संपादकीय

पवारांच्या भूमिकेचा संशयकल्लोळ!

संजय मलमे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याची विरोधकांची खेळीच शरद पवार यांनी बिघडवून टाकली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबतच्या कथित संबंधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसकडून लक्ष्य केले जात आहे. सर्व मोदीविरोधकही काँग्रेसला या मुद्यावर पाठिंबा देत असताना शरद पवार मात्र अदानींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अदानी समूहातील २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरही राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावर पवारांनी हात वर केले आहेत. उलट अदानी समूहावर नाहक निशाणा साधला जात असून, हे षड‌्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मुद्यातील हवाच निघून गेली आहे. पवारांच्या भूमिकेमुळे अप्रत्यक्षरीत्या नरेंद्र मोदी यांना लाभ होणार आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीविषयी उपस्थित केलेला प्रश्नही गौण असल्याची पवारांची ताजी भूमिका आहे. त्यांच्या सुरात सूर मिसळत अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मोदींची पाठराखण सुरू केली आहे. राष्ट्रवादी भाजपच्या जवळ चालली असल्याचे हे संकेत आहेत. पडद्यामागे काहीतरी शिजतंय, एवढं मात्र नक्की!

शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा त्यांनी कधीच, कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही. त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारधारेवर चालणारी असल्याचे मानले जात असले, तरी त्यांच्या या पक्षाने नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे, हेही विसरून चालणार नाही. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होत नव्हती, त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्ता स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता. २०१९ मध्येही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेशी कलह निर्माण झाला, त्यावेळी सर्वांना अंधारात ठेवत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन केले होते. हे सरकार औट घटकेचे ठरले हा भाग अलाहिदा, पण त्यामागे शरद पवार यांचीच खेळी होती, हेही आता देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यंतरीच्या विधानांवरून उघड झाले आहे. शरद पवार यांनीच तसा प्रस्ताव दिला होता, त्यावर उच्च पातळीवर चर्चा झाली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या पूर्वोत्तर राज्यातील निवडणुकीत त्यांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. एक प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची संधी असतानाही त्यांनी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. त्यांची ही भूमिका बुचकळ्यात टाकणारी होती. एकूणच काय, तर शरद पवार यांचे राजकारण नेहमीच संशयाने भरलेले राहिले आहे, याचाच प्रत्यय या घटनांवरून येतो.

कॉँग्रेसमध्येही शरद पवार यांच्याकडे नेहमीच संशयाने पाहिले गेले. १९७८ मध्ये त्यांनी कॉँग्रेसमध्ये बंड करत महाराष्ट्रातील कॉँग्रेसचे सरकार उलथवले, तेव्हापासून त्यांच्यावर विश्वासघाताचा शिक्का मारला गेला. इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये त्यांचे महाराष्ट्रातील पुलोदचे सरकार बरखास्त करत त्यांच्यासाठी कॉँग्रेसची द्वारे बंद केली. पण इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजीव गांधी यांच्याशी जवळीक साधत पुन्हा कॉँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला खरा, पण ते निष्ठावान नेत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत. त्यामुळेच राजीव गांधींच्या पश्चात १९९२ मध्ये प्रमुख दावेदार असूनही त्यांना पंतप्रधान पदापासून दूर राहावे लागले. १९९९ ला सोनिया गांधींच्या परदेशी नागरीकत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा पक्षात बंड केले. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीची स्थापना करून महाराष्ट्रात कॉँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी आघाडीच्या माध्यमातून कॉँग्रेसशीस घरोबा करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. मागील दोन दशके ते कॉँग्रेससोबत असले तरी कॉँग्रेस नेत्यांना त्यांच्यावर काडीमात्र विश्वास नाही. ते कधी दगाफटका करतील, याचा नेम नाही. राहुल गांधी यांच्या अदानीविरोधातील भूमिकेवरून त्यांना आपली संशयकल्लोळ निर्माण करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

शरद पवार कधी मोदींवर कडाडून टीका करतात, तर कधी स्तुतिसुमने उधळतात. मोदीही पवारांचा सन्मान करतात. कधी त्यांचा समाचार घेतात. त्यामुळे पवारांची मोदींविषयीची नेमकी भूमिका काय आहे, हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. गमतीचा भाग म्हणजे तीन आठवड्यांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात सर्वांनी ईव्हीएमद्वारे निवडणुका नको, अशी भूमिका घेतली. मात्र त्यांच्याच पार्टीच्या अजित पवार यांनी ईव्हीएमला आपले समर्थन दिले. विरोधक निवडणुका हरले की ईव्हीएमचा कांगावा करतात, असे ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी केवळ विरोधकांची दिशाभूल करण्याचे काम करते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. सध्याच्या स्थितीत शरद पवार हे नरेंद्र मोदींना पूरक करत आहेत, असा अनुमान काढायला नक्कीच वाव आहे. भविष्यात राष्ट्रवादी मेघालयाप्रमाणे महाराष्ट्रातही सत्तेत सहभागी झाली तर राजकीय आश्चर्य वाटायला नको.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे शिवसेना किती गंभीर परिणाम भोगतेय, हे महाराष्ट्र गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून पाहत आहे. शरद पवार यांच्यामुळे शिवसेनेची दोन शकले झाली, हे कुणीही नाकारणार नाही. महाराष्ट्रात भविष्यात भाजप-राष्ट्रवादीचा सत्तेचा नवीन प्रयोग अस्तित्वात आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची घट्ट मैत्री असतानाही बाळासाहेबांनी ही मैत्री कधी राजकीय पटावर आणली नाही. बाळासाहेब मुत्सद्दी होते. त्यांना पवारांच्या राजकीय खेळी माहीत होत्या. त्यांच्याशी कधीही राजकीय घरोबा केला नाही. १९९९ ला तशी संधी आणि प्रस्तावही आला होता. तरीही बाळसाहेबांनी तो धुडकावत विरोधी पक्षात बसणे पसंत केले. बाळासाहेबांना सत्तेपेक्षाही शिवसेना ही संघटना, तिची विचारधारा महत्त्वाची होती. पवारांनी ही तात्त्विकता राजकारणात कधीच पाळली नाही. पवारांची मोदींशी वाढती जवळीक पाहता याचा प्रत्यय येताना दिसेल.

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती