जन्मदर घटण्यामागचं खरं कारण काय? 
संपादकीय

जन्मदर घटण्यामागचं खरं कारण काय?

जगातील अनेक देशांमध्ये असंख्य जोडपी कुत्रे किंवा मांजरी पाळण्याला प्राधान्य देत आहेत. हे असे का? मुलांची जागा पाळीव प्राणी घेऊ शकतात का?

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

जगातील अनेक देशांमध्ये असंख्य जोडपी कुत्रे किंवा मांजरी पाळण्याला प्राधान्य देत आहेत. हे असे का? मुलांची जागा पाळीव प्राणी घेऊ शकतात का?

अनेक शहरांमध्ये पाळीव प्राण्यांना फॅन्सी कपडे घातलेले, स्ट्राॅलरमधून फिरवताना दिसणारे, पाळीव प्राण्यांच्या स्पर्धेत हिरिरीने सहभागी होणारे, प्रवासात आपल्या कारमध्ये प्राण्यांना सोबत ठेवणारे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे या लाडक्या प्राण्यांनी मानवी मुलांची जागा घेतली असून त्यामुळेच जन्मदरात घट होत असल्याचे बोलले जाते. दक्षिण कोरियाचे कामगार मंत्री मून सू २०२३ मध्ये म्हणाले होते की, युवक-युवती एकमेकांवर प्रेम करत नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या कुत्र्यांवर प्रेम करतात आणि त्यांना सोबत घेऊन फिरतात. ते लग्न करत नाहीत आणि त्यांना मुले होत नाहीत. त्याआधी २०२२ मध्ये पोप फ्रान्सिस यांनी म्हटले होते की, मुलांऐवजी पाळीव प्राणी निवडणारे ‘स्वार्थी’ आहेत. हे असे सुरू राहिले तर अपत्यहीनतेमुळे ‘लोकसंख्याशास्त्रीय हिवाळा’ येईल.

जगातील अनेक देश जन्मदर कमी होत असल्याच्या चिंतेत आहेत. चीनसारखा देश तर विविध सवलती आणि ऑफर्स देऊन जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जपान, तैवान या देशातही हीच स्थिती आहे. वाढती महागाई, राहणीमानाचा खर्च, बदललेली जीवनशैली आणि करिअरला दिलेले प्राधान्य यामुळे दाम्पत्य मुलांना जन्म घालत नसल्याचे सांगितले जाते. मात्र, जन्मदर कमी होण्यामागे पाळीव प्राणी हे सुद्धा कारणीभूत असल्याचे बोलले जाते. राजकारणी किंवा जुन्या विचारांचे लोक अनेकदा पाळीव प्राण्यांना दोष देतात. त्यात किती तथ्य आहे? एका संशोधन अहवालाची सध्या जगभर चर्चा होत आहे.

आजकालची तरुण पिढी कुत्रे किंवा मांजरी पाळणे पसंत करत आहेत. ज्यामुळे जन्मदर कमी होत असल्याच्या वार्ता पसरत आहेत. मात्र, तैवानमध्ये केलेल्या एका नवीन संशोधनानुसार हे मत चुकीचे असल्याचे दिसून आले आहे. अनेक दाम्पत्य मुले होण्यापूर्वीची एक पायरी म्हणून प्राणी पाळत आहेत. तैवानमध्ये अभ्यास केल्यावर संशोधकांना असे आढळले की, ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत, अशा जोडप्यांमध्ये पुढे जाऊन मुले होण्याची शक्यता ही ज्यांच्याकडे प्राणी नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त असते. म्हणजेच, कुत्रे पाळणे हे पालकत्वाची जबाबदारी पेलण्यासाठीची एक तालीम किंवा पूर्वतयारी मानली जाऊ शकते.

संशोधनात एक रंजक बाब समोर आली आहे की, हा निष्कर्ष प्रामुख्याने कुत्रे पाळणाऱ्यांच्या बाबतीत लागू होतो. याउलट, मांजरी पाळणाऱ्या लोकांमध्ये मुले होण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.

दक्षिण कोरिया किंवा तैवानसारख्या देशात, जिथे जन्मदर जगात सर्वात कमी आहे, तिथे कुत्र्यांना स्ट्रॉलरमध्ये (लहान मुलांची गाडी) फिरवण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरून असा तर्क लावला जात आहे की, प्राण्यांनी मुलांची जागा घेतली आहे, पण हा केवळ एक सांस्कृतिक बदल असून तो जन्मदर कमी होण्याचे मुख्य कारण नाही. या संशोधनाचा निष्कर्ष म्हणजे, मुले नको म्हणून दाम्पत्य कुत्रे पाळत नाहीत, तर कुत्रे पाळणारे भविष्यात मुले होण्यासाठी अधिक सकारात्मक असू शकतात, असा आहे.

कोरियाच्या तैपेई शहरातील सर्वात मोठ्या उद्यानात तुम्ही गेलात तर तुम्हाला एखादा स्ट्रोलर येताना दिसला तर त्यात बाळ नसते, मात्र एखादा पाळीव प्राणी, कुत्रा किंवा मांजर असण्याची शक्यता जास्त असते. पाळीव प्राण्यांना मुलांचा पर्याय मानण्याच्या प्रवृत्तीला जगभरात ‘पेट पॅरेंटिंग’ असे म्हटले जाते. ही बाब सध्या केवळ वैयक्तिक आवड न राहता एक मोठी सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर बनली आहे. जगभरातील सद्यस्थितीचा अभ्यास केला तर काही बाबी प्रकर्षाने समोर येतात. दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमध्ये जन्मदर जगात सर्वात कमी आहे. तिथे अनेक शहरांमध्ये लहान मुलांच्या दुकानांपेक्षा पाळीव प्राण्यांच्या वस्तूंची दुकाने (उदा. डॉग स्ट्रॉलर्स, कॅट कॅफे) अधिक दिसतात. दक्षिण कोरियात तर अलीकडे कुत्र्यांच्या गाड्यांची विक्री लहान मुलांच्या गाड्यांपेक्षा जास्त झाली आहे.

अमेरिका आणि युरोप येथे डिंक जोडप्यांचे प्रमाण वाढत आहे. म्हणजे, डबल इन्कम पण मुले नसलेले. ही जोडपी स्वतःला ‘फर बेबी’चे आई-वडील म्हणवून घेणे पसंत करतात. त्यांच्यासाठी पाळीव प्राणी हा मनोरंजनाचा भाग नसून कुटुंबाचा अविभाज्य सदस्य आहे. मूल वाढवण्याचा खर्च जसे की शिक्षण, आरोग्य, संगोपन यावर होणारा खर्च हा पाळीव प्राणी पाळण्याच्या खर्चापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळेही दाम्पत्य पाळीव प्राण्यांना प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर मुलांचे संगोपन हे किमान २० ते २५ वर्षांचे बंधन किंवा जबाबदारी असते. त्या तुलनेत पाळीव प्राण्यांच्या बाबतीत हे बंधन तुलनेने कमी कालावधीचे आणि लवचिक असते. पाळीव प्राण्यांपासून दाम्पत्यांना भावनिक आधार मिळतो. एकटेपणा दूर करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अनेक जण प्राण्यांकडे वळत आहेत, जिथे त्यांना बिनाशर्थ प्रेम मिळते. कोरोना पश्चात प्राणी पाळण्याकडील कल अधिकच वाढला आहे. भारतातही हीच स्थिती आहे. पाळीव प्राणी उद्योगात मोठी वाढ झाल्याचे जगभर दिसून येत आहे. परिणामी ‘पेट इंडस्ट्री’ अब्जावधी डॉलरची झाली आहे. प्राण्यांसाठी केवळ अन्नच नाही, तर विमा (पेट इन्शुरन्स), लक्झरी हॉटेल्स आणि डे केअर सेंटर्स, प्राण्यांवर उपचार करणारे हॉस्पिटल्स, प्राण्यांना प्रशिक्षित करणारे स्कूल्स, प्राण्यांचे मानसोपचारतज्ज्ञ, महागडे कपडे आणि दागिने आदींची मागणी वाढली आहे. हे सारे दर्शवते की, मुलांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा प्राण्यांवर खर्च करण्याला तरुणाई प्राधान्य देत आहे.

या संशोधनातून एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते. ती म्हणजे, ज्या लोकांना मुले जन्माला घालण्याचा विचार करायचा होता, ते आधी पाळीव प्राणी पाळून पाहू इच्छित आहेत. कदाचित पालकत्वासाठी आपण योग्य आहोत की नाही हे ते कमी जोखमीच्या मार्गाने आजमावत आहेत. याचा अर्थ असा की, ज्या देशांना जन्मदर वाढावा असे वाटते त्यांनी दाम्पत्यांना कुत्र्याची पिल्ले वाटायला हवीत. तज्ज्ञांच्या मते, जग एका संक्रमण काळातून जात आहे. त्यामुळे तो अतिशय आव्हानात्मक आहे. संक्रमण हे विविध कारणांनी महत्त्वाचे ठरते. त्यात अनेक प्रथा-परंपरा लोप पावतात, तर काही नव्याने जन्म घेतात. पाळीव प्राण्यांचा प्रघात हा त्यापैकीच एक म्हणावा लागेल.

अनेक देशांचे सरकार पेट पॅरेंटिंगकडे चिंतेने पाहत आहे. कारण, तरुणांनी मुलांऐवजी केवळ प्राणी पाळण्याला प्राधान्य दिले तर भविष्यात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होऊ शकते. वृद्धांची संख्या वाढून अर्थव्यवस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळेच काही देशांत मुले जन्माला घालण्यासाठी मोठी आर्थिक प्रलोभने दिली जात आहेत, तरीही लोकांचा कल पाळीव प्राण्यांकडेच जास्त दिसत आहे. काही अभ्यासक असेही मानतात की, पाळीव प्राणी हे मुलांचा ‘पर्याय’ नसून ते ‘पालकत्वाचा सराव’ आहेत. जो माणूस प्राण्यांची काळजी घेऊ शकतो, तो भविष्यात मुलांची काळजी घेण्यास अधिक सक्षम असतो, असेही काही संशोधने सांगतात.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं

मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा अखेर दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांची नावे जाणीवपूर्वक टाळल्याचा गंभीर आरोप

१ फेब्रुवारीपासून सिगारेट, गुटखा महाग; उत्पादन कर वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुण्यात युतीबाबत अजित पवार-शिवसेनेचे संकेत; महायुतीतील पेच सोडवण्यासाठी हालचाली