संपादकीय

भेसळीविरोधात 'कारवाईचा फेस'

भेसळयुक्त दूध आणि खाद्यपदार्थ विक्री ही गंभीर समस्या बनली असून, ती जनतेच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) वेळोवेळी कारवाई करते; मात्र अपुरी मनुष्यबळ आणि राजकीय हस्तक्षेपामुळे भेसळखोरांना मोकळीक मिळते. न्यायालयात खटले प्रलंबित राहिल्याने कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे भेसळखोरांना कायद्याचा धाक राहत नाही.

Swapnil S

महाराष्ट्रनामा

गिरीश चित्रे

भेसळयुक्त दूध आणि खाद्यपदार्थ विक्री ही गंभीर समस्या बनली असून, ती जनतेच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) वेळोवेळी कारवाई करते; मात्र अपुरी मनुष्यबळ आणि राजकीय हस्तक्षेपामुळे भेसळखोरांना मोकळीक मिळते. न्यायालयात खटले प्रलंबित राहिल्याने कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे भेसळखोरांना कायद्याचा धाक राहत नाही.

जनतेच्या आरोग्याचे कारण पुढे करत भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्यकर्त्यांकडून दिला जातो. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची; मात्र अन्न व औषध प्रशासन विभागातच अधिकारी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे भेसळखोराचे फावते. तर दुसरीकडे भेसळयुक्त दूध विक्री, भेसळयुक्त मावा मिठाईची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेल्यास राजकीय दबाव येतो आणि भेसळखोर मोकाट फिरतात. ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, यासाठी भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी काळाची गरज आहे; मात्र ठोस कारवाई होत नसल्याने भेसळयुक्त दूध विक्री विरोधात 'कारवाईचा फेस' येतो.

राज्यातील जनतेला मिळणारे खाद्यपदार्थ, दूध, मावा, मिठाई सकस असणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निकषानुसार असणे गरजेचे आहे; मात्र अनेकदा भेसळ करून ग्राहकांना भेसळयुक्त विक्री केले जाते. त्याचप्रमाणे जनतेच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना शुद्ध दूध मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग वेळोवेळी भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत असतो; मात्र कारवाईत अनेकदा विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याने भेसळखोराची न्यायालयातून सुटका होते आणि भेसळयुक्त दूध विक्रीला चालना मिळते. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना फाशीची शिक्षा असे स्वर्गिय भाजप नेते गिरीश बापट यांनी विधानसभेचे जाहीर केले होते. तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांच्या काळात भेसळयुक्त दूध विक्रीला लगाम बसणार का हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल; मात्र राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत भेसळखोरांना जेरबंद करणे काळाची गरज बनली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून भेसळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. कारवाई नंतर अनेक प्रकरणे न्यायालयात जातात; मात्र न्यायालयात अनेक खटले प्रलंबित राहतात आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. भेसळयुक्त दूध विक्री कशा प्रकारे रोखता येईल यासाठी सल्ला घेण्याचे झाल्यास स्वतंत्र सेलच नाही. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने भेसळखोरांवर पूर्ण क्षमतेने कारवाई होणे अशक्य आहे. त्यामुळे एफडीएचे मजबुतीकरण करणे रिक्त पदे भरणे, राजकीय हस्तक्षेप नसणे गरजेचे आहे. तरच भेसळखोरांवर लगाम घालणे शक्य होईल. आपल्या प्रभागात काय घडतय, चुकीचं काय चांगलं काय याची माहिती स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणांना असतेच. परंतु काही अधिकाऱ्यांमुळे कारवाईला हरताळ फासला जातो आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणारे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतात. कुठलाही यंत्रणा असो चांगले वाईट प्रत्येक गोष्टींची खबर यंत्रणेला असते. त्यामुळे फक्त सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खवा, मावा, मिठाई, भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर अखंड कारवाई सुरू राहिली, तर अन् तरचं भेसळखोरांना लगाम घालणे शक्य होईल, हेही तितकेच खरे.

भेसळयुक्त दूध, मावा मिठाई विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर तेथील नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात; मात्र प्रयोग शाळेत वेळीच नमुन्यांची तपासणी होत नाही, चार ते पाच महिन्यांचा कालावधी तपासणीसाठी जातो. अन्न सुरक्षा कायद्यात १४ दिवसांत तपासणी अहवाल उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे; मात्र अहवाल मिळण्यासाठी चार- पाच महिन्यांचा कालावधी लागत असल्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. याच गोष्टींचा फायदा भेसळ खोर घेतात आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतात. त्यामुळे फक्त घोषणा नको, तर भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तर आणि तरच भेसळखोरांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि भेसळीला आळा बसेल.

भेसळयुक्त दूध, मावा मिठाईची विक्री हे काही मुंबई शहरापूरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण राज्य देशाला भेसळयुक्त दूध खाद्यपदार्थ विक्रीचा विळखा पडला आहे. खाद्यपदार्थ, मावा मिठाई, दूध यात भेसळ करणारे कुठल्या गावात बसून हे काम करत नाही, तर ते तुम्हा आमच्या शेजारी राहूनच बेकायदा कामे करत असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. भेसळीचा कारभार आपल्या आजूबाजूला सुरू असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागास अवगत केल्यास भेसळखोरांना लगाम घालण्यात एफडीएला शक्य होईल.

'असे' ओळखा भेसळयुक्त दूध!

दुधात अर्धा चमचा सोयाबीन पावडर मिसळा आणि लिटमस पेपर घाला. लिटमस पेपरचा रंग लाल किंवा निळा झाला, तर दुधात भेसळ आहे, हे लक्षात येते.

एका पारदर्शक ग्लास मध्ये पाच मिली दूध घ्या आणि तितकेच पाणी घाला. चांगले हलवा. शुद्ध दुधात साबण तयार होणार नाही.

दुधात युरिया, फॉर्मेलिन, डिटर्जंट्स, अमोनियम सल्फेट, बोरिक ऍसिड, कॉस्टिक सोडा, बेंझोइक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, हायड्रोजन पेरॉक्साइड, शर्करा आणि मेलामाइन अशा पदार्थांची भेसळ केली जाते.

भेसळयुक्त मिठाई कशी ओळखणार!

मावा हातात घेऊन तो अंगठ्याने रगडा. जर माव्यात तेलकट पदार्थ जाणवला आणि मावा सुखा न झाल्यास तो योग्य मावा असल्याचे समजावे.

माव्याचे तुकडे तोंडात टाकताच त्याला विशिष्ट प्रकारचा तेलकट वास आला तर तो मावा भेसळयुक्त असू शकतो.

मावा हातावर काही वेळ रगडून त्याच्या वासावरुनही तो मावा चांगल्या दर्जाचा आहे की, नाही ते ओळखता येते.

gchitre4@gmail.com

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाचे सुप्रीम कोर्टात आव्हान; २४ जुलैला सुनावणी

‘...तर तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू’; अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा, चीन आणि ब्राझिललाही धमकी

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

दिव्या देशमुख, कोनेरू हम्पीची ऐतिहासिक भरारी! महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच 'अशी' कामगिरी