देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
‘आयर्न डोम’ या अत्याधुनिक प्रणालीद्वारे इस्रायलने केलेला बचाव... भारताने पाक दहशतवाद्यांविरुद्ध राबविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’... युक्रेनने ड्रोनद्वारे रशियाच्या ३०हून अधिक लढाऊ विमानांची केलेली राखरांगोळी... युद्धाचे स्वरुप बदलले आणि हवाई संरक्षण प्रणालीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. असे असताना भारतीय वायूदलाची सद्यस्थिती आणि भविष्य काय आहे?
मोरासमोर उभे ठाकून केल्या जाणाऱ्या पारंपरिक युद्धाचे दिवस कधीच मागे सरले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्मित झालेल्या नवनवीन आयुधांद्वारे लढाई करण्याचे दिवस आले आहेत. शत्रूला कळणारही नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर अचानक हल्ले करण्याची प्रणाली विकसित झाली आहे. खासकरून ड्रोन, मानव विरहित विमान (यूएव्ही), क्षेपणास्त्र आदींच्या माध्यमातून हवाई मार्गे अचूक हल्ले करता येणे शक्य आहे. गेल्या काही दिवसांत जगभरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यावर एक नजर टाकणे आवश्यक आहे.
पहिली घटना पश्चिम आशियातली. हमास या संघटनेने चहूबाजूने इस्रायलवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले चढवले; मात्र, इस्रायलने ‘आयर्न डोम’ या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीद्वारे आपल्या देशाचे उत्तमरीत्या रक्षण करून शत्रूला धूळ चारली. सर्व क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. दुसरी घटना दक्षिण आशियातील. गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना अद्दल तर घडविलीच पण त्यासोबत दोन महत्त्वाचे पराक्रमही केले. एकाचवेळी भारतीय शहरे आणि ठिकाणांवर लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र व ड्रोन यांचा हल्ला निकामी करण्यात यश मिळविले. तसेच, पाक सैन्याला अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या सैन्य तळांवर अचूक हल्ला करून त्यांचे जबर नुकसान केले.
तिसरी घटना रशिया-युक्रेन युद्धातली. तब्बल दीड वर्षांच्या अथक प्रयत्न आणि अचूक नियोजनाच्या माध्यमातून युक्रेनने रशियातील विविध सैन्य ठिकाणांवर दीडशे ड्रोनने रिमोट कंट्रोलद्वारे हल्ला चढविला. यात रशियाची ३०हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र वाहून नेणारी वाहने यांना नेस्तनाबूत केले. रशियाने कबुली दिल्यानंतर जगभर गहजब उडाला.
चौथी घटना अमेरिकेतली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्डन डोम’ नावाची अत्याधुनिक आणि बहुआयामी हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली. त्यासाठी तब्बल १७५ अब्ज डॉलरहून अधिक खर्च होण्याची चिन्हे आहेत.
वरील चारही घटना पाहता आपल्याला हे स्पष्ट होते की, इथून पुढे कुठल्याही देशासाठी हवाई संरक्षण प्रणाली अनन्यसाधारण महत्त्वाची असेल. ज्या देशाकडे ती नसेल किंवा कमजोर असेल त्या देशाला पराभवाचे धनी व्हावे लागेल. यात त्याचे किती नुकसान होईल? हे सांगणे अवघड आहे. लढाऊ विमानांऐवजी ड्रोन, यूएव्ही, आंतरखंडिय क्षेपणास्त्र, रडार आणि सेन्सरला चुकविणारे क्षेपणास्त्र यांचा वापर वाढणार आहे. जगभरात हवाई संरक्षण प्रणालीकडे अतिशय गांभीर्याने पाहिले जात आहे. यात संशोधन आणि विकासाला (आर अँड डी) प्राधान्य दिले जात आहे. कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा कसा प्रभावी वापर करता येईल याचीही चढाओढ आहे. खास म्हणजे, थेट उपग्रहाद्वारे ड्रोन, यूएव्ही आणि क्षेपणास्त्रांचे नियंत्रण करण्याची प्रणालीही विकसित होत आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय हवाई संरक्षण प्रणालीचा विचार करणे आवश्यक आहे.
भारतीय हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग यांनी केलेली दोन महत्त्वाची विधाने अतिशय महत्त्वाची ठरतात. भारतीय बनावटीचे चौथ्या पिढीतील लढाऊ विमान तेजस याविषयी त्यांनी ही विधाने केली. या विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी नवरत्न कंपनीशी हवाई दलाचा करार झाला आहे. सर्वात चिंतानजक बाब म्हणजे गेल्या दीड दशकात एकही तेजस विमान हवाई दलाला प्राप्त झालेले नाही. पहिले विमान कधी देण्यात येईल? सर्वच्या सर्व म्हणजे ८३ विमानांची ऑर्डर किती वर्षांत पूर्ण होईल? याबाबत संदिग्धता आहे. तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचा हा सौदा आहे. लढाऊ विमानांचे इंजिन विकसित करण्यात भारतीय संरक्षण उद्योगाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे हे इंजिन अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीकडून घेण्याचा करार एचएएलने केला. मात्र, विविध कारणांमुळे गेल्या सहा वर्षांत एकही इंजिन एचएएलला प्राप्त झालेले नाही. परिणामी भारतीय हवाई दलाला जबर फटका बसत आहे. म्हणूनच हवाई दल प्रमुखांनी दोन वेळा एचएएलच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.
भारतीय हवाई दलाकडे सध्या मिराज, जग्वार, मिग, सुखोई आणि राफेल ही लढाऊ विमाने आहेत. यातील मिराज, जग्वार आणि मिग ही जुन्या पिढीची आहेत. येत्या सात ते आठ वर्षांत ही सर्व विमाने निवृत्त होतील. भारतीय वायू दलाकडे लढाऊ विमानांच्या ४५ ते ४८ तुकड्या असणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या तुकड्यांची संख्या ३५ च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. वरील विमाने निवृत्त झाली तर या तुकड्यांची संख्या २०च्या खाली येण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत नवीन लढाऊ विमाने जर हवाई दलाला मिळाली नाही तर काय होईल? पाकिस्तान व चीनसारखे शत्रू भारताविरोधात कारवाईसाठी संधी शोधत असताना आपण असे हातावर हात धरून बसणे योग्य ठरेल का?
‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारत सरकार आणि संरक्षण विभागाने खरे तर खडबडून जागे होणे आवश्यक आहे. तेजस या लढाऊ विमानांची ऑर्डर २०३५ ते २०४० पर्यंत पूर्ण होणार असेल तर ते कितपत उपयुक्त ठरेल? दिवसागणिक तंत्रज्ञान बदलत आहे. चीनकडे सद्यस्थितीत सहाव्या पिढीची लढाऊ विमाने आहेत. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मुकाबला करणारी विमाने भारतीय वायू दलाकडे असणे अपेक्षित आहे. अवघ्या चार ते पाच वर्षांत ही सर्व तेजस विमाने मिळू शकतील का? याचा विचार व्हायला हवा. अन्यथा यातील काही विमाने युद्धपातळीवर उत्पादित करून उर्वरित ऑर्डर रद्द करायला हवी. राफेल, सुखोई ५७ सारखी आधुनिक विमाने घेण्याचाही पर्याय आहे. ही विमानेही कमीत कमी कालावधीत उपलब्ध व्हायला हवीत.
लढाऊ विमानांच्या निर्मितीस हजारो कोटी रुपये खर्च येतो. त्याऐवजी हलक्या वजनाचे ड्रोन आणि यूएव्ही यांचा पर्याय समोर आला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या अंतर्गत या दोन्ही आयुधांचे जलद गतीने उत्पादन आणि ती अत्याधुनिक स्वरूपाची असावीत याकडे लक्ष द्यायला हवे. ‘एस ४००’सारखी रशियन बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली आपण वापरत आहोत. मात्र, पाचपैकी केवळ तीनच ऑर्डर रशियाने पूर्ण केल्या आहेत. अन्य दोन केव्हा मिळतील? तसेच ही प्रणाली देशांतर्गत पातळीवर निर्माण होऊ शकेल का? याचाही विचार व्हायला हवा. आजच्या स्पर्धेच्या आणि आधुनिक काळात युद्धासारख्या आव्हानात्मक प्रसंगात दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याने पराभवाची वाट सुकर होते. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर हवाई संरक्षण प्रणालीतील विविध आयुधांच्या निर्मितीला चालना द्यायला हवी. विविध देशांकडे असलेल्या या प्रणालीचा स्वीकार करणे, तंत्रज्ञान हस्तांतरावर जोर देणे, देशांतर्गत उत्पादन वाढविणे, संशोधन आणि विकासाला सतत चालना देणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय लष्कराला तब्बल तीन दशकांनंतर नवीन तोफा उपलब्ध झाल्या. असाच वेग आपण ठेवला तर शूर व पराक्रमी सैन्याला मागास आयुधे देऊन आपण जायबंदी करणार आहोत. काळाची गती ओळखून निर्णय घेणारा आणि त्याबरोबर चालणाराच टिकतो. बाकी सर्व काळाच्या आड गायब होतात. हा निसर्ग नियम आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा ढोल बडविण्याऐवजी त्यातून योग्य तो धडा घेऊन देशाची हवाई संरक्षण प्रणाली सक्षम व सज्ज करण्यातच शहाणपण आहे. अन्यथा दहशतवादी आणि भारतीय शत्रू कधी घात करतील याचा काहीच नेम नाही.
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व मुक्त पत्रकार. bhavbrahma@gmail.com