संपादकीय

पर्यटनवाढ म्हणजे सामान्य स्थिती नव्हे

२०१८ पासून काश्मीरमधल्या पर्यटनात सतत वाढ होत असून, या वाढीकडे जम्मू-काश्मीरमधील ‘सामान्य स्थिती’कडे एक महत्त्वाचे लक्षण म्हणून पाहिले जात होते. पर्यटनात वाढ म्हणजे ‘परिस्थितीत सुधारणा’ ही व्याख्या सरकारकडून अधोरेखित केली जात होती. कारण पर्यटन हा काश्मीरच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. पण पर्यटनात वाढ याचा अर्थ काश्मीर सुरक्षित झाले, असा होतो का? हा प्रश्न आज महत्त्वाचा ठरत आहे.

नवशक्ती Web Desk

- चौफेर

- प्राजक्ता पोळ

२०१८ पासून काश्मीरमधल्या पर्यटनात सतत वाढ होत असून, या वाढीकडे जम्मू-काश्मीरमधील ‘सामान्य स्थिती’कडे एक महत्त्वाचे लक्षण म्हणून पाहिले जात होते. पर्यटनात वाढ म्हणजे ‘परिस्थितीत सुधारणा’ ही व्याख्या सरकारकडून अधोरेखित केली जात होती. कारण पर्यटन हा काश्मीरच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. पण पर्यटनात वाढ याचा अर्थ काश्मीर सुरक्षित झाले, असा होतो का? हा प्रश्न आज महत्त्वाचा ठरत आहे.

बावीस एप्रिल २०२५ काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी आहेत. काश्मीरच्या पर्यटनासाठी असलेल्या ‘पिक सिझन’मध्येच दहशतवाद्यांनी हल्ला केला. आता याचा काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रावर तर मोठा परिणाम होणार आहेच, पण काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे, हा भ्रमही दूर होणार आहे. पर्यटन हा काश्मीरच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच या केंद्रबिंदूवर होणारा हल्ला अनेक संदेश देत आहे.

काश्मीरला यापूर्वी दिलेल्या दोन भेटींचे आज स्मरण होत आहे. आजच्या परिस्थितीशी तुलना करताना या दोन भेटींमध्ये पाहिलेले वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे.

सप्टेंबर २०१७. निळेशार आकाश... त्यातून दिसणारे बर्फाचे पांढरे शुभ्र डोंगर... श्रीनगर एअरपोर्टला उतरण्याआधी विमानाच्या खिडकीतून दिसणारे ते दृश्य विलोभनीय होते. एअरपोर्टला उतरल्यावर पावलोपावली बंदूक घेऊन उभे असलेले जवान...प्रत्येक हालचालींवर त्यांची बारीक नजर होती. गाडीतून प्रवास करताना बाहेर बघितले तरी प्रत्येक प्रवाशावर त्यांची नजर होती, हे जाणवत होते. तिकडे फिरतानाही अमूक ठिकाणी काल गोळीबार झाला, बॉर्डरवर बंदुकांसह काहींना पकडले, अशा बातम्या कानावर येत होत्या. इकडे पर्यटकांवर कधीही हल्ला होत नाही, असे तिकडचे स्थानिक पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सुंदर निसर्ग अनुभवतानाही सतत दहशतीच्या छायेची जाणीव होत होती. तेव्हा ३७० कलम हटवलेले नव्हते. तेव्हाची ही परिस्थिती होती. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांना रोखण्यासाठी आणि तिकडच्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० हटवण्यात आले. केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यामागे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचे विभाजन करत दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

जानेवारी २०२२. या भेटीच्या वेळी कलम ३७० काढण्यात आलेले होते. अर्थातच तिथली परिस्थिती वेगळी होती. श्रीनगर एअरपोर्टला उतरल्यानंतर पूर्वीसारखीच सुरक्षा व्यवस्था सतर्क आहे, हे जाणवत होते. पाच वर्षांत बरेच काही बदललेले दिसत होते. रस्त्यांवर मात्र पूर्वीसारखी कडेकोट सुरक्षा व्यवस्था नव्हती. काही प्रमाणात परिस्थिती सुधारल्याचे चित्र दिसत होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर मागील काही वर्षांच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. काश्मीरमधील सुमारे ७० टक्के दहशतवादी घटनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद, दगडफेक आणि पाकिस्तान प्रायोजित हल्ल्यांचा बंदोबस्त करून शांतता प्रस्थापित केली जात आहे आणि प्रदेशाच्या विकासाचा मार्ग मोकळा केला जात आहे, असे मोदी सरकारचे म्हणणे होते. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनात पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाल्याचेही सांगण्यात येत होते.

पर्यटनातील चढउतार

मागच्याच महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, २०२४ मध्ये २.३ कोटींपेक्षा अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. राज्याच्या पर्यटन विभागानुसार, २०१८ मध्ये म्हणजेच कलम ३७० हटवण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या निर्बंधांपूर्वी सुमारे १.६ कोटी पर्यटकांनी राज्याला भेट दिली होती. यापैकी ८.३ लाख पर्यटकांनी केवळ काश्मीरला भेट दिली होती.

२०१९ मध्ये काश्मीरमध्ये लॉकडाऊन आणि प्रवास बंदीमुळे हे आकडे ५.६५ लाखांवर घसरले. त्यानंतर २०२० मध्ये, कोविड महामारीमुळे काश्मीरमध्ये केवळ ४१,००० पर्यटक आले. मात्र, कोविडनंतर या संख्येत हळूहळू वाढ झाली आणि २०२३ मध्ये दोन कोटींपेक्षा अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. यापैकी २७ लाखांहून अधिक पर्यटकांनी काश्मीर खोऱ्यात पर्यटन केले.

पर्यटन आणि महसूल

जम्मू आणि काश्मीरच्या एकूण अर्थव्यवस्थेत केवळ पर्यटनाचा वाटा आठ टक्के आहे. २०२४-२५ मध्ये, राज्याचा जीडीपी सात टक्क्यांहून अधिक दराने वाढत होता, तेव्हा त्यात पर्यटन क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा होता. २०२४ मध्ये काश्मीरचा पर्यटन उद्योग १२ हजार कोटी रुपयांचा होता, जो २०३० पर्यंत २५ ते ३० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी फक्त गुलमर्गमधून १०३ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला होता.

ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली होती भीती

मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी, मे २०२२ मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी सावध शब्दात सांगितले होते, “पर्यटन म्हणजेच सामान्य स्थिती नाही. ते फक्त आर्थिक हालचालीचे द्योतक आहे. खरी सामान्य स्थिती म्हणजे भीती न वाटणे, दहशतीचा अभाव, दहशतवाद्यांच्या मुक्त कारवायांना आळा बसणे, लोकशाही अबाधित असणे आणि या कोणत्याही निकषांवर पाहिले, तरी आजही काश्मीर या सामान्य स्थितीपासून दूर आहे.” ओमर अब्दुला यांच्या या वक्तव्याची प्रचिती पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर येत आहे. पहलगामचे महत्त्व अनेक कारणांनी आहे. अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन मार्गांपैकी एक मार्ग पहलगाममधून जातो.

हल्ल्याच्या पद्धतीतील बदल

कलम ३७० रद्द करण्याआधी पर्यटकांवर हल्ले झाल्याच्या घटना क्वचितच घडल्या आहेत. काश्मीर सरकारकडून पर्यटनाची जाहिरात करतानाही पर्यटकांवर कधीही हल्ले होत नाहीत, हेच सातत्याने अधोरेखित केले जात होते, पण जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्यानंतर, दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या स्वरूपात एक लक्षणीय बदल झालेला दिसून येतो. आता त्यांनी थेट सुरक्षा दलांवर हल्ला करतानाच, परप्रांतीयांना आणि विशेषतः गैर-मुस्लिमांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे हल्ले केवळ अंदाधुंद नसून, नियोजित, सुनिश्चित स्वरूपाचे आहेत. उदाहरणार्थ, ऑक्टोबर २०२३ मध्ये गंदरबलमध्ये झालेल्या हल्ल्यात प्रामुख्याने इतर राज्यांमधून आलेल्या कामगारांना लक्ष्य करण्यात आले, तर पहलगाम हल्ल्यात थेट पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. या दोन्ही प्रकारातून हे स्पष्टपणे लक्षात येते की, भीतीचे वातावरण निर्माण करून, विकासाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटकांवरचा हल्ला म्हणजे काश्मीरच्या आर्थिक विकासाला धक्का आहे. या हल्ल्यांमध्ये निष्पाप लोकांचे प्राण तर जात आहेतच, पण राज्यातल्या शांतता व सुरक्षेलाही धक्का लागत आहे.

नॉर्मल, सामान्य स्थितीपासून काश्मीरमधील जनता आजही कोसो दूर आहे, हेच या हल्ल्यांवरून दिसून येत आहे.

prajakta.p.pol@gmail.com

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल