बुरानो अशा पर्यटक प्रिय ठिकाणी एका गटात २५ पेक्षा जास्त पर्यटक असता कामा नयेत, असा नियम १ ऑगस्ट पासून लागू केला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास २५ ते ५०० युरो दंड करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. व्हेनिससारख्या ठिकाणी एका दिवसाची ट्रिप करणारे बरेच असतात. गर्दीच्या वेळी उदा. संध्याकाळी यायचे असेल तर वेगळा जास्तीचा कर भरावा लागणार आहे. यामुळे कमी पर्यटक येतील असा त्यामागचा विचार आहे. शिवाय या ठिकाणी गाईडना ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदी घातली आहे. ध्वनीक्षेपकामुळे ध्वनी प्रदूषण होऊन रहिवाशांना त्रास होतो, असे कारण दिले गेले आहे. असे करणारा इटली हा पहिला देश ठरला आहे.

हिमालयावर चढाई करणे हे सोपे काम नाही. तरीसुद्धा जगभरातून हौशी आणि व्यावसायिक गिर्यारोहक येत असतात. एव्हरेस्ट, कांचनगंगा सारखी शिखरे त्यांना खुणावत असतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वर चढताना त्यांना आपले खाणे बरोबर न्यावे लागते. चढाई पूर्ण झाल्यावर परतताना तयार झालेला कचरा उदा. बाटल्या, डबे परत त्यांच्याबरोबर खाली तळावर येत नाही. तो इतस्ततः फेकून दिला जातो. हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात सुद्धा त्यामुळे ठिकठिकाणी भरपूर कचरा जमा झाला आहे. सच्च्या गिर्यारोहकांना या पर्यावरण ऱ्हासाची काळजी वाटते. तिथेही एखादी स्वच्छता मोहीम त्यांना काढावीशी वाटते.

गेल्या महिन्यात केरळ राज्यातील वायनाडमध्ये पावसाने तांडव केले. ढगफुटी झाल्याप्रमाणे थोड्या काळासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसाचे पाणी डोंगरात झिरपू शकले नाही. कारण जंगले नष्ट केली गेली आहेत. हे कित्येक दशके चालू आहे. वृक्ष तोडीमागे अवैध खाणकाम हे कारण सांगितले गेले. दरडी कोसळल्या, झऱ्यांच्या नद्या झाल्या. या प्रवाहात जे काही सापडले ते वाहून गेले किंवा गाडले गेले. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेच सांगितले. पश्चिम घाट हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भाग आहे. तेथील मानवीय हस्तक्षेप आपल्याला परवडणार नाही. वायनाडमध्ये मनुष्यहानीही बरीच झाली. कोण होती ही माणसे? ते होते चहाच्या मळ्यातील गरीब मजूर. याला पर्यटनाचाही पैलू आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, टुरिस्ट रिसॉर्ट बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. शिवाय रिसॉर्ट म्हटले की तरण तलाव आलाच. या पाण्याचा भार खालच्या जमिनीला झेपत नाही. थोडक्यात पर्यटकांची वाढती वर्दळ प्रदूषणात भर घालतच असते.

जर असे आहे तर पर्यटनाला जावे की न जावे? हा प्रश्न निश्चित निर्माण होतो. याचे उत्तर एकच आहे. जरूर जावे, पण निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजीही घ्यावी.

मुंबई ग्राहक पंचायत

( mgpshikshan@gmail.com)

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी