संपादकीय

‘मौलाना’ जे ‘आझाद’ झाले

मौलाना आझादांचा अखंड भारताला पाठिंबा होता व त्याकरिता फाळणी टाळण्यासाठी तिला ठाम नकार द्यायला पाहिजे होता, असे मत व्यक्त केले होते. फाळणी कोणाच्याही फायद्याची होणार नाही हे परत परत सांगत होते. मौलाना आझाद हे महात्मा गांधींच्या या धर्मनिरपेक्ष विचाराचे वारसदार आहेत. अखंडपणे धर्मनिरपेक्ष भारताचे व संमिश्र संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून ते मौलानाही होते व आझादही होते!

नवशक्ती Web Desk

शिक्षणनामा

शरद जावडेकर

मौलाना आझादांचा अखंड भारताला पाठिंबा होता व त्याकरिता फाळणी टाळण्यासाठी तिला ठाम नकार द्यायला पाहिजे होता, असे मत व्यक्त केले होते. फाळणी कोणाच्याही फायद्याची होणार नाही हे परत परत सांगत होते. मौलाना आझाद हे महात्मा गांधींच्या या धर्मनिरपेक्ष विचाराचे वारसदार आहेत. अखंडपणे धर्मनिरपेक्ष भारताचे व संमिश्र संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून ते मौलानाही होते व आझादही होते!

देवदूताने कुतुबमिनारवरून जरी ओरडून सांगितले की, हिंदू-मुस्लिम ऐक्याशिवाय भारताला स्वातंत्र्य देतो, तर ते मी नाकारीन, कारण भारताला स्वातंत्र्य उशिरा मिळाले, तर ते भारताचे नुकसान होईल. पण हिंदू-मुस्लिम ऐक्य झाले नाही, तर ते मानवतेचे नुकसान होईल. (राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन, अध्यक्षपदावरून, मौलाना आजाद, १९२३)

“मी सनातनी हिंदू म्हणवत असलो, तरी माझ्यात सनातन्यांचे म्हणून ओळखले जाणारे गुण दिसत नाहीत. माझे हिंदुत्व सांप्रदायिक नाही. त्यात इस्लाम, ख्रिश्‍चन, बौद्ध, झरतृष्ट्र धर्मातील उत्कृष्ट गोष्टींचाही समावेश आहे.” (महात्मा गांधी, धर्मविचार)

भारतात धर्मनिरपेक्ष कल्पनेला अनेक छटा आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म नाकारणे व नास्तिक होणे हा याचा एक अर्थ मानला जातो, तर धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव असाही दुसरा अर्थ काढला जातो. सार्वजनिक जीवनात इहवादी होणे व धर्म, उपासना या वैयक्तिक ठेवणे असाही तिसरा अर्थ मानला जातो. तसेच धर्म म्हणजे नैतिकता, त्यामुळे धार्मिक राहून धर्मापलीकडे जाणे असा चौथा अर्थही काढला जातो! महात्मा गांधी या चौथ्या अर्थाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ते म्हणतात की, “माझ्या मते धर्माचा अर्थ विश्‍वाचे नैतिक शासन असा आहे. सत्य माझा धर्म व अहिंसा त्याच्या प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे! यात द्वेषाला जागा नाही.”

मौलाना आझाद हे म. गांधींच्या या धर्मनिरपेक्ष विचाराचे वारसदार आहेत. म्हणून ते मौलानाही होते व आझादही होते! इस्लाम धर्म व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, बहुभाषिक, पत्रकार, लेखक, कवी, स्वातंत्र्यलढ्याचे सेनानी, म. गांधींचे अनुयायी, द्विराष्ट्रवादाचे व जिन्हांचे प्रखर विरोधक, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थक, पहिले शिक्षणमंत्री असे अनेक पैलू मौ. आझाद यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. तसेच ‘काँग्रेसचा शो बॉय’, ‘राष्ट्रीय मुसलमान’ अशी अवहेलनाही त्यांनी सहन केली; परंतु त्यांनी भारतीय मुसलमानांच्या कल्याणाचाच विचार शेवटपर्यंत केला.

मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ मध्ये मक्का येथे झाला. त्यांचे पूर्वज सौदी अरबमधून बाबराच्या काळात भारतात आले होते. आग्रा, दिल्ली, कोलकाता येथे त्यांचे वास्तव्य झाले. त्यांचे पूर्ण नाव फिरोज बख्त असे होते. मौलाना आझाद यांच्या घरचे वातावरण प्रचंड धार्मिक होते. त्यांचे पूर्वज धर्मगुरू म्हणूनच काम करत असत. म्हणून त्यांच्या वडिलांचा आधुनिक शिक्षणावर अजिबात विश्‍वास नव्हता. आधुनिक शिक्षणामुळे धर्म, श्रद्धा नष्ट होतील असे त्यांना वाटत, असे म्हणून मुलाला मदरशांमध्ये शिक्षणाला न पाठवता त्यांनी आझादांच्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केली होती. परंपरेप्रमाणे ते पर्शियन व नंतर अरेबिक शिकले. नंतर तत्त्वज्ञान, गणित, भूमिती इत्यादी विषय ते अरेबिक भाषेत शिकले. आझाद हे कुशाग्र बुद्धीचे होते. त्यामुळे सुरुवातीचा सर्व अभ्यास त्यांनी १५-१६व्या वर्षीपर्यंत संपविला. याच वयात त्यांच्या वाचनात सर सय्यद अहमद खान यांचे लिखाण आले. आधुनिक शिक्षणाबद्दल त्यांच्या विचारांनी मौलाना आझाद प्रभावित झाले. आधुनिक शिक्षण, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य यांचे शिक्षण घेतल्याशिवाय व्यक्ती खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही हे आझादांच्या लक्षात आले. यातून इंग्रजी शिक्षणाचा त्यांनी निर्णय घेतला. शब्दकोशाचा आधार घेऊन इंग्रजी वृत्तपत्र, बायबल वाचायला त्यांनी सुरुवात केली.

‘भारत छोडो’ आंदोलनानंतर ब्रिटिशांबरोबरच्या सत्तांतराचा चर्चेत महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांबरोबरच मौलाना आझाद सहभागी होते. जिन्हा, मुस्लिम लीग व पाकिस्तानच्या मागणीला त्यांचा विरोध होता. पाकिस्तानची मागणी मुसलमानांच्या फायद्याची होणार नाही हे ते ओरडून सांगत होते. हिंदू-मुस्लिम जमातवाद एकमेकाला पूरक ठरत होता. महात्मा गांधी व मौलाना आझाद यांचे फाळणी वाचवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले व भारत हा फाळणी, रक्तपात व धार्मिक द्वेषाच्या जखमा घेऊन स्वतंत्र झाला. आपल्या आत्मचरित्रात मौलाना आझादांनी, नाइलाजाने का होईना सरदार पटेलांनी फाळणीचे समर्थन केले याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मौलाना आझादांचा अखंड भारताला पाठिंबा होता व त्यासाठी फाळणी टाळण्यासाठी फाळणीला ठाम नकार द्यायला पाहिजे होता, असे मत व्यक्त केले आहे. फाळणी कोणाच्याही फायद्याची होणार नाही हे परत परत सांगत होते.

मौलाना आझाद व जिन्हा हे समकालीन पण दोन ध्रुवावर असणारे नेते होते. गांधींप्रमाणे आझाद धार्मिक होते पण संप्रदायवादी नव्हते, तर जिन्हा हे आचार-विचार, पेहराव व विवाह याबद्दल अजिबात धार्मिक नव्हते; पण संप्रदायवादी राजकारण करून त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली! महात्मा गांधी ज्या अर्थाने धार्मिक होते त्या अर्थाने सावरकरांसह हिंदुत्ववादी मंडळी धार्मिक न राहता हिंदू संप्रदायवादी होती; पण बहुसंख्य हिंदू व भारतीयांनी सुज्ञपणे गांधींचा मार्ग स्वीकारला, तर अनेक मुस्लिमांनी जिन्हांचा मार्ग स्वीकारून मौलाना आझाद यांची भविष्यवाणी खरीच करून दाखवली!

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय शिक्षण धोरणाला जी दिशा दिली आहे ती आजही मार्गदर्शक आहे. १९४७ मध्ये भारतासारख्या नवस्वतंत्र देशांसमोर दोन आव्हाने होती. एक, आर्थिक विकासाला चालना देणारे शिक्षण धोरण राबविणे व दोन, फाळणीमुळे निर्माण झालेले द्वेषाचे वातावरण निवळण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नव्या समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच उदारमतवादी, मानवतावादी, आंतरराष्ट्रीयवादी सहिष्णुतेचा संस्कार करणारे, आधुनिक शिक्षणाचे धोरण तयार करण्यावर त्यांनी भर दिला.

सर्व वयोगटातील मुलांना सक्तीचे शिक्षण, प्रौढ शिक्षण व उच्च शिक्षणाला महत्त्व, तांत्रिक व वैज्ञानिक मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देणे व सांस्कृतिक व कला शिक्षणावर भर देणे असे एकात्मिक शिक्षणाचे धोरण त्यांनी तयार केले. नवस्वतंत्र देशाच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मूलभूत संशोधन, तंत्र शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट अँड टेक्नॉलॉजीसारख्या १४ संस्था स्थापन केल्या. मूलभूत संशोधन करणाऱ्या खासगी संस्थांना आर्थिक मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. आर्थिक विकासात उच्च शिक्षणाचे योगदान ओळखून त्याच्या पुनर्रचनेसाठी विद्यापीठ आयोग त्यांनी नेमला व त्यातून यूजीसीची स्थापना झाली. भारत हा कृषिप्रधान देश आहे हे ओळखून त्यांनी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार याला महत्त्व दिले.

शालेय शिक्षणाच्या पुनर्रचनेसाठी डॉक्टर मुदलियार आयोग नेमला गेला व ‘बहुद्देशीय शाळांची’ स्थापना त्या काळात करण्यात आली. सरंजामशाही व धार्मिक सनातनीपणा असलेल्या भारतीय समाजात लोकशाही रुजवण्यासाठी साक्षरता व समाजात शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. जाणीव जागृती करणारे प्रौढ शिक्षण असावे या भूमिकेतून प्रौढ शिक्षण साक्षरतेच्या पलीकडे गेले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इथे त्यांचे विचार पाउलो डिअरी यांच्याशी जुळतात. अनेक भाषा असलेल्या भारतासारख्या देशात सर्व भाषांना समान दर्जा दिला पाहिजे. विशिष्ट भाषा इतरांवर लादता कामा नये, शिक्षण मातृभाषेतून असावे व संपर्क भाषा म्हणून काही काळ इंग्रजी असावी, असे धोरण आझादांनी स्वीकारले. त्यांच्या राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक योगदानाचा गौरव म्हणून १९९२ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ किताब देण्यात आला व २००८ पासून त्यांची जयंती (११ नोव्हेंबर) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

सध्याच्या काळात ‘शिक्षण’ म्हणजे ‘कुशल मनुष्यबळ’ निर्माण करण्याची व्यवस्था व शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण करण्याचा प्रयत्न इतक्या संकुचित दृष्टीने शिक्षणाकडे पाहिले जाते. या पार्श्‍वभूमीवर मौलाना आझादांची शिक्षणाकडे पाहण्याची मानवतावादी व व्यापक भूमिका उठून दिसते. एवढेच नाही तर सध्या मॉब लिचिंग व इतर पद्धतीने धार्मिक विद्वेषाचे वातावरण तयार केले जात असताना मौलाना आझाद यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या संदेशाचे स्मरण करणे आवश्यक आहे. सन १९५७ मधील लेखात ते म्हणतात की, धर्म हा राष्ट्र निर्मितीचा पाया असू शकत नाही. इस्लाम या धर्माचे अनेक देश असूनही ते एकत्र येऊ शकले नाहीत. पूर्व व पश्‍चिम पाकिस्तान फार काळ एकत्र राहू शकणार नाही. पाकिस्तानमध्येसुद्धा सिंध, पंजाब व उर्वरित पाकिस्तान वेगवेगळ्या उद्देशांनी काम करतील. मौलाना आझादांची दूरदृष्टी खरी झालेली आज आपण पाहत आहोत. मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत गांधी, नेहरू, सरदार पटेल यांच्या बरोबरीने योगदान देऊनही ते उपेक्षित राहिले आहेत, कारण मुस्लिमांनी त्यांना हिंदूंचे पाठीराखे म्हणून पाहिले तर हिंदूंनी ते मुस्लिम म्हणून संशयाने पाहिले! अखंडपणे धर्मनिरपेक्ष भारताचे व संमिश्र संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून मौलाना आझादांचे स्वातंत्र्य चळवळीतील स्थान मोठे आहे. अशा या स्वातंत्र्य सेनापतीचे निधन २२ फेब्रुवारी १९५८ मध्ये झाले.

(लेखक अ.भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष आहेत.)

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश