संपादकीय

आवडतो पारंपारिक दसरा

दसरा हा वर्षातला एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण सण; पण पिढी बदलते तसे सणाचे संदर्भही बदलतात

शुभांगी गोखले

आम्ही घरात अगदी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करतो. घराला तोरण बांधणं, देवीची आराधना, आरती हे सगळे उपचार पार पाडल्यानंतर मी गाड्यांची पूजा करते. त्याचप्रमाणे घरातल्या शस्त्रांचीही पूजा होते. यावेळी मेकअप बॉक्सची पूजा आवर्जून करते, कारण तेच माझं शस्त्र आहे. अर्थात आता पूर्वीसारखी नवीन कपड्यांची खरेदी केली जात नाही. पूर्वी वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी केली जात असे. आता चित्र बदललं आहे.

दसरा हा वर्षातला एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण सण; पण पिढी बदलते तसे सणाचे संदर्भही बदलतात. मूळ गाभा तोच असला तरी साजरीकरणामध्ये बदल होत असतो. दसऱ्याबाबतही हा बदल मला जाणवतो. माझ्या वेळचा दसरा वेगळा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं दिसत आहे. मला आठवतंय, दसऱ्याच्या दिवशी आम्ही सगळी मुलं खूप आनंद लुटायचो. सीमोल्लंघन करण्यासाठी वेशीबाहेर जायचो. सोनं म्हणजेच आपट्याची पानं लुटून आणत घरोघरी जाऊन थोरांच्या हाती ठेवायचो. नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचो. त्या निमित्ताने कॉलनीतले सगळे वडीलधारे एकत्र यायचे, भेटी घ्यायचे आणि अभीष्टचिंतन करून घरी परतायचे. थोडक्यात, पूर्वी ‘सोशल होणं’ हा सणांमागील मुख्य विचार होता. सर्वांनी वेशीपलीकडे जाऊन येण्यामागेही हाच एकत्र येण्याचा संदेश होता. अगदी सगळ्या भागांमध्ये हे दृश्य बघायला मिळायचं. माझं लहानपण मराठवाड्यात गेलं. त्यामुळे तिथल्या चालीरीती बघतच मी लहानची मोठी झाले आहे.

आमच्या आजूबाजूला छोटी गावं आणि शेतीवाडी होती. दसऱ्‍याच्या सुमारास शेतकऱ्याच्या हातात पैसा खुळखुळत असल्याचं समजायचं. दिवाळीला नव्हे तर दसऱ्याला नवीन कपडे घेण्याची त्यांची लगबग जाणवायची. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मोलकरणींचीही सुट्टी असायची. घटस्थापनेपूर्वी त्या ‘दसरा काढलाय’ असं म्हणायच्या. आपण दिवाळीची साफसफाई करतो तशी दसऱ्याआधी साफसफाई करणं म्हणजे दसरा काढणं. या काळात एकीकडे पाऊसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. त्यावेळी पावसाच्या सततच्या वर्षावानं आंबलेलं घर स्वच्छ करायचं, निटनेटकं करायचं, गोधड्या-वाकळ्या धुवायच्या म्हणजे दसरा काढायचा. थोडक्यात, दसऱ्‍यापूर्वी कापडाचं असेल ते सगळं धुण्याची पद्धत होती. पूर्वी अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून सणाची चाहूल लागायची. काळ पुढे सरकला तसं दसऱ्याचं हे पारंपरिक रूप बदलत गेलं. मुंबईत राहायला आल्यानंतर तर हे प्रकर्षानं जाणवलं. इथे राहायला आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस आम्ही आरे कॉलनीतल्या एका देवीच्या देवळात दर्शनाला जायचो; पण आता तेदेखील होत नाही. गर्दीत मार्ग काढणं कठीण होत असल्यामुळे तिथे जाणं टाळलं जातं.

काळजीची बाब म्हणजे आता आपल्या सणांमध्ये पाश्‍चात्त्य सण इतके बेमालूमपणे मिसळले आहेत की, मूळ सणांतला जीव हरवल्याची खंत एका पिढीला वाटते; पण या बाबीकडे दुर्लक्ष केलं तर आदिशक्तीच्या उपासनेचा, तिच्या पूजा-प्रार्थनेचा आणि रावणदहनाचा हा मुहूर्त आनंदवृद्धी करणारा असतो, यात शंका नाही. खरोखर दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या मनातला रावणही जळून जातो असं वाटतं. पावसामुळे मनंही आक्रसलेली असतात. त्यात मोकळा श्‍वास घेण्याचं, प्रकाशाला वाट मोकळी करून देण्याचं, निखळ उन्हाचं साम्राज्य पसरवण्याचं काम दसऱ्यापासून होतं. रावणदहनाला तर पौराणिक महत्त्व आहेच. खेरीज आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथाही पाळली जाते; पण सध्या आपट्याच्या नावाखाली दुसऱ्‍याच कुठल्या झाडाची पानं ओरबाडलेलीही बघायला मिळतात. ती मोठ्या प्रमाणात बाजारात आणली जातात. यामुळे वृक्षहानी होते; पण त्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. आपण हे सगळं लहान मुलांना, युवकांना सांगू शकत नाही, कारण त्यांची मनं आधीच वेगवेगळ्या विचारांमध्ये गुरफटलेली असतात. टेलिव्हिजन आणि मोबाइलमुळे त्यांना संस्कृतीने सांगितलेल्या गोष्टी ऐकण्याची आणि त्यातले घातक बदल जाणून घेण्याची गरजही वाटत नाही. त्यामुळे ही परिस्थिती तशीच कायम राहते आणि चुकीच्या अर्थानिशी सण साजरा होत राहतो.

आम्ही घरात अगदी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करतो. घराला तोरण बांधणं, देवीची आराधना, आरती हे सगळे उपचार पार पाडल्यानंतर मी गाड्यांची पूजा करते. त्याचप्रमाणे घरातल्या शस्त्रांचीही पूजा होते. यावेळी मेकअप बॉक्सची पूजा आवर्जून करते कारण, तेच माझं शस्त्र आहे; पण आता पूर्वीसारखे नवीन कपडे खरेदी केले जात नाहीत. पूर्वी वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी केली जात असे. लोक वर्षभर ठरावीक, मोजके कपडे वापरत असत. एखाद्या मामाच्या, काकाच्या अंगावर तेच ठरावीक रंगसंगतीचे कपडे पाहायला मिळायचे. त्यामुळे अगदी दुरूनही कपड्यांच्या रंगावरून त्यांची ओळख पटायची. मावशी, मामी, आत्याच्या साड्याही अगदी मोजक्या आणि ठरावीक रंगांच्याच असायच्या; पण आता तसं राहिलेलं नाही. अर्थातच, मी काही यापासून वेगळी राहिलेली नाही. मीदेखील याच प्रवाहात सामील आहे; पण ते जुने दिवस अधिक चांगले होते, असं मला वाटतं. वर्षभर साधेपणाने राहून ठरावीक दिवस मजा करायची हा संयत विचार त्यामागे होता. या मजा करण्यात कपडेलत्ते, खाणं-पिणं या सगळ्याचाच समावेश होता. एरवी आपापली कामं करायची, त्यात व्यस्त राहायचं आणि सणांच्या निमित्ताने एकत्र यायचं, हा विचार आपल्या अनेक पिढ्यांनी जपला; पण आता तो विचार मागे पडला आहे. आता आपण १२ महिने कपडे विकत घेतो. हवं तेव्हा हवं ते खातो. आहार-विहाराचे नियम आपण धाब्यावर बसवले आहेत.

पूर्वी नवरात्रीच्या काळात बहुतांश लोक उपवास करायचे. काही काळासाठी पचनव्यवस्थेला विश्रांती देण्याचा विचार अल्पाहार, फलाहारामागे होता. घरोघरी जवळपास एकसारखे उपवासाचे पदार्थ तयार व्हायचे; पण आता तसं दिसत नाही. एका इमारतीत राहणाऱ्‍या बायकांमध्येही यासंबंधी वेगळी मतं दिसतात. म्हणूनच कोणी कडक उपवास करते, तर दुसरी चार वेळा खाते. दुसरीकडे जिलब्या अथवा गुलाबजाम तळण्याचा वासही येऊ शकतो. खरं तर आपल्याकडे प्रत्येक सणाला ठरावीक पक्वान्न सांगितले आहेत. ते परंपरेनं होत राहतात. अर्थातच, त्यामागे बदलत्या हवामानाचा, भौगोलिक विषमतेचा विचार आढळतो; पण अलीकडे त्याचाही विचार होत नाही. सांगण्याचा मुद्दा हाच की आता कशातही एकसंघता राहिलेली नाही. सण साजरा करायचा म्हणजे खूप खर्च करायचा आणि त्याचं प्रदर्शन करायचं, यापलीकडे फार काही राहिलेलं नाही, असं मला वाटतं. सगळंच आता डोक्यावरून जात असलेलं बघायला मिळतं. दसराही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच आता ‘नाही आनंदा तोटा...’ही स्थिती राहिलेली आहे का, याचा विचार करावासा वाटतो. पूर्वी सणांचा आनंद वाटायचा, आता दहशत वाटते. सणपर्वामध्ये होणारी गर्दी, चेंगराचेंगरी अंगावर काटा आणते. हेदेखील अत्यंत वाईट आहे. सगळ्यांनीच भानावर येऊन याचा शांतपणे विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं.

आपली संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचं एक वेगळं स्थान आहे; पण ते जाणून न घेता आपल्या प्रत्येक गोष्टीला, सणांना नावं ठेवण्याची एक विचित्र लाट अलीकडे पाहायला मिळते. आपला एखादा सण साजरा न करता अगदी त्याच दिवशी पाश्‍चात्त्य संस्कृतीतला एखादा सण मात्र जोरदार साजरा केला जातो. काही लोक होळी साजरी करत नाहीत; पण ‘हॅलोविन’ मात्र साजरा करतात. आपण ‘हॅलोविन’ साजरा करण्याचा संबंध काय? ३१ डिसेंबरलाही तोच धूमधडाका दिसतो. खरं तर ती आपली वर्षअखेर नाही. ही आपल्यावर थोपवलेली दिनदर्शिका आहे; पण याचा विचार न करता सर्रास वर्षअखेर साजरी केली जाते. आपण कोणीही स्नो-मॅन बघितलेला नाही. आपल्याकडे बर्फ जमत नाही. पाश्‍चात्त्य देशांमध्ये फावड्यानं बर्फ काढला नाही तर तुमचं घर बर्फात बुडून जाण्याचा धोका असतो. या भौगौलिक परिस्थितीमुळे तिथे ते स्नो मॅन करतात; पण आपण ते करू लागलो तर काय अर्थ आहे? या परिस्थितीचा आता विचार करायला हवा.

नवरात्रीत मोठमोठे मांडव घालतात. रात्रभर गरबा खेळतात. तेदेखील चुकीचं आहे असं मला वाटतं. शहरांमध्ये रात्रीच्या वेळा एवढा गोंधळ करणं अगदी चुकीचं आहे. यामुळे नवीन पिढीला आपल्या सणांची तिडीक आली आहे. नवरात्रीचे उपवास, शारदोत्सव हे न बघता त्यांच्यापुढे बॉलिवूडमधल्या गाण्यांवरचे नृत्यप्रकार बघायला मिळाले तर दुसरं काय होणार? त्यापेक्षा मला एखादी वृद्ध स्त्री आपल्या घरामध्ये घटाची पूजा करत असताना पाहणं अधिक आवडतं. तिने केलेली दसऱ्‍याची साधीशी पूजा मला अधिक आकर्षित करते. आपल्या संस्कृतीने नेहमीच साधेपणाचा गौरव केला आहे. तेच सूत्र आपण सांभाळायला हवं. तरच येणारा प्रत्येक दसरा अमाप सुख देऊन जाईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले