महाराष्ट्रातील समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकेकाळी नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचारविरोधीआंदोलन छेडले. या आंदोलनाला देशभरातील जनतेने विशेषत: तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढे हे आंदोलन संपले. त्याचबरोबर या आंदोलनाचा उद्देशही अडगळीत पडला. या आंदोलनादरम्यान देशभक्तीचे नारे मात्र जोरात घुमले, परंतु त्यातून काहीच साध्य झाले नाही. या आंदोलनानंतर जो तो आपापल्या कामाला लागला. या आंदोलनाचा फायदा उठवित भाजपमार्फत संपूर्ण देशात कॉंग्रेसविरोधात वातावरण तापविण्यात आले. परिणामी, विविध राज्यांमधीलच नव्हे, तर केंद्रातील सत्ता कॉग्रेसला सत्ता गमवावी लागली. एवढेच नव्हे, तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनही त्यांचे अस्तित्व उरले नाही. त्याकाळी महाराष्ट्रातही तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा बराच गाजावाजा करण्यात आला होता. तथापि, सत्तेसाठी पहाटेच्या समयी मेतकूट जमवण्याच्या प्रयत्नानंतर त्याच्या चौकशीतूनही पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचेही तेच झाले. नुसत्या क्लीनचिट मिळाल्या. एवढेच नव्हे, तर वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासह जवळपास ५१ घोटाळेबाजांनी देशातील नावाजलेल्या बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून ते विदेशात पसार झाले. या बड्या धेंडांना पुन्हा भारतात परत आणून तुरुंगात खडी फोडायला पाठविण्याच्या केवळ आणाभाकाच घेतल्या गेल्या. प्रत्यक्षात यापैकी कुणीही तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाही. उलट देशभरातील आर्थिक घोटाळ्यांमुळे बड्या बड्या बँकाही अडचणीत आल्या. अशाप्रकारे सामान्य गुंतवणूकदार पुरता उद्ध्वस्त झाला. त्याची कुणालाही खंत ना खेद, अशीच एकूण दयनीय स्थिती उद्भवली आहे. एकेकाळी सीबीआय, सीआयडी चौकशीची चर्चा होत असे. आता सीबीआय मागे पडून ईडीचा बालबोला सुरू झाला आहे. ईडीच्या प्रत्येक कारवाया वादात सापडत आहेत. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे या कारवाया करताना व्यक्ती कोण, त्याचा पक्ष कोणता हे पाहून कारवाया होत आहेत. त्यामुळेच ईडीचा धाक व दरारा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ईडी ही केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनल्याचेही बोलले जात आहे. राजकीय शहकाटशहाच्या राजकारणाचा एक भाग म्हणून आता नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडीने जवळपास तीन तास कसून चौकशी केली. काँग्रेस मुख्यालयातून सकाळी राहुल गांधी हे ‘ईडी’ मुख्यालयात आले, तेव्हा प्रियांका गांधी-वड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे त्यांच्यासमवेत होते. राहुल गांधी यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचे आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यालयाजवळील बॅरिकेडवर थांबल्यानंतर ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या बरगडीला दुखापत झाली. तसेच, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचीही दिल्ली पोलिसांशी खडाजंगी उडाली. देशाच्या विविध शहरांमध्येही कॉंग्रेसने निदर्शने करून ईडीच्या पक्षपाती चौकशीचा निषेध नोंदविला. राहुल गांधी यांना असिस्टंट डायरेक्टर रँकच्या तपास अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. वाटेत राहुल यांनी त्यांच्यासोबत चालणाऱ्या सुरक्षारक्षकांना त्यांची नावे विचारली. याशिवाय, तुम्ही येथे किती दिवसांपासून कार्यरत आहात? चौकशीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही असेच तपास अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाता का? असे प्रश्नदेखील विचारले. त्यावर सुरक्षा कर्मचारी व ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी स्मितहास्य करून त्यावर नेमके उत्तर देण्याचे टाळले, हे विशेष. राहुल गांधी तपास अधिकाऱ्यांच्या खोलीत पोहोचले, तेव्हा तिथे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांनी विचारणा केल्यानंतर तुम्ही बसा, साहेब येतीलच, असे त्यांना सांगण्यात आले; मात्र राहुल अधिकारी येईपर्यंत उभेच राहिले. अधिकारी पोहोचल्यानंतर त्यांनी राहुल यांना बसण्यास सांगितले. राहुल गांधींना पाणी दिले गेले. त्यांना चहा-कॉफीविषयीही विचारण्यात आले; परंतु त्यांनी सर्वच गोष्टींसाठी नकार दिला. तसेच त्यांनी एकदाही आपला मास्क काढला नाही. राहुल गांधींनी तपास अधिकाऱ्यांना त्यांचे नाव व पदाची विचारणा केली. राहुल यांनी अधिकाऱ्यांना विचारले, ‘येथे केवळ काँग्रेसच्याच नेत्यांची चौकशी होते की, तुम्ही अन्य लोकांनाही बोलावता?’ मात्र त्यांच्या या प्रश्नाचे अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. या अधिकाऱ्यांच्या सूचक मौनातून बरेच काही स्पष्ट होत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची चौकशी केली की राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता या चौकशीचेही आता राजकारण होत आहे.