(संग्रहित छायाचित्र)
संपादकीय

कार्यकर्त्यांनी सत्तेबाहेरच राहायचे काय?

निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मित्र आणि कार्यकर्ते अनेकदा सत्तेत वाटा मिळवताना दुर्लक्षित केले जातात. त्यामुळे रिपाइंचे प्रमुख कार्यकर्ते संतप्त होऊन “आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा कधी मिळणार?” असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

नवशक्ती Web Desk

विशेष

हेमंत रणपिसे

निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मित्र आणि कार्यकर्ते अनेकदा सत्तेत वाटा मिळवताना दुर्लक्षित केले जातात. त्यामुळे रिपाइंचे प्रमुख कार्यकर्ते संतप्त होऊन “आम्हाला सत्तेत पुरेसा वाटा कधी मिळणार?” असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. राज्याच्या सत्तेत महायुतीचे जे तीन भागीदार आहेत, त्यात रिपब्लिकन पक्षसुद्धा एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातले सत्तेतील प्रमुख तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. या रणधुमाळीत महायुतीतल्या मित्रपक्षांची एकमेकांच्या विरोधातली भाषणे गाजत आहेत. या निवडणुकांत मित्रपक्ष असणारे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे पक्षदेखील परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर मुरबाडमध्ये मित्रपक्षाला रावण म्हटले आहे. एकनाथ शिंदेंचे नाव न घेता त्यांच्या पक्षाला रावणाची लंका म्हणून स्वतःच्या पक्षाला राम म्हणून टोकाची टीका करणारी भूमिका घेतली आहे.

तळकोकणात सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे एक सुपुत्र हे भाजपच्या विरोधात गेले आहेत. अनेक भागांत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांची एकजुट झालेली आहे. काही ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणतेही एक ठोस युतीचे चित्र नाही. कोणी कोणाशीही युती करत आहे. कशाचा कशाला थांगपत्ता नाही. राज्यात जे मांडीला मांडी लावून सत्तेचे लोणी खात आहेत, ते पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. एकमेकांना दूषणे देत आहेत. ही राजकारणातील बेदिली पाहून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे संतप्त झाले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पिंपरी चिंचवडमध्ये नाराजीचा सूर आळवला. ते म्हणाले की, ‘रिपब्लिकन पक्षाला जागावाटपासाठी महायुतीतील मित्रपक्षांच्या मागे भीक मागत जावे लागत आहे. ही भीक मागण्याची वेळ रिपब्लिकन पक्षावर मित्रपक्षांनी आणली आहे.’ हेच काय ते फल मम तपाला’ असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.

निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला धोका देण्याची, फसविण्याची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. रिपब्लिकन पक्षाला जसा फुटीचा शाप आहे तसाच मित्रपक्षांच्या धोकेबाजीचाही शाप आहे. रिपब्लिकन पक्षाला निवडणुकांमध्ये धोका देण्याची परंपरा आहे. रिपब्लिकन पक्षाचा आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीच्या राजकारणाचा फार मोठा इतिहास आहे. रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना आहे ती या भारत देशाच्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. महामानव डॉ.. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा रिपब्लिकन पक्ष आहे. १९५४ मध्ये जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडा‌ऱ्याच्या पोटनिवडणुकीत लोकसभा निवडणुकीला उभे राहिले‌ त्यावेळी त्यांनी तत्कालीन अशोक मेहता यांच्या समाजवादी पक्षासोबत युती केली. ती युती पहिली राजकीय युती होती. त्या पहिल्या राजकीय युतीचा इतिहास आहे. अशोक मेहता जे समाजवादी नेते होते. अशोक मेहता आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून युती करून ती निवडणूक लढवली. शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढत होते. समाजवादीचे नेते म्हणून अशोक मेहता निवडणूक लढत होते. त्यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे भंडारा लोकसभा मतदारसंघात अनुयायी होते त्या सर्वांनी अशोक मेहता यांच्या समाजवादी पक्षाला भरभरून मतदान केले, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मत देण्याची वेळ आली तेव्हा समाजवादी पक्षाचे अशोक मेहतांच्या समर्थकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मतदान केले नाही. त्याचा परिणाम असा झाला की, त्या पोटनिवडणुकीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला. हा पराभव आजही त्यांचे अनुयायी विसरलेले नाहीत. १९५४च्या भंडारा लोकसभा मतदारसंघात समाजवादीसोबत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची झालेली युती आंबेडकरी चळवळीतील पहिली राजकीय युती ठरली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादी पक्षाशी केलेली युती ही आंबेडकरी चळवळीतील पहिली राजकीय मैत्री; राजकीय युती ठरली. त्या युतीला समाजवादी पक्षाने दिलेला धोका हा आंबेडकरी चळवळीला पहिला मित्रपक्षाकडून मिळालेला धोका ठरला आहे. समाजवादीसोबत झालेली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची युती फोल ठरली होती. एक चांगला प्रयत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता, मात्र मित्रपक्षाकडून त्यांना दाद मिळाली नाही. रिपब्लिकन पक्षाला मित्रपक्षाने धोका दिला, दगा दिला. या युतीच्या पहिल्या प्रयोगात रिपब्लिकन पक्षाला मित्रपक्षाकडून धोका मिळाला. तीच मित्रपक्षांची धोका देण्याची परंपरा पुढे दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाला लाभली. त्यानंतर रा. सु. गवई यांच्या नेतृत्वात; त्यानंतर रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाला ज्या ज्या मित्रपक्षासोबत रिपब्लिकनची युती झाली त्या त्या वेळेस मित्रपक्षांनी रिपाइंला निवडणुकांमध्ये धोका दिला.

या देशाचे जे भाग्यविधाते आहेत, ज्यांनी या देशात लोकशाही रुजवली, मजबूत केली. ज्यांनी पंचवार्षिक निवडणूक आणून आपली संसदीय लोकशाही मजबूत केली. त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभा निवडणुकीत २ वेळा पराभव झाला. मुंबईतील भायखळा लव्ह ग्रोव्ह मतदारसंघात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला पराभव आजही पिढ्यान‌्पिढ्या आंबेडकरी तरुणांच्या; आंबेडकरी चळवळीच्या हृदयावर भळभळणारी जखम ठरला आहे. ज्यांनी या देशाला लोकशाही शिकवली; ज्यांनी गुप्त मतदान पद्धत आणून एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणून खऱ्या अर्थाने राजकीय समता आणली, त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसच्या चालबाजीतून आणि मतविभागणीतून झाला होता.

युती धर्म हा काँग्रेस पक्षानेही कधी पाळला नाही. त्यानंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाने ज्या पक्षासोबत युती केली त्या सगळ्या पक्षांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये फसवण्याचे; त्यांना दगा देण्याचे; त्यांचा विश्वासघात करण्याचे, त्यांच्या पाठीत खंजीर खुपण्याचे काम वेळोवेळी केले. तरीही नव्या पिढीच्या नेतृत्वाने रिपब्लिकन पक्षाच्या मतपेटीची मर्यादा पाहून मित्रपक्षांशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला. राजकीय युतीचा कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे आदी शीर्ष नेतृत्वाला जरी त्याचा लाभ होत राहिला तरी संपूर्ण चळवळीचा विश्वासघात मित्रपक्षाकडून सतत होत राहिला आहे. मित्रपक्षाकडून धोका देण्याची रिपब्लिकन पक्षाला लाभलेली परंपराच आहे.

मित्रपक्षाने रिपब्लिकन पक्षाला, उमेदवारांना धोका द्यायचा, ही कायम परंपरा राहिली आहे. अपवाद एकच आहे की, १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत जेव्हा एकीकृत रिपब्लिकन पक्षाची युती झाली. काँग्रेस पक्ष तेव्हा अखंड होता आणि त्याचे नेतृत्व महाराष्ट्रात शरद पवार करीत होते. रिपब्लिकन पक्षाचे त्या काळात ऐक्य झाले होते. त्या ऐक्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रा. सु. गव‌ई हे सारे शीर्ष नेते लोकसभेत भरघोस मतांनी निवडून आले होते. हा एक अपवाद आहे तो रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामुळे! रिपब्लिकन ऐक्य झाले तर रिपब्लिकन चळवळीला कोणीही धोका देऊ शकत नाही. रिपब्लिकन पक्षाच्या पाठीत कोणी खंजीर खुपसू शकत नाही. रिपब्लिकन उमेदवारांना कोणी धोका देऊ शकत नाही. परंतु या चळवळीला फुटीचा शाप आहे. १९९८ चे जे चार खासदार होते; ते खासदारपद तेरा महिने टिकले. त्यानंतर परदेशी वंशाच्या मुद्द्याच्या प्रश्नावर शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर कोणासोबत जायचं या वादावरून प्रकाश आंबेडकर वेगळे झाले. रामदास आठवले हे शरद पवार यांच्या सोबत गेले. रिपब्लिकन ऐक्य फुटले. त्यानंतर मित्रपक्ष म्हणून शरद पवार यांच्यासोबत रामदास आठवले यांनी आपली रिपब्लिकन चळवळ पुढे घेऊन गेले. त्या बदल्यात ते पंढरपूरमधून लोकसभेवर दोन वेळा निवडून आले. स्वतःच्या चिन्हावर निवडून आले. एकदा खटारा आणि एकदा विमान या चिन्हावर रामदास आठवले लोकसभेवर निवडून आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कष्ट करणारे, घाम गाळणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जेव्हा नगरसेवक बनण्याची संधी आली त्यावेळेस २००२ च्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेत उमेदवारांनी बंडखोरी केलेली होती. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना टाळा-चावी हे एक निवडणूक चिन्ह मिळालेले होते. त्या वेळेस रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध घड्याळ चिन्ह घेऊन शरद पवारांचे सगळे उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांविरोधात उभे होते. जाहीर युती असताना अनेक राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध उघड बंडखोरी केली. काही ठिकाणी गुप्तपणे बंडखोरी करून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपण्यात आला. नंतरच्या काळात फार गाजावाजा झालेल्या बाळासाहेब ठाकरेंसोबत रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा युतीचा प्रयोग केला. तो प्रयोग खरेतर सामाजिक अभिसरणाचा प्रयोग म्हणून गौरविला गेला आहे. भीमशक्ती-शिवशक्ती एकजुटीचा इतिहास घडला आहे. त्या युतीतून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही राजकीय लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या पदरात धोंडाच पडला. सन २०१२च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग राबविण्यात आला. त्यामुळे वाढलेली मनसे मोठ्या प्रमाणात रोखता आली.

मुंबई महापालिकेवरून शिवसेनेची सत्ता जाता जाता वाचवण्यात रामदास आठवले यांना यश आले. शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकजुटीच्या प्रयोगामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली. रिपब्लिकन पक्षाला भरलेले ताट देणार असे आश्वासन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन पक्षाला दिले होते. ते सत्तेचे भरलेले ताट रिपब्लिकन कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही. ते ताट रिकामेच राहिले. मुंबई मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना शिवसेनेची साथ मिळाली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि भाजप या तिन्ही पक्षांची युती महायुती झाली. शिवशक्ती- भीमशक्ती महायुती म्हणून मुंबई महापालिका निवडणुकीला भाजप- शिवसेना-रिपाइं तिन्ही पक्ष सामोरे गेले. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना रिपब्लिकन पक्षाची मते भरभरून मिळाली. त्यातून शिवसेना- भाजप युतीची मुंबई मनपावर सत्ता आली. शिवसेना आणि भाजपच्या मतदारांनी रिपब्लिकन उमेदवारांना मतदान केले नाही. ठिकठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती. गुप्तपणे कारवाया करून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना धोका देऊन त्यांना निवडणुकीत पाडण्याचे काम केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जे मित्रपक्षांकडून धोका देण्याचे काम झाले तेच आताही मित्रपक्षांकडून रिपब्लिकन पक्षाला धोका देण्याचे काम होत आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९५४च्या भंडारा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाची मते मिळाली नाहीत. बाबासाहेबांच्या अनुयायांनी मात्र समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले. मित्रपक्षाचे मतदान रिपब्लिकन उमेदवारांना मिळाले पाहिजे. ते मिळत नाही. रिपब्लिकन पक्षाचे मतदान मित्रपक्षाला इमानेइतबारे मिळत आले आहे. मित्रपक्षाची मते रिपब्लिकन पक्षाला मिळत नाहीत, ही खंत आहे.

रिपब्लिकन पक्षाचा आज मूळ मित्रपक्ष भाजप आहे. त्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. रिपब्लिकन पक्षाला मित्रपक्षांनी जी धोका देण्याची परंपरा चालू ठेवली आहे ती परंपरा देवेंद्र फडणवीस चालू ठेवतील की मोडतील? आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतही रिपब्लिकन पक्ष आहे. अनेक ठिकाणी अजित पवारही महायुतीमध्ये आहेत. त्यांचाही पक्ष आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला धोका देण्याची परंपरा महायुतीतले मित्रपक्ष कायम ठेवतील की मोडून टाकतील? रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांचे मतदान रिपब्लिकन उमेदवारांना मिळेल का, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने पुढील काळात कृतीतून द्यायला हवे. महापालिका निवडणुकीचे घोडामैदान दूर नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणातून कोणी बेदखल करू शकत नाही. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना रिपब्लिकन उमेदवारांना धोका देण्याची परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम ठेवणार आहेत की मोडणार आहेत याचे उत्तर येत्या महापालिका निवडणुकीत आपल्याला दिसेल, तोपर्यंत मित्रपक्षांना आपला एकच प्रश्न राहील... सत्ता असूनही प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांनी सत्तेबाहेरच राहायचे काय?

प्रसिद्धी प्रमुख, रिपाइं (आठवले)

सिंहस्थ कुंभमेळ्यातील वृक्षतोडीवर मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, 'एकाही झाडाला...

Mahaparinirvan Din 2025 : इंदू मिलमध्ये साकारतंय डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक, जगातील तिसऱ्या क्रमांकाची कांस्य मूर्ती; जाणून घ्या सविस्तर

झिंग झिंग झिंगाट…लेकाच्या लग्नात अजित पवारांचा भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ

दुबार मतदारांचा मोठा घोटाळा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर निवडणुकीत विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

‘बाबासाहेबांच्या विचारांनीच विकसित भारताची पायाभरणी’; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉ. आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन