संपादकीय

जपानमध्ये ऐतिहासिक परिवर्तनारंभ

भारतात लक्ष्मीपूजन सुरू असताना तिकडे उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानमध्ये ऐतिहासिक परिवर्तनारंभ झाला आहे. साने ताकाईची या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. परराष्ट्रसंबंध हे त्यापैकी मुख्य आव्हान आहे.

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

भारतात लक्ष्मीपूजन सुरू असताना तिकडे उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानमध्ये ऐतिहासिक परिवर्तनारंभ झाला आहे. साने ताकाईची या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. परराष्ट्रसंबंध हे त्यापैकी मुख्य आव्हान आहे.

जपान हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. जपानी संसदेने २१ ऑक्टोबर रोजी इतिहास घडविला. साने ताकाईची या महिलेची पंतप्रधानपदी निवड केली. त्या जपानमधल्या पहिल्या महिला पंतप्रधान असतील. हे केवळ राजकीय परिवर्तन नसून, जपानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विचारसरणीत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलाचे प्रतीक आहे. तसेच जपानने ऐतिहासिक परिवर्तनारंभ केल्याचे निदर्शक म्हणूनही याकडे पाहता येईल. जगभरात घडणाऱ्या विविध घडामोडी, बहुध्रुवीय वाटचाल, विस्तारवादाला खतपाणी घालणारे देश, महासत्तांची मनमानी, युद्धांचे सावट, अस्थैर्याचा वरवंटा अशा असंख्य जंजाळासह देशांतर्गत स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान ताकाईची यांच्यासमोर आहे.

साने ताकाईची या दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिलेल्या आहेत. जपानच्या सत्ताधारी पक्ष असलेल्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या त्या वरिष्ठ नेत्या आहेत. पूर्वी त्या आर्थिक सुरक्षा मंत्री म्हणून कार्यरत होत्या. तंत्रज्ञान व संरक्षण क्षेत्रातील धोरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कठोर आणि स्पष्टवक्तेपणासाठी त्या प्रसिद्ध आहेत. ताकाईची यांच्या निवडीमुळे जपानी राजकारणात महिलांसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे. आजही जपानमध्ये महिला नेतृत्व फार मर्यादित आहे. ‘ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स’नुसार, लिंग समानतेच्या बाबतीत विकसित देशांमध्ये जपान शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एका महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर निवडले जाणे हा जपानी समाजासाठी परिवर्तनाचा संकेत मानला जात आहे. ताकाईची यांच्या नेतृत्वाकडून अनेक अपेक्षा आहेत. देशातील अर्थव्यवस्था, वृद्ध होत असलेली लोकसंख्या, महागाई आणि आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशाला स्थिरता आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेषतः चीन आणि उत्तर कोरिया यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत त्यांची भूमिका ठाम आणि राष्ट्रवादी असल्याचे मानले जाते.

ताकाईची यांच्या समोर काही गंभीर आव्हानेही आहेत. कारण सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नाही. सरकार स्थापण्यासाठी एलडीपीने जपान इनोव्हेशन पक्षासोबत युती केली आहे. म्हणजेच टेकू घेऊन ताकाईची यांना नेतृत्व करावे लागणार आहे. त्यामुळे अस्थैर्याची टांगती तलवार सतत राहणार आहे. ही कसरत त्या कशी करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. जपानमध्ये महिला हक्कांसंदर्भात अजूनही अनेक सामाजिक अडथळे आहेत. महिलांना कामाच्या ठिकाणी समान संधी, कुटुंब आणि करिअरमधील संतुलन, राजकारणातील वाढता टक्का ही आव्हाने आहेत. राजकीयदृष्ट्या त्यांचे विचार थोडे रुढीवादी मानले जातात. तरीसुद्धा, त्यांच्या नेतृत्वामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचला आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की, कठोर परिश्रम, राजकीय कौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर महिलाही सर्वोच्च नेतृत्वपद भूषवू शकते. त्यांच्या कार्यकाळात जपानमध्ये महिलांसाठी नव्या संधी निर्माण होतात का? समाजात लिंग समानतेकडे झुकणारा बदल दिसतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यांच्या निवडीद्वारे जपानने जगाला दाखवले की नेतृत्व लिंगावर नाही, तर क्षमतेवर ठरते.

ताकाईची यांच्या कार्यकाळात भारत-जपान संबंध कसे असतील, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जागतिक माध्यमांच्या विश्लेषणानुसार, भूमध्यरेषेवरील सुरक्षा, सेमीकंडक्टर व उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडे त्या विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहतील, अशी शक्यता आहे. ताकाईची यांचा आर्थिक सुरक्षेवर अधिक भर आहे. त्यामुळे तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये त्या प्रामुख्याने लक्ष घालतील. त्यामुळे भारतासारख्या देशांसोबत तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी भागीदारी वाढू शकते. चीनच्या दबावाखाली न येता विश्वासार्ह भागीदार बळकट करण्याकडे त्यांचा कल असेल. म्हणूनच भारत-जपानमध्ये सेमीकंडक्टर, दुर्लभ पृथ्वी खनिजे, कृत्रिम प्रज्ञा (एआय) आदींमध्ये सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. ताकाईची या परराष्ट्र नीतीबाबत तज्ज्ञ मानल्या जातात. त्यामुळे चीन, तैवान व आशिय-प्रशांत प्रदेशातील सुरक्षा वातावरणावर त्या लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आहे. भारतही यातील सक्रिय घटक असल्याने जपानसह पुढे जाण्याची दिशा भारतालाही मिळू शकते. नजीकच्या काळात भारत-जपान-अमेरिका किंवा क्वाडसारख्या मल्टीलॅटरल फॉरमॅटमधील सहकार्य आणखी वाढू शकते.

ताकाईची यांचे मुख्य लक्ष आयात-निर्यात, संरक्षण आणि राष्ट्रीय प्रश्न यावर असेल. ताकाईची यांच्या नेतृत्वात भारत-जपान संबंध हे प्रगत धोरण, तंत्रज्ञान व सुरक्षा भागीदारीच्या दिशेने अधिक दृढ होण्याची शक्यता दिसते. भारत जपानकडे ‘विश्वसनीय भागीदार’ म्हणून पाहतो. पण सामाजिक व लिंग-समानतेचे मुद्दे, तसेच जगाच्या पटावरील बदलत्या राजकीय परिस्थितीचा प्रभाव हे दोन्ही विचारात घेणे गरजेचे आहे.

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थयथयाटाने जग चिंतीत आहे. जपानला अग्रेसर ठेवण्यासाठी ताकाईची यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि त्यात ट्रम्प यांच्याशी खडाखडी शक्य आहे. जपान-अमेरिका सुरक्षा करार होतो का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे अमेरिकेवर अवलंबून न राहता स्वतःची संरक्षण क्षमता वाढवण्याची जपानला गरज आहे. त्यादृष्टीने ताकाईची यांना ठोस काम करावे लागेल. संरक्षणावरील खर्च वाढवून जपानला आत्मनिर्भर बनविण्याची भूमिका त्यांनी अंगीकारली आहे. अमेरिकेसोबत भागीदारी वाढविण्यास त्या इच्छुक असतील. जपान-अमेरिका आर्थिक व व्यापार संबंधांमध्ये काही तणाव आहेत. जपानची अर्थव्यवस्था व वित्तीय स्थिती चिंतेची आहे. अत्याधिक संरक्षण खर्च व आर्थिक सुधारणा यांच्यात संतुलन साधणे हे त्यांच्या धोरणासाठी मोठे आव्हान आहे. ताकाईची या चीनविरोधी कठोर भूमिका घेणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वीची त्यांची वक्तव्ये तशीच आहेत. चीनसोबत संवाद साधताना सावधान राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. जपान व चीन शेजारी देश असून दोघांमध्ये मोठा व्यापार आहे. त्यामुळे चीनविषयीच्या धोरणात संतुलन राखणे गरजेचे आहे. चीनविरोधी वृत्ती असूनही आर्थिक यथार्थतेमुळे जपानला चीनशी संबंध राखावे लागतील. ताकाईची यांची निवड होताच चीनने म्हटले आहे की, “इतिहास, तैवान यांसारख्या मुख्य द्विपक्षीय प्रकरणांवर आपले राजकीय वचन पाळावे.” याचा अर्थ चीनच्या अपेक्षा स्पष्ट आहेत.

जपानमध्ये जीडीपी आणि सरकारी कर्ज यांच्यात मोठी तफावत आहे. शिवाय देशांतर्गत महागाई वाढत आहे. तरुण वर्गासमोर अनेक प्रश्न आहेत. रोजगार वाढवणे, वेतनात वाढ होणे, उत्पादनाला मागणी वाढणे, जन्मदर अत्यल्प असून त्यावर लक्ष केंद्रित करणे, लोकसंख्या वाढविणे, समलिंगी विवाहांना मान्यता, सामाजिक बदलांना प्रारंभ अशा सर्वच पातळ्यांवर ताकाईची यांना काम करावे लागेल. ताकाईची यांची निवड ऐतिहासिक असली तरी त्यांना मिळालेल्या संधीतून त्यांना क्रांतिकारक निर्णय घेण्याची संधीही मिळणार आहे. चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा पाहता त्यावर अंकुश ठेवणे, समविचारी देशांची मोट बांधणे, जगभरात शांतता राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे, कृत्रिम प्रज्ञेसारख्या तंत्रज्ञानात कुणाचीही मक्तेदारी तयार न होता सर्वसामान्यांना त्याचा योग्य तो लाभ मिळावा, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागेल. देशांतर्गत, परदेशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी काम करण्याची संधी त्यांना आहे. त्याचे सोने करायचे की कोळसा हे त्यांना ठरवावे लागेल.

आपल्या कर्तृत्वातून जपानसारख्या देशाला सर्वच क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, त्यासाठी लोकसहभाग वाढविणे हा त्यांचा मूलमंत्र असू शकतो. पुरुष राजकारण्यांकडून त्यांना खिंडीत गाठण्याचे उद्योग होऊ शकतात. विरोधकांवर मात करतानाच त्यांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याचे कसब जर त्यांनी पणाला लावले तर त्यांचे नेतृत्व पुढील काही दशके जपानला लाभू शकते. भारतीय संस्कृतीत लक्ष्मीपूजन हे महिलारूपी शक्तीची आराधना आहे आणि त्याच दिवशी जपानमध्ये महिलेला सर्वोच्च संधी लाभणे हे सुखकारक आहे. जपानी आणि भारतीय संस्कृती भिन्न असली तरी जगात काहीतरी विधायक व ऐतिहासिक घडते आहे, हे काय कमी आहे का?

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी