- राहुल थोरात
भ्रम-विभ्रम
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर बुवा-बाबांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढाईत त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तसाच लढा हरियाणा राज्यातील सिरसा या गावचे एक निर्भीड पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी २० वर्षांपूर्वी सुरू केला होता. महाबलाढ्य बाबा रामरहीम याची आणि त्याच्या ‘डेरा सच्चा सौदा’ची कृष्णकृत्ये ते आपल्या दैनिकातून प्रसिद्ध करत असत. एक प्रकारे ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेच कार्य करत होते. या लढाईत त्यांनाही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखीच प्राणाची आहुती द्यावी लागली.
रामचंद्र छत्रपती यांचा जन्म हरियाणातील सिरसाठ येथे शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील होते. ते राहत असलेला भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. मग सर्व कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. या कुटुंबाला सरकारने सिरसा येथे भरपाई म्हणून शेतजमीन दिली. रामचंद्र छत्रपती हे लहानपणापासूनच धाडसी वृत्तीचे होते. त्यांच्यातील धाडसीपणा व नेतृत्वगुण पाहून त्यांचे शिक्षक एकदा त्यांना म्हणाले, “तुझ्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखी निर्भयता दिसते. त्यामुळे तुझ्या नावापुढे छत्रपती लाव.” त्यानंतर मग ते आपल्या नावासोबत ‘संधू’ या आडनावाऐवजी ‘छत्रपती’ असे नाव अभिमानाने लावू लागले.
कॉलेजमध्ये असताना रामचंद्र छत्रपती यांनी आर्य समाज, स्वामी अग्निवेश यांच्यासोबत काम केले. आर्य समाजाच्या एका मासिक पत्रिकेचे काम करण्यासाठी ते दिल्लीत राहिले होते. तिथे त्यांची पुरोगामी विचारांशी ओळख झाली. धर्म, जाती यांमुळे माणसाचे शोषण होते. देवा-धर्माच्या नावाखाली काही चतुर लोक इतर लोकांना फसवतात, हे त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. सिरसा कोर्टात वकिली चालू केली. मात्र त्यांचे मन त्यात रमेना. त्यांचा कल पत्रकारितेकडेच होता. त्यांनी दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी स्वत:चे ‘पुरा सच’ हे वर्तमानपत्र सुरु केले. हे वर्तमानपत्र सुरू करताना त्यांनी शपथ घेतली होती की, ‘पूरा सच में पूरा सच ही छपेगा’. त्यात त्यांनी तत्कालीन चौटाला सरकार आणि त्यांच्या सिरसा गावात असणाऱ्या ‘डेरा सच्चा सौदा’ या भक्तीच्या नावे सुरु असलेल्या पंथाच्या दहशती विरोधातल्या बातम्या छापायला सुरुवात केली.
रामचंद्र छत्रपती आणि बाबा रामरहीम यांचा संघर्ष
बाबा रामरहीम आपल्या आश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण करत आहे, यासंदर्भात डेऱ्यातील अज्ञात मुलीचे पत्र अचानक एके दिवशी बाहेर आले. त्याच्या झेरॉक्स सगळीकडे मिळायला लागल्या. लोक कुजबूज करायला लागले, पण समोर येऊन कोणीही बाबा विरोधात बोलत नव्हते. सिरसामध्ये ‘डेरा सच्चा सौदा’ आश्रमाने शाळा, कॉलेजेस काढली. तिथे तेथील भक्त मंडळी आपल्या मुलांसाठी अॅडमिशन घेऊ लागली. त्यातही मुला-मुलींची शाळा-कॉलेजेस वेगळी होती. या शाळा-कॉलेजमधील सुंदर मुलींना ‘पित्या’ने म्हणजे रामरहीमने सेवेसाठी बोलवले आहे, असे सांगून त्याच्या गुहेत नेले जात असे. तिथे त्यांचे बाबा रामरहीमकडून लैंगिक शोषण केले जात असे. अशा पीडित मुलींनी ‘रामरहीमने काय गैरकृत्य केले’ हे आपल्या घरी सांगितले, तर बाबाचे भक्त असलेले पालक त्या मुलींवरच अविश्वास दाखवत. बाबाविरोधी बोलणाऱ्या काहा मुलींना डेऱ्यात मारझोड केली जात असे. त्यांना आश्रमातही धड जगता येणार नाही; बाहेरही जगता येणार नाही, अशी त्यांची असहाय अवस्था केली जात असे.
पीडित मुलींचे निनावी पत्र
२००२ मध्ये ‘डेरा सच्चा सौदा’चा भांडाफोड करणारे एक निनावी पत्र एका पीडित मुलीने लिहिले. ते पत्र छापण्याचे धाडस कोणीही करेना. तेव्हा ते पत्र रामचंद्र छत्रपतींनी आपल्या ‘पुरा सच’ या सायंदैनिकात जसेच्या तसे छापले. त्यामुळे पंजाब-हरियाणात मोठी खळबळ उडाली. लोक बाबा रामरहीमच्या विरोधात कुजबूज करू लागले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पहिल्यांदाच बाबा रामरहीम याच्या विरोधात वातावरण तयार झाले. त्यामुळे पंजाब-हरियाणा हायकोर्टाने त्या मुलीच्या ‘पत्रा’ची आपण होऊन (suo moto) दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा न्यायाधीशांना आदेश दिले.
रामचंद्र छत्रपती या पत्र-प्रकरणाचे रोजचे अपडेट आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करू लागले. डेऱ्याने बळकावलेल्या जमिनींबद्दल लिहू लागले. या रामचंद्र छत्रपतीच्या पत्रकारितेमुळे आपल्या धार्मिक, आर्थिक साम्राज्याला हादरा बसू शकतो, हे चतुर रामरहीमने ओळखले, तो छत्रपतीवर हरप्रकारे दबाव टाकू लागला. भक्तांकरवी ‘अॅट्रॉसिटी’चे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या; पण रामचंद्र छत्रपती दबले नाहीत. याची परिणती त्यांच्या खुनात झाली. त्यांच्या घरामध्ये येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. हल्ला झाल्यानंतरही रामचंद्र छत्रपती १५ दिवस हॉस्पिटलमध्ये जिवंत होते. मृत्यूशी अखेरची झुंज देत होते. या वेळी पोलिसांकडे मागणी करूनही या खून खटल्यात अत्यंत महत्त्वाचा ठरला असता असा रामचंद्र छत्रपती यांचा ‘ऑन रेकार्ड’ न्यायालयीन जबाब पोलिसांनी शेवटपर्यंत नोंदवला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी मागणी करूनही एफआयआरमध्ये ‘डेरा सच्चा सौदा’ आणि बाबा रामरहीम यांची नावे पोलिसांनी नोंदवली नाहीत.
बाबा रामरहीमवर कारवाईसाठी न्यायालयीन लढा
हरियाणा सरकार व पोलीस हे संपूर्णपणे बाबा रामरहीमला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत होते. त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळणार नव्हता. डेऱ्याचे भक्त असणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पटूनही डेऱ्याचा प्रमुख रामरहीम याची साधी पोलीस चौकशी होऊ शकत नव्हती. त्यामुळे रामचंद्र छत्रपती यांच्या कुटुंबीयांनी या विरोधात पंजाब-हरियाणा हायकोर्टात जायचे ठरवले. त्यानुसार चंदीगड हायकोर्टात त्यांचा मुलगा अंशुल छत्रपती यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेत अशी मागणी केली की, ‘हरियाणा पोलीस या प्रकरणात पक्षपात करत आहे. प्राथमिक पुरावे बाबा रामरहीमच्या विरोधात असूनही त्याला आरोपी केले जात नाही. तेव्हा हे प्रकरण हरियाणा पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे द्यावे.’
कुटुंबीय कोर्टात गेल्याचा राग मनात धरून पोलिसांनी हे प्रकरण रामचंद्र छत्रपतींच्या सासुरवाडीतील एका जमिनीच्या वादातून घडले आहे, असे धादान्त असत्य पत्रकार परिषद घेऊन सांगितले गेले. या प्रकरणाला अशा रीतीने वेगळे वळण देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
या अगोदर १० जुलै २००२ रोजी ‘डेरा सच्चा सौदा’चे मॅनेजर रणजित सिंग यांचा खून झाला होता. त्यानेच ते पत्र बाहेर काढले होते, असा त्याच्यावर संशय असल्याने त्याला संपवण्यात आले. या प्रकरणामुळे बाबा रामरहीम विरोधात वातावरण तयार झाले होते, तेव्हा मॅनेजर रणजित सिंगच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या खुनाची सीबीआय चौकशी व्हावी, म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली. या दोन्ही याचिका हायकोर्टात एकत्र सुनावणीला आल्या, तेव्हा रामरहीमने दिल्लीतील सुप्रीम कोर्टातील मोठमोठे वकील प्रचंड फी देऊन विरोधात उभे केले, पण मेहेरबान कोर्टाने योग्य साक्षीपुरावे तपासून सीबीआय चौकशीची जॉईंट ऑर्डर दिली.
सीबीआय चौकशीवेळी भक्तांचे अडथळे
चंदिगड हायकोर्टाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात बाबा रामरहीम सुप्रीम कोर्टात गेला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निकालावर स्टे दिला. तेव्हा तेथील अवघड लढाईत सुप्रसिद्ध विधिज्ञ राजेंद्र सच्चर यांनी वकीलपत्र घेऊन या कुटुंबियांना मोठे सहकार्य केले. विनामोबदला त्यांनी ही केस सुप्रीम कोर्टात लढवली व दोन्ही कुटुंबियांच्या बाजूने निकाल लागला. तेव्हा कुठे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बाबा रामरहीमची सीबीआय चौकशी सुरू झाली.
तपास यंत्रणेवर सरकार आणि बाबाचा दबाव होता. ‘डेरा’चे भक्त तपासात अडथळा आणत असत. साक्षीदारांच्या गावी सीबीआय पोलीस गेले की, बाबाचे हजारो भक्त त्या गावात जमा होऊन पोलिसांचीच नाकाबंदी करत. पोलिसांना त्या गावातून बाहेर पडू देत नसत. जमाव पांगवण्यासाठी सीबीआय राज्य पोलिसांना विनंती करत, परंतु राज्य पोलीस सीबीआयला सहकार्य करत नसत, तरीही सीबीआयचे निर्भीड अधिकारी सत्यपाल सिंगजी, सतीश डागरजी आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले. या केसच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला. रामचंद्र छत्रपती यांचा खून बाबा रामरहीम यांच्या सांगण्यावरून केला गेला, असा निष्कर्ष सीबीआयने काढला आणि तो कोर्टात सिद्धही झाला. कोर्टाने बाबा रामरहीमला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. केवळ सीबीआयमुळे पत्रकार रामचंद्र छत्रपतींची हत्या, मॅनेजर रणजितिंसह यांची हत्या आणि साध्वीवरील लैंगिक अत्याचार या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता आले. हे सगळे घडत असताना कोर्टात रामरहीमचा ड्रायव्हर खट्टरसिंग यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कारण त्यांच्या समोरच खुनाचा कट रचला गेला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी ही जी बुवाबाजी विरोधी लढाई सुरू केली, ती आज ना उद्या नक्की यशस्वी होईल. या महान हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकते आहेत.)