मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला राज्यसभेपाठोपाठ राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत धोबीपछाड दिल्यानंतर भाजपच्या चाणक्यांनी अखेर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही आमदारांना आपल्या गळाला लावण्याच्या हालचाली करून शिवसेनेच्याच नव्हे, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या अगदी वर्मी घाव घातला आहे. त्यामुळे राज्य राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत फेकले गेले असून या राजकीय वादळात राज्यापुढील ज्वलंत प्रश्न पालापाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. महाराष्ट्रात राजकीय सत्तानाट्य रंगले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच, नाराज शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईहून रातोरात सुरत गाठल्याने राज्याच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू थेट सुरतकडे सरकला आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार राजकीय कडेलोटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्यात पहाटेचा सत्तास्थापनेचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयोग फसल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे सरकार सत्तेवर आले. तथापि, हे सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्यासाठी पडद्याआडून प्रयत्न केले गेले. या सरकारविरोधात सातत्याने आघाडी उघडून या ना त्या कारणाने आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न केले. ‘मी पुन्हा येईन’चा गजर वारंवार करण्यात आला. कधी राज्यपाल, कधी ईडी, तर कधी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठाकरे सरकारच्या वाटेत काटे पेरण्याचे प्रयत्न सातत्याने केले गेले. ठाकरे सरकार पाडण्यासाठी पडद्याआडून साम, दाम, दंड, भेद या कूटनीतीचा अवलंब करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत उध्दव ठाकरे यांना आरोग्याची समस्या भेडसावली. त्यातून बाहेर पडतात न पडतात, तोच राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पाडाव झाला. त्यापाठोपाठ राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने पुरेसे संख्याबळ पाठीशी नसतानाही, आपले पाचही उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेसची मते फुटली. भाजपच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रतिक्रिया दिली, ती फार बोलकी होती. ‘महाविकास आघाडीत काहीच आलबेल नाही. सत्ताधारी आघाडीत प्रचंड असंतोष व नाराजी आहे. त्याचे प्रत्यंतर राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसून आले आहे. त्यामुळे भाजपचा पाचवा उमेदवार सहज विजयी झाला असून ही परिवर्तनाची नांदी आहे, अशी जी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती, त्यात किती राजकीय दम आहे, हे मंगळवारच्या दिवसभराच्या राजकीय घडामोडींवरून दिसून आले आहे. राज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे, राज्यात लोकाभिमुख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इरादाही फडणवीस यांनी व्यक्त केला होता. दुसरीकडे ‘माझ्यावरही ईडी सीबीआयचा दबाव आहे, पण म्हणून मी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला नाही. मला तर सरकार पाडण्यासाठी इतक्या धमक्या आल्या, पण मी डगमगलो नाही. धमक्या आल्या म्हणून मी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली नाही. मी पक्षाशी बेईमानी गद्दारी केली नाही,’ अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली. फडणवीस आणि राऊत यांच्या विधानातून राज्यात जे काही राजकारण सुरू आहे, तेच उघडपणे ध्वनित होत आहे. शिवसेनेतील दोन नंबरचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. राज्यातील महाआघाडीच्या सरकारमध्ये तीन पक्ष असले तरी तिघांमध्येही ताळमेळ नसल्याचेच राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांमधून दिसून आलेले आहे. राज्य कारभार चालवितानाही अनेक मुद्यावरून आघाडीत कुरबूर पाहायला मिळत होती. तसेच, आघाडीतील मतभेदही जाहीरपणे व्यक्त होत होते. या कुरूबुरीला, मतभेदांना हवा देण्याचे काम भाजपच्या धुरिणांनी केले. अखेर, शिंदे यांच्यासारखा तगड्या नेत्याला वेगळे पाडण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले आहे. राज्यातील आघाडी सरकारला चारही बाजूंनी नामोहरम करण्याची रणनीती भाजपच्या चाणक्यांनी आखली असून त्या दिशेने राजकीय डाव टाकले जात आहेत. शिवसेनेत एकेकाळी छगन भुजबळ यांनी बंड केले. त्यानंतरचे एकनाथ शिंदे यांचे हे मोठे बंड मानता येईल. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा भाजपशी युती करण्याचे एकनाथ शिंदे सुचविले असले, तरी त्यांच्या या विधानाशी शिवसेना सहमत होण्याची सुतराम शक्यता नाही. उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत परत येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. त्याला शिंदे कसा प्रतिसाद देतात, यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. तूर्तास शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार डळमळीत अवस्थेत आहे, एवढे निश्चित.