- शरद जावडेकर
शिक्षणनामा
११ सप्टेंबर २०२४ रोजी आचार्य विनोबा भावे यांची १२९ वी जयंती आहे. शिक्षणाबद्दलचे त्यांचे चिंतन आजही नवी अंतरदृष्टी आपल्याला देऊन जाते. त्यांचे सर्वच लिखाण ‘घागर मे सागर’ अशा स्वरूपाचे आहे. विनोबा भावे यांचे शिक्षणविषयक चिंतन विनोबा साहित्य खंड १७ मध्ये ‘शिक्षा विचार’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांचे शब्द सामर्थ्य व सोपेपणा वाचकाला अद्भूत अनुभूती देऊन जाते! त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक विचाराचा हा ओझरता आढावा.
विनायक नरहर भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ मध्ये गागोदा, ता. पेण, जि. कुलाबा (रायगड) येथे झाला. त्यांना विसाव्या शतकातील संत असेच म्हणावे लागेल! १९१६ मध्ये शाळा सोडून ते गांधींच्या साबरमती आश्रमात सामील झाले. गांधींचे शिष्य म्हणूनच त्यांची ओळख राहिली. १९४०च्या वैयक्तिक सत्याग्रहासाठी म. गांधींनी पहिला सत्याग्रही म्हणून त्यांची निवड केली. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला. अहिंसा, प्रेम व जीवनाचेच अध्यात्मिकीकरण हेच त्यांच्या विचारांचे सूत्र राहिले आहे. १९५१ रोजी त्यांनी केलेले भूदान आंदोलन ही त्याची परिणिती होती. म्हणून त्यांनी सर्वोदयाचा विचार मांडला. विज्ञान अधिक अध्यात्म (नैतिकता) म्हणजे सर्वोदय असे सूत्र विनोबांनी मांडले आहे. हवा, पाणी, सूर्यप्रकाश याप्रमाणे जमीन ही कोणाची खासगी मालमत्ता असू शकत नाही असे त्यांनी जाहीर करून ‘सब भूमी गोपालोंकी’ असा संदेशच त्यांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिला! ‘विचारात झालेला बदल, चिरस्थायी सामाजिक बदल घडवून आणतात’ असे त्यांचे मत होते.
विनोबा भावे यांचे शिक्षणविषयक चिंतन विनोबा साहित्य खंड १७ मध्ये ‘शिक्षा विचार’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी आपले विचार मांडताना शिक्षणाच्या सर्व पैलूंना स्पर्श केला आहे. शिक्षणाकडे बघण्याची नवी दृष्टी वाचकाला यातून मिळते! त्यांच्या सर्वच विचाराचा आढावा इथे घेणे शक्य नाही म्हणून त्यांच्या चिंतनाची तोंडओळख करून देण्याचा हा छोटा प्रयत्न आहे.
विनोबा म्हणतात, सध्या शिक्षणात दोन प्रमुख दोष आहेत. एक, केवळ स्मरणशक्तीवर भर व दोन, युक्तिवाद करण्याची क्षमता वाढवण्यावर भर! पोपटपंची व अक्षर ओळख म्हणजे शिक्षण नाही. ते म्हणतात, शिक्षणाचे तीन विषय आहेत. एक, योग (मनावर नियंत्रण) दोन, उद्योग (अनुभवातून शिक्षण) तीन, सहयोग (विश्वमानवता) आणि आदर्श शिक्षण प्रणालीचे त्यांचे निकष असे आहेत, आत्मसंयम, निर्भयता व विचार स्वातंत्र्य मुलांमध्ये विकसित करणे! भारतातील शिक्षणपद्धती सध्या नेमकी उलट दिशेने चालली आहे. आत्मसंयम ऐवजी चंगळवाद, उद्योग, अनुभवाऐवजी माहितीचा साठा करणे व विश्वमानवते ऐवजी आत्मकेंद्रितता सध्याच्या शिक्षणातून वाढत आहे.
शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे मूलभूत चिंतन विनोबांनी केले आहे. ते म्हणतात, जीवन हेच शिक्षण आहे. आपल्याकडे मुले पहिली वीस वर्षे जगायचे सोडून शिकत राहतात व नंतरचे आयुष्य शिकायचे विसरून जगत राहतात. आपल्याकडे जगण्याची व शिक्षणाची फारकत झाली आहे. यासाठी विनोबांनी एक छान उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, श्रीकृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला रणांगणात सांगितली. आधी वर्ग घेऊन नंतर अर्जुनाला त्याने रणांगणावर ढकलले नाही! शब्दांना अर्थ निसर्गात असतो व आपण तो कोषात शोधतो! ‘अश्व’ या शब्दाचा अर्थ शब्दकोषामध्ये ‘घोडा’ असा असतो. हा ‘अश्व’ या शब्दाचा अर्थ नाही तर तो प्रतिशब्द आहे. अश्व या शब्दाचा अर्थ तबेल्यात जाऊन पाहणे आवश्यक आहे! जीवनातून, अनुभवातून शिक्षण होत असते, असे ते म्हणतात. श्रमनिष्ठा व ज्ञाननिष्ठा यांच्यात विसंवाद न होता समन्वय साधला गेला पाहिजे म्हणून ते ‘बुनियादी तालीम’चा आग्रह धरतात. बुनियादी तालीम, हातांनी केलेले काम हेच शिक्षण आहे, असे विनोबा म्हणतात. शिक्षण हा आनंद आहे. नकळतपणे जे होते ते शिक्षण! कॅलरीचा हिशोब कागदावर नाही, तर शरीरावर दिसायला पाहिजे! शिक्षणाचा परिणाम गुणपत्रिकेवर नाही तर वर्तणुकीवर दिसायला पाहिजे! एकूणच शिक्षणावर विनोबांनी मार्मिक भाष्य केले आहे. ते म्हणतात, जगण्याच्या क्रियेबाहेर जेव्हा शिक्षण म्हणून स्वतंत्र क्रिया बनते त्यावेळेला विजातीय द्रव्य शरीरात शिरले असता जो परिणाम होतो तसाच रोगट व विषारी परिणाम मनावर होतो. अधाशीपणे खाल्लेल्या ज्ञानाचे अपचन होऊन ‘बौद्धिक डिसेंटरी’ सुरू होते व मनुष्याचा ‘नैतिक मृत्यू होतो!’ सध्या भारतात व विशेषतः शिक्षण क्षेत्रात ‘बौद्धिक डिसेंट्रीची’ साथ पसरत आहे व ‘नैतिक मृतांची’ संख्यापण वाढत आहे.
विद्यार्थी-शिक्षक संबंध, शिकणे न शिकवणे प्रक्रिया याबद्दल विनोबा म्हणतात, शिक्षक विद्यार्थी परायण, विद्यार्थी-शिक्षक परायण, दोघे ज्ञान परायण, ज्ञान सेवा परायण असावे. शिक्षण हे कामाचे अनुषांगिक फल आहे. जे दिले जात नाही व जे घेतले जात नाही ते शिक्षण!
विद्यार्थ्याने स्वतःचे चिंतन स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. विचार स्वातंत्र्यावर गदा येईल म्हणून युनियनचे सभासद विद्यार्थ्यांनी होऊ नये. सेवा परायण झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही म्हणून विद्यार्थ्यांनी सेवा परायण असावे. विद्यार्थ्यांनी विश्व नागरिकत्वाकडे गेले पाहिजे असे विनोबा विद्यार्थ्यांबद्दल सांगतात.
शिक्षक/प्राध्यापक यांबद्दल विनोबांचे भाष्य परखड व बोचरे आहे. जीवनापासून वेगळे काढलेले शिक्षण हे मुर्दाड शिक्षण आहे. त्यात शिक्षक ‘मृतजीवी’ माणूस आहे याला कुणी ‘बुद्धिजीवी’ म्हणतात! पण बुद्धिजीवी म्हणजे एखादा गौतम बुद्ध, सॉक्रेटिस, ज्ञानेश्वर! फक्त शिक्षणावर जगणारे हे ‘मृत अध्यापक’ उर्फ ‘पगारबंद शिक्षक’ आहेत. पूर्वी शिक्षकाला ‘आचार्य’ म्हणत. आचार्य म्हणजे आचरवान! जो स्वतः आचरण करतो व दुसऱ्याकडून आचरण करून घेतो तो आचार्य. अशा आचार्यांचे नैतिक दडपण समाजावर निर्माण होते म्हणून आचार्य कुलाची कल्पना विनोबांनी मांडली होती.
म. गांधींप्रमाणे विनोबांची भाषा, प्रतीके, संदर्भ धार्मिक आहेत. त्यांच्या विवेचनात वेद, उपनिषदे, कुराण, बायबल यांचे सतत संदर्भ येतात. त्यामुळे विषयाच्या महत्त्वापेक्षा गैरसमज त्याच्याबद्दल जास्त निर्माण होतात! १९७७ ला त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असे म्हटले म्हणून त्यांना ‘सरकारी संत’ म्हटले गेले होते!
तरीही विनोबा हे महाराष्ट्रातील संतपरंपरेत शोभणारे व्यक्तिमत्त्व आहे! नैतिकतेच्या परमोच्च स्तरावर राहून ते आपले चिंतन मांडतात. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर त्यांचे चिंतन अव्यवहार्य वाटण्याची शक्यता आहे! त्यांची अध्यात्मिकता देव, धर्म, परलोक यात गुंतलेली नाही, तर ही अध्यात्मिकता नैतिकता, मानवता या स्तरावरची उच्च दर्जाची आहे. व्यावहारिक खुरटलेल्या जीवनात इंचभर प्रगती करण्यासाठी तरी विनोबांच्या आदर्शवादी व उच्चतम शैक्षणिक विचारांचे सतत स्मरण करणे आवश्यक आहे!
(लेखक अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष आहेत.)
sharadjavadekar@gmail.com