राष्ट्रवादी विलीनीकरणाचा घोळ संपेना..! 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
संपादकीय

राष्ट्रवादी विलीनीकरणाचा घोळ संपेना..!

महाराष्ट्राचे राजकारण सध्या हिंदोळ्यावर उभे आहे. यामधून राजकीय फायदा होण्याऐवजी तोटाच होणार आहे. शरद पवार हे मुत्सद्दी नेते आहेत. मात्र आता त्यांच्या हातात फारसे काही राहिले नाही.

नवशक्ती Web Desk

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

महाराष्ट्राचे राजकारण सध्या हिंदोळ्यावर उभे आहे. यामधून राजकीय फायदा होण्याऐवजी तोटाच होणार आहे. शरद पवार हे मुत्सद्दी नेते आहेत. मात्र आता त्यांच्या हातात फारसे काही राहिले नाही.

राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार या दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा घोळ सुरूच असून काय तो एकदा सोक्षमोक्ष लावा, अजितदादांच्या पक्षात शरद पवार राष्ट्रवादी विलीन होणार की, शरद पवार राष्ट्रवादीत सत्ताधारी राष्ट्रवादी विलीन होणार यावर कुठलेही एकमत नाही. फक्त पतंग उडविण्याचे काम सुरू आहे.

अजितदादांचा मृत्यू होऊन दहा महिने उलटून गेले, तेथून हा विलीनीकरणाचा घोळ सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये शह-काटशहचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नुकताच सुनेत्रा व पार्थ पवार यांना बाहेर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले आणि त्या क्षणापासूनच विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांना पाहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली आहे. अशावेळी अजितदादा पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेऊन विलीनीकरणाबाबत चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घुमजाव केला असून ‘अजितदादा जर आज जिवंत असते तर फेब्रुवारी २०२६ मध्ये विलीनीकरण झाले असते,’ असे म्हटले आहे. यापूर्वी तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती असे म्हटले आहे. एकूण रागरंग पाहता राष्ट्रवादीमधील नेते, आमदार अस्वस्थ असल्याचे दिसते. पार्थ पवार हे अजितदादांच्या पश्चात हस्तक्षेप करून जुन्या नेत्यांना डावलून नवीन नियुक्त्या करीत आहेत. त्यामुळेच अजित पवार गटामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची सर्व सूत्रे पार्थ पवार यांच्या हातात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना डावलून प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली अमित शहांना दिल्लीमध्ये शिष्टमंडळ भेटले. तेथूनच खऱ्या अर्थाने विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली.

शरद पवार आज वयाच्या ८६ व्या वर्षी दुष्काळी दौऱ्यावर गेले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हा दौरा स्थगित करावा लागला व पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये प्रथम व नंतर ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आता तेथूनच विलीनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीमधील आमदार, खासदार निधी मिळत नसल्याने अस्वस्थ आहेत. अलीकडेच झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. आमदारांना एकत्र ठेवायचे असेल तर अर्थ खाते राष्ट्रवादीकडे पाहिजे. यासाठी जोरकस प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू आहेत. प्रारंभी यासाठीच राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेतली होती. सध्या अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. दुष्काळाची तीव्रता, मदतीसाठी आर्थिक नियोजन व कर्जमुक्ती हे तीन महत्त्वाचे प्रश्न सध्या राज्यसमोर आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री अर्थ खाते सोडण्यास विलंब लावत आहेत. राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर व त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणारा निधी यामध्ये सरकार अडकले आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचा रेटा अर्थ खाते परत मिळवण्यासाठी आहे. हे एकीकडे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये बेबनाव सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव हा राष्ट्रवादी नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

या पार्श्वभूमीवरच पुन्हा एकदा विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांच्या प्रकृतीला आराम पडो अशी भावना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून व्यक्त केली. ‘पवार साहेब तुमचे आता वय झाले आहे, प्रकृती साथ देत नाही, तेव्हा आम्ही आणि सुप्रिया सुळे कारभार पाहू’ असे मोदी यांनी म्हटल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद नसतानाही त्यांनी विधान परिषदेच्या दोन जागा जिंकल्या. यामुळे खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांना मोदींचे आलेले फोन, तसेच शिवसेना-भाजप नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पवारांची केलेली विचारपूस यामुळे खरी अस्वस्थता काँग्रेस, उबाठा या पक्षात आहे. म्हणूनच संजय राऊत, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत अशी भाषा ते करू लागले आहेत. यापूर्वीही शरद पवारांनी आपण एनडीएबरोबर जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर पडद्याआड खूप चर्चा झाल्या आणि त्यामधूनच एनडीएमध्ये जाण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शरद पवार गटांमधील आमदार, खासदारांनाही आपल्या मतदारसंघासाठी एनडीएमध्ये जाण्याची घाई झाल्याचे परवा झालेल्या आमदारांच्या बैठकीत दिसून आले. तेथूनच खऱ्या अर्थाने विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटावर हा दबाव येत असल्याने विलीनीकरण झाले पाहिजे अशा दोन्ही घटना वाटू लागल्या आहेत. आता राहिला प्रश्न, विलीनीकरण झालं तर ते कसे, अजित पवार गटाने शरद पवार गटात विलीन व्हायचे की शरद पवार गटाने अजितदादांच्या पक्षात विलीन व्हायचे, हा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

सध्या राष्ट्रवादीमधील सत्ताधारी गटात सर्व ज्येष्ठ नेते एकत्र झाले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना बाजूला करण्याचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे अजित पवार राष्ट्रवादीमध्ये प्रचंड हालचाल सुरू झाली आहे. शरद पवार यांची नेमकी खेळी काय आहे हे कोणालाच काही समजत नाही. एका बाजूला म्हणतात आपण एनडीएमध्ये जाणार नाही तर दुसऱ्या बाजूला ते वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. त्यामधूनच विलीनीकरणाचा प्रस्ताव समोर आला आहे. शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची झालेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. त्यामधूनच काही संकेत मिळू लागले आहेत. यापूर्वी २०२४ मध्ये बारामतीमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी सुनेत्रा वहिनी या बाहेरच्या आहेत असे सांगून प्रचार केला होता. त्यावरून या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर तोफ डागली होती. आजही अजितदादांच्या पश्चात सुप्रिया सुळे यांना महत्त्व आले आहे. पवारांचे राजकारण त्याच दृष्टीने सुरू आहे. या सर्व भानगडीत महत्त्वाचे अर्थ खाते राष्ट्रवादीकडे येत नाही. त्यामुळेही अस्वस्थता अधिक वाढली आहे.

महाराष्ट्राचे राजकारण सध्या हिंदोळ्यावर उभे आहे. यामधून राजकीय फायदा होण्याऐवजी तोटाच होणार आहे. शरद पवार हे मुत्सद्दी नेते आहेत. मात्र आता त्यांच्या हातात फारसे काही राहिले नाही. उबाठाची जी अवस्था आहे तीच अवस्था राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची झाल्याचे दिसते. एकूण पुढचा आठवडा हा दोन्ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो.

बांधापासून महामार्गापर्यंतचा विकास प्रवास!

आजचे राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Bhai Dooj Gift Ideas : भावाला खूश करायचंय? भाऊबीजेसाठी 'या' भेटवस्तू ठरतील परफेक्ट

Priyanka Chopra Photos : परदेशातही जपतेय भारतीय संस्कृती! निक अन् लेकीसोबत प्रियांकाची दिवाळी; पाहा खास फोटो

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई