बिन पैशाचा नव्हे, कोट्यवधींचा तमाशा 
संपादकीय

बिन पैशाचा नव्हे, कोट्यवधींचा तमाशा

उठसूट आंदोलन करून, रस्ते अडवून दिल्ली परिसरातील सामान्य माणसाच्या अडचणीत आपण वाढ करत आहोत, याचीही पर्वा राहुल गांधी करेनासे झाले आहेत. अशा आंदोलनामधून राहुल गांधी फारफार तर काही दिवसांचे रील स्टार होतील. या पलीकडे त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

उठसूट आंदोलन करून, रस्ते अडवून दिल्ली परिसरातील सामान्य माणसाच्या अडचणीत आपण वाढ करत आहोत, याचीही पर्वा राहुल गांधी करेनासे झाले आहेत. अशा आंदोलनामधून राहुल गांधी फारफार तर काही दिवसांचे रील स्टार होतील. या पलीकडे त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही.

दिल्लीत काँग्रेस तसेच डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू केलेले आंदोलन देशाच्या राजकीय संस्कृतीपुढे, लोकशाही व्यवस्थेपुढे अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण करणारे ठरले आहे. ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून तातडीने हटवा, अशी मागणी काँग्रेसने, डाव्या संघटनांनी केली आहे. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असतानाही काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आपल्या पक्षाच्या खासदारांना घेऊन दररोज दिल्लीतील रस्त्यावर अक्षरश: धुडगूस घालत आहेत. महाराष्ट्रात बिन पैशाचा तमाशा अशी म्हण लोकप्रिय आहे. कोणताही खर्च न करता मूर्खपणातून निर्माण झालेल्या खेळाला बिन पैशाचा तमाशा असे संबोधिले जाते. यातून बघ्यांची निश्‍चित करमणूक होते. मात्र काँग्रेस आणि डाव्या संघटनांचा हा आंदोलनाचा तमाशा बिन पैशाचा नाही, या तमाशामागे कोट्यवधींचा खर्च दररोज होत आहे. या आंदोलनासाठी भाडोत्री कार्यकर्ते आणले जात आहेत. अशा या कोट्यवधीच्या तमाशाचे सूत्रधार कोण आहेत हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मोदी सरकारला फक्त आपणच रस्त्यावर उतरून प्रखर विरोध करू शकतो, हे दाखवण्याची स्पर्धा राहुल गांधी आणि डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे. डाव्या संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी एक तरुणी बॅरिकेटवर चढून महिला पोलिसांना ढकलत असल्याचे दृश्य समाजमाध्यमांवर पसरल्यावर युवराज गांधींनाही आपण किती शूर आहोत, हे दाखवण्याची खुमखुमी आली. त्या युवतीला डाव्या संघटनांनी पद्धतशीर प्रसिद्धी दिल्यामुळे राहुल गांधींना आपला टीआरपी कमी होतो की काय अशी भीती वाटू लागली. या भीतीमुळेच त्यांनी निवडणूक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नाटक करत पोलीस बॅरिकेटवर चढून आपली लढाऊपणाची हौस भागवून घेतली. इतका बालिश, उथळ, अस्तित्वाच्या भीतीने घाबरलेला विरोधी पक्षनेता जगातील कुठल्या देशाने पाहिला नसेल. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची प्रतिष्ठा मातीमोल करण्याचा विडाच राहुल गांधींनी उचलला आहे. प्रत्येक लोकसभा अधिवेशनात गोंधळ घालून ते बंद पाडण्यात राहुल गांधींना शौर्य वाटते. दिल्लीत पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नसतानाही त्यांचे बॅरिकेट ढकलून पाडण्याचा प्रयत्न करणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे यासारख्या प्रकारामध्ये राहुल गांधींनी प्राविण्य मिळवले आहे. हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे हावभाव करत आपले विरोधी नेतेपद सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. अशा आक्रस्ताळेपणातून राहुल गांधींनी स्वत:च्या प्रतिष्ठेचे मातेरे करून घेतले आहे.

राजकारणात असली सवंग आक्रमकता उपयोगाला येत नाही, एवढे लक्षात येण्याएवढा राहुल गांधींच्या बुद्धीचा आवाका नाही. एखाद्या सरकारविरोधात कसे उभे राहावे, याचे धडे राहुल गांधींनी आपल्या आजीच्या म्हणजे इंदिरा गांधींच्या चरित्रातून घेण्याची गरज आहे. जनता पक्षाच्या राजवटीमध्ये आणीबाणीतील अत्याचाराबद्दल चौकशी करण्यासाठी शाह आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाने इंदिरा गांधींना दोषी ठरविल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस इंदिरा गांधींच्या निवासस्थानी पोहचले. इंदिरा गांधींनी कोणताच आरडाओरडा, धक्काबुक्की वगैरे न करता स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु त्याअगोदर त्यांनी दिल्लीतील तमाम पत्रकार, छायाचित्रकारांना आपल्या निवासस्थानी बोलवून घेतले. या सर्वांच्या समक्ष इंदिरा गांधींनी स्वत:ला शांतपणे अटक करवून घेतली. त्यातून त्यांनी मतदारांची सहानुभूती पद्धतशीरपणे मिळवली. याला म्हणतात धूर्त राजकारणी. राहुल गांधी अलीकडे काही न काही निमित्त करून पोलिसांशी वाद घालतात. पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रकार असो की निवडणूक आयुक्त कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करणे असो यातून राहुल गांधींना राजकारणाचे प्राथमिक ज्ञानही नाही, हेच सिद्ध होते. निवडणूक आयुक्तांकडे भेटीची वेळ न मागताच त्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करून राहुल गांधींना फक्त प्रसिद्धी मिळवायची होती, हे आता सामान्य माणसाच्याही लक्षात येऊ लागले आहे. कोणतेही संसदीय, शासकीय नियम, संकेत, कायदा पाळायचाच नाही, असा पण राहुल गांधींनी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान आदी दिल्लीतील ठिकाणी सुरक्षेचे नियम अत्यंत कडक आहेत. २२ हून अधिक वर्षे खासदार असलेल्या राहुल गांधींना या कायद्यांची, नियमांची माहिती नक्कीच असणार. तरीही हा कायदा मोडण्याचा प्रयत्न राहुल गांधी वारंवार करत आहेत. अशा प्रकारांनी तात्पुरती प्रसिद्धी मिळते, मात्र आपले नेतृत्व लोकप्रिय होत नाही, हे कळण्याएवढे राहुल गांधी अजून परिपक्व नाहीत. खरे तर असा परिपक्वपणा स्वभावात आणण्याची राहुल गांधींची इच्छाच नाही, असे दिसते. मतदार यादी दुरुस्ती अभियानावर (SIR) टीका करणाऱ्या राहुल गांधींना काँग्रेसला केरळमध्ये या अभियानानंतर विजय मिळाला आहे, हे सांगण्याएवढे धैर्य काँग्रेसच्या एकाही नेत्याकडे सध्या नाही. ईव्हीएममध्ये गडबड होते असा आरोप करणारे राहुल गांधी आपण याच ईव्हीएमवरील मतदानात सहा लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झालो आहोत, याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करतात. २०१४ मध्ये आपल्या पक्षाचे सरकार असताना भाजपला ईव्हीएमवर बहुमत मिळाले, याचाही सोयीस्कर विसर राहुल गांधींना पडतो. अशा प्रकारांमधून आपण सामान्य माणसाच्या मनातून उतरतो आहोत, हेही युवराजांना कळेनासे झाले आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीविरोधात लढत आहोत, याचाही त्यांना विसर पडला आहे. दिल्लीत आंदोलन करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुण-तरुणींशी आपली स्पर्धा आहे, असे राहुल गांधींना वाटते आहे. उठसूट आंदोलन करून, रस्ते अडवून दिल्ली परिसरातील सामान्य माणसाच्या अडचणीत आपण वाढ करत आहोत, याचीही पर्वा राहुल गांधी करेनासे झाले आहेत. अशा आंदोलनामधून राहुल गांधी फारफार तर काही दिवसांचे रील स्टार होतील. या पलीकडे त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. अर्थात हे समजण्याएवढा बुद्धीचा आवाका राहुल गांधींकडे नाही. त्यामुळे यापुढील काळात ते आणखी भडक, नाटकी होतील, यात वाद नाही.

भाजप उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश

आजचे राशिभविष्य, १३ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास फराळ! गूळ आणि राजगिऱ्यापासून बनवा स्वादिष्ट लाडू

Skin Care : उन्हामुळे टॅनिंग झालंय? घरच्या घरी असा तयार करा मसूर डाळीचा स्क्रब, त्वचा दिसेल तजेलदार

Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा

Navratri 2026 : पांढरी साडी, निळा काठ अन् पारंपरिक दागिने; शर्मिष्ठाचा नवरात्री स्पेशल लूक एकदा पाहाच