लक्षवेधी
डॉ. संजय मंगला गोपाळ
प्रयागराज येथील गंगेच्या पाण्याविषयी आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षित मध्यमवर्गीयांनी, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची ऐतिहासिक जबाबदारी पुन्हा शिरावर घेणे आवश्यक आहे. जर अभिजनच संगमावरच्या प्रदूषित पाण्यात डुबकी मारण्यात धन्यता मानू लागले तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची ही डुबकी, भविष्यात महागात पडू शकेल!
असं म्हटलं जातं की, आपल्याकडे एखादा प्रकल्प कुठे उभारायचा, कसा उभारायचा, त्याचं डिझाईन कसं असेल याबाबतचा निर्णय त्या प्रकल्पासंदर्भातल्या तंत्र- वैज्ञानिक ज्ञानापेक्षा वा त्या विषयातील जाणकारांच्या सल्ल्यापेक्षा त्या विभागातील राजकीय नेत्याच्या लहरीवर अवलंबून असतं. आणि आली लहर केला कहर, या (अ)न्यायाप्रमाणे नेता आपल्या राजकीय- आर्थिक लाभ-स्वार्थासाठी, तंत्र वैज्ञानिक ज्ञान धाब्यावर बसवून; प्रकल्प आपल्याला हवा तसाच रेटायला लावतो. नंतर त्याबाबत दुष्परिणामांचे अहवाल आलेच, तर ते अहवालच खोटे ठरवायलाही राजकारणी व विशेषतः सत्ताधारी, अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. हे सारं आत्ताच आठवायचं कारण म्हणजे सध्या देशात महाकुंभ व तिथली आंघोळ-कुंभ स्नान- याची जी प्रचंड हवा निर्माण झाली आहे, त्याबाबत आलेले वैज्ञानिक अहवाल व त्यावर सत्ताधाऱ्यांनी चालवलेली रेटारेटी.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादा (NGT)ला दिलेल्या अहवालात प्रयागराज येथील संगमावरील पाण्यात- जिथे कोट्यवधी भाविक श्रद्धेने कुंभ स्नान करत आहेत- त्या पाण्यात फिकल कॉलिफॉर्मचे- प्रक्रिया न केलेले सांडपाणी, मानवी आणि प्राण्यांच्या मलमूत्राच्या उपस्थितीचे मुख्य सूचक घटकाचे- प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे, असा निष्कर्ष नोंदवला आहे. हा निष्कर्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फेटाळून तर लावलाच, वर पाणी दूषित झाल्याच्या बातम्या हा महाकुंभाला बदनाम करण्याच्या कटाचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खोट्या कथनाने महाकुंभ मेळ्याला बदनाम करण्याचे आणि सनातन धर्माचा अवमान करण्याचे असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दमही विज्ञानाच्या आधारे अहवाल देणाऱ्यांना व त्याचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विज्ञाननिष्ठ नागरिकांना द्यायला ते विसरलेले नाहीत! भारताचं संविधान विज्ञाननिष्ठा मानतं. उत्तर प्रदेशचे सरकार आपल्या बुलडोझर (कु) नीतीनुसार, संविधानिक वर्तन करणाऱ्या भारतीय नागरिकांना धमक्याही देत आहे. प्रकल्प वा त्याचे दुष्परिणाम याबाबत आपल्या देशात विज्ञानापेक्षा राजकारण्यांची सद्दी चालते, याचंच हे अजून एक उदाहरण!
गंगा नदीमध्ये फिकल काॅलिफॉर्मची पातळी प्रमाणापेक्षा १४०० पट आणि यमुनेमध्ये प्रमाणापेक्षा ६०० पट आढळल्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते पाणी आंघोळीकरिता अयोग्य बनल्याचा अहवाल दिला. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवाद (NGT)ने उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्याच्या समस्या वाढवल्याबद्दल समन्स बजावले. असे असूनही उत्तर प्रदेश सरकारचा दावा आहे की, सरासरी एक कोटीहून अधिक लोकांनी कुंभ यात्रेदरम्यान दररोज संगमावर स्नान केले आहे आणि जिथे हे स्नान केलं गेलं तिथलं पाणी स्नानासाठी योग्य नव्हतं, असं आता वैज्ञानिक चाचण्यांनंतर आढळून आल्याचं म्हणणे पूर्णत: चूक आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तर विधानसभेत सांगितले की, “गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावरील पाणी केवळ स्नानासाठीच नाही, तर आचमन करण्यासाठीही योग्य आहे!”
विविध धर्मीय प्रार्थना स्थळे, विविध धर्मातील धार्मिक महोत्सव, जत्रा, मेळे, मेळावे याबाबतचे जे अनुभव प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेतले आहेत, पाहिले-वाचले आहेत. त्यानुसार हिंदू धर्माच्या देऊळ-कुंभ मेळा-पवित्र संगम स्नान आदींच्या व्यवस्थेसाठी जसं सामान्य व व्हीआयपी किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ असं स्तरीकरण केलं जातं, तसं अन्य धर्मीयात केलं जाण्याचं प्रमाण कमी आहे. उदाहरणार्थ, मंदिर मुंबईतलं सिद्धिविनायकाचं असू दे, शिर्डीचं साईबाबांचं असूदे, पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचं असुदे नाहीतर तिरुपतीच्या बालाजींचं असू दे; श्रीमंत वा राजकीय- प्रशासकीय लागेबांधे असणाऱ्यांसाठी त्वरित दर्शनाची विशेष सोय व बाकी जनतेसाठी तासन्तास रांगेतलं दमणं-भागणं व मग घाईघाईत दर्शन मिळवणं अशी विषमता असते. मंदिर- श्रद्धा-उपासना या साऱ्याचं व्यावसायिकरण (commercialisation) करण्याचे हे परिणाम आहेत. त्यात सर्वच धर्मांची श्रद्धास्थाने विषम व्यवस्थेत ढकलली जात आहेत.
ज्या अर्थी मुख्यमंत्री आदित्यनाथ विधानसभेत संगम स्नानाचं पाणी केवळ डुबकी मारण्यासाठीच नाही, तर आचमन करण्यासाठी व पिण्यासाठीही चालेल असं सांगताहेत. त्या अर्थी ते कदाचित संगमावरील व्हीआयपी सेक्शनबद्दल बोलत असावेत. व्हीआयपी सेक्शनमध्ये विशेष शुद्धता व बाकी आम जनतेसाठी फिकल काॅलिफॉर्मग्रस्त पाणी, असं विभाजन असण्याची दाट शक्यता असावी! नाहीतर, संगमावरील पाण्याबाबतचे इतके विपरीत वैज्ञानिक अहवाल येत असतानाही, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला नसता आणि अनेक व्हीआयपी बिनदिक्कतपणे कुंभ स्नानास जात राहिले नसते! प्रयागराजच्या संगमावर जाण्यासाठी महागडी विमान भाडी, राहण्या-जेवणाच्या व्यवस्थेचे अव्वाच्या सव्वा भाव, रस्त्यावरील प्रचंड ट्राफिक जाम, संगमावर वा रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत भाविकांचे झालेले मृत्यू आदी सारं घडत असतानाही, कुंभमेळ्यासाठीची गर्दी काही कमी होताना दिसत नाही. पाणी प्रदूषणाचा ताजा अहवाल तर त्या पाण्याला स्पर्शच काय त्याचं दुरून दर्शनही नको, असं वाटायला लावणारा आहे! मात्र तिथे जाणाऱ्यांत प्रदूषण बोर्डाचा अहवाल कशाला म्हणतात हे ठावूक नसणारे जसे आहेत, तसे विज्ञान-तंत्रज्ञान वा अन्य शाखांतील शिक्षित व धनिक समूहही आहेत. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीसोबत स्वतःला व्यावसायिक व्यवहारात पारंगत करवून घेत, आधुनिकतेचा फायदा घ्यायचा, संपन्नता पदरात पाडून घ्यायची व समाजात प्रतिष्ठा मिळवायची आणि दुसरीकडे संगमावरचं पाणी कसंही असो, आमची गंगा पवित्र, आमची डुबकी भक्तिभावाची असं म्हणत, अवैज्ञानिक कृत्ये सार्वजनिकरीत्या करून समाजाला वैचारिकदृष्ट्या मागेच ठेवण्यात कसलाही मुलाहिजा बाळगायचा नाही, असं हे तथाकथित अभिजन वर्गाचं दुटप्पी वा विस्कळीत- विभाजित वागणं आहे!
सत्ताधाऱ्यांना नेहमीच जनतेने धर्माच्या, बाबा-बुवाच्या, मोडतोड केलेल्या इतिहासाच्या, एखाद्या खेळाच्या नाहीतर अन्य भावनिक मुद्द्याच्या गुंगीत राहावं, असं वाटत असतं. त्यामुळे समाजाला विचारी वा वैज्ञानिक दृष्टिकोनधारी बनवणं, हे काम राजकीय नेतृत्वाकडून होण्याची शक्यता नाही. प्रयागराज संगमावरील पाण्याबाबत व तिथल्या प्रदूषणाबाबत इतकी चर्चा सुरू असतानाच, देशाच्या राजधानीत दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या सारस्वतांच्या अखिल भारतीय बहुभाषिक अशा साहित्य संमेलनात श्रद्धा-अंधश्रद्धा-वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी अतिशय सुस्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘कुंकवाच्या दाबबिंदूमुळे स्त्रियांना मानसिक बळ मिळत असेल तर कुंकवाची गरज कुणाला अधिक आहे? विधवांना कुंकू लावण्यास मनाई असेल तर या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय? निसर्गधर्माने स्त्रीला दिलेल्या मासिक पाळीला विटाळ काय बोलता? एखादा तरी माणूस दाखवा की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाही. आजही कुणी म्हणतो की, माझा जन्म जैविक नाहीये, त्यावर किती विश्वास ठेवायचा?’ थोडक्यात, शिक्षित मध्यमवर्गीयांनी, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची ऐतिहासिक जबाबदारी पुन्हा शिरावर घेणे आवश्यक आहे. जर अभिजनच संगमावरच्या प्रदूषित पाण्यात डुबकी मारण्यात धन्यता मानू लागले तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची ही डुबकी, भविष्यात महागात पडू शकेल!
sansahil@gmail.com