दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
महाराष्ट्रात अंधश्रद्धा, भोंदू बुवाबाजी आणि श्रद्धाळूंचे शोषण याविरोधात जवळपास चार दशकांपासून सातत्याने लढा देणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत आहे. तरीही शोषण रोखण्याच्या या प्रयत्नांना काही हिंदुत्ववादी गटांचा तीव्र विरोध का होतो?
श्रद्धाळूंचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा, बुवांचा भंडाफोड करून, त्यांना कायद्याचा बडगा दाखवून अंधश्रद्धांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्रात गेली जवळपास चार दशके संघर्ष करणाऱ्या, काही विवेकवादी संघटना (अंनिस) कार्यरत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच पर्यावरणास, आरोग्यास अपायकरक ठरणाऱ्या अनिष्ट, कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरांबाबत जनतेचे प्रबोधन करून शक्य तेथे कालसुसंगत विधायक पर्याय या संघटना सुचवीत असतात. संविधानातील ५१-ए एच या अनुच्छेदानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती याचा प्रसार करणे आणि त्यांचा अंगीकार करणे हे मूलभूत कर्तव्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आणि विवेकी समाज निर्मितीचे कार्य ही चळवळ करते. या चळवळीच्या रेट्यामुळे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा पारित झाला आणि बुवाबाजीला चाप बसून पीडित बांधवांना न्याय मिळू लागला. त्यामुळे अंनिस चळवळीस सुजाण जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी या कार्यास काही हिंदुत्ववादी म्हणवणारे बांधव मात्र प्रखर विरोध करीत असतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करून या प्रवृत्तीने आपला विरोध किती टोकाचा आणि हिंसक आहे हे दाखवून दिले. विविध माध्यमांतून अंनिस चळवळीविषयी धादांत खोटी, दिशाभूल करणारी माहिती आणि अफवा प्रसारित करून, या चळवळीविषयी नकारात्मक नरेटीव्ह लोकांच्या मनावर बिंबविण्याचा उद्योग त्यांनी चालविला आहे. त्यांचा हा विरोध अंधश्रद्धेतून होणारे शोषण वाढवीत असल्याने या नरेटीव्हमधील मुद्द्यांवर विवेचन करणे आवश्यक ठरते.
तुम्हाला फक्त हिंदूंच्याच अंधश्रद्धा दिसतात का?
अन्य धर्मांकडे बोट दाखवणारा हा प्रश्न विचारून हिंदुत्ववादी हे कबूल करतात की, हिंदू धर्मात देखील अंधश्रद्धा आहेत. अंधश्रद्धा सर्वच धर्मीयांमध्ये असतात. अंनिस चळवळ ही सर्वच धर्मांतील अंधश्रद्धांना विरोध करून अनिष्ट रूढी, परंपरांना विधायक पर्याय सुचवते. कारण ज्याचे शोषण होते तो कोणत्या धर्माचा आहे हे महत्त्वाचे नसून तो मनुष्य आहे आणि त्याचे शोषण होऊ न देणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न संख्यात्मकदृष्ट्या तुलनेचा नाही. परंतु, आपल्या देशात ८० टक्के लोकसंख्या हिंदू आहे, त्यांच्यातील अंधश्रद्धांमध्ये भरपूर विविधता आहे. म्हणून संख्यात्मकदृष्ट्या हिंदूंमधील अंधश्रद्धांचे प्रमाण अधिक असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामानाने १४.२ टक्के मुस्लिम आणि २.३ टक्के ख्रिश्चन लोकांमधील अंधश्रद्धा संख्यात्मकदृष्ट्या कमी वाटू शकतात. अंनिस कार्यकर्त्यांकडे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन धर्मीय भोंदू बुवा-बाबांनी शोषण केल्याच्या तक्रारी घेऊन हिंदूच मोठ्या संख्येने येतात, हिंदुत्ववाद्यांकडे जात नाहीत. या शोषितांना न्याय देण्यासाठी आणि भोंदू बाबांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अंनिस चळवळीचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून काम करतात. यावर, या हिंदुत्ववादी बांधवांना प्रश्न विचारावासा वाटतो की, अंनिसवाल्यांनी अन्य धर्मीय भोंदू बाबांविरोधात केलेली कारवाई तुम्हाला दिसत नाही काय?
अंनिसवाले आधी ‘त्यांच्या’ अंधश्रद्धा का दूर करत नाहीत?
आधी ‘त्यांच्या’ अंधश्रद्धा दूर करा, या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो, जोपर्यंत ‘त्यांच्या’ धर्मातील अंधश्रद्धा अंनिसवाले दूर करीत नाहीत तोपर्यंत आमच्या धर्मातील अंधश्रद्धांमुळे लोकांचे होणारे शोषण होऊ द्यावे. हे म्हणजे आधी दुसऱ्यांच्या घरातील कचरा साफ करा, मग आमच्या घरातील कचरा काढायला या, असे होते. यावर प्रश्न पडतो की जगातील सर्वात प्राचीन आणि जगाला मार्गदर्शन करणारा विश्वगुरू हिंदू धर्म, आधी आपल्या धर्मातील अंधश्रद्धा दूर करून, धर्मात कालसुसंगत सुधारणा करून जगातील सर्व धर्मांपुढे आदर्श घालून देण्याऐवजी अन्य धर्मांत सुधारणा कधी होणार याची वाट पाहून त्यांचे अनुकरण करणार आहे काय? हिंदुत्ववादी आपल्याच धर्माचे किती अवमूल्यन करीत आहेत याची जाणीव तरी त्यांना आहे का? विशेष म्हणजे हिंदुत्ववादी वगळता अन्य धर्मीय लोक अंनिस चळवळीस असा प्रश्न करत नाहीत.
अंनिसवाले हिंदूविरोधी आहेत
फसवणूक, शोषण करणाऱ्या बाबा-बुवास विरोध केला, पर्यावरणपूरक गणपती, होळी, दिवाळीचे आवाहन केले की लगेच अंनिसवाले हिंदूविरोधी आहेत अशा आरोळ्या ठोकल्या जातात. त्या वेळेस हिंदुत्ववादी हे विसरतात की शोषण करणारा बाबा आपल्याच हिंदू बांधवांचे शोषण करतोय. सणवारांतील काही अनिष्ट बाबींमुळे पर्यावरणास हानी पोहोचून जे जल-जमीन-वायू प्रदूषण होते, हवामान बदल होऊन अतिवृष्टी, दुष्काळ, वादळे येतात त्याचा फटका हिंदू बांधवांना सुद्धा तेवढाच बसतो जेवढा अन्य धर्मीयांना बसतो. म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारांनी सुद्धा पर्यावरणपूरक गणपती, दिवाळी, होळी उत्सव साजरे करण्याची, मूळची अंनिस चळवळीची आवाहने, वेळोवेळी केलेली आहेत. तरीही अंनिस चळवळ मात्र यांच्या लेखी हिंदूविरोधी? अंनिस चळवळ ही हिंदूच काय कोणत्याही धर्माच्या, श्रद्धेच्या विरोधात नाही. कारण धर्म, श्रद्धा, आस्था स्वातंत्र्याचा संविधानाने सर्वांना दिलेल्या मूलभूत अधिकाराचा ही चळवळ आदर करते. केवळ शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना आणि त्यातून होणाऱ्या हिंदू बांधवांच्या शोषणास अंनिस रोखत असेल किंवा अनिष्ट, कालबाह्य रूढी, परंपरांना कालसुसंगत पर्याय देत असेल तर ते कृत्य हिंदू धर्मविरोधी कसे असू शकते? अंनिस चळवळ मुस्लिमांच्या बकरी ईदच्या वेळेस रक्तदान शिबिर आयोजित करून बकरा बळी टाळण्यासाठी आवाहन करते. फटाकेमुक्त नाताळाचे आवाहन ख्रिस्ती बांधवांना करते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्यसनमुक्ती अभियान राबवून मद्यपानास विरोध करते. जर अंनिस चळवळीचे हे कार्य धर्मविरोधी असेल तर हिंदुत्ववादी अंनिसवर खटले दाखल का करत नाहीत? कारण, त्यांना हे माहिती आहे की देशवासीयांचे शोषण रोखणे हा अपराध होऊ शकत नसल्याने न्यायालयात खटले टिकू शकणार नाहीत.
मुस्लिम किंवा ख्रिश्चन बाबांचे अधिकांश अनुयायी हे हिंदूच असतात हा उल्लेख वर आलेला आहे. वसईतील सबॅस्टीयन मार्टिन या मंत्रोच्चाराने आजार बरे करणाऱ्या भोंदू बाबाकडे ‘उपचार’ घेणारे बहुसंख्य लोक हिंदूच होते. गेल्या काही वर्षांत बंगाली बाबांचे पीक कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे सर्वत्र उगवले आहे. या बंगाली बाबांमध्ये बहुसंख्य बाबा हे मुस्लिम असतात. त्यांचेही अनुयायी आणि बळी हे हिंदूच असतात, जे अंनिसवाल्यांकडे नंतर तक्रारी घेऊन येतात. म्हणून, या हिंदुत्ववाद्यांना सल्ला द्यावासा वाटतो की आपले हिंदू बांधव या अन्य-धर्मीय भोंदू बाबांकडे, खरे तर कोणत्याही धर्माच्या भोंदू बाबांकडे जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत.
या स्वतःला धर्मरक्षक म्हणविणाऱ्या हिंदुत्ववादी प्रवृत्तींच्या अंनिस विरोधामुळे खरे तर हिंदूंचेच शोषण करणाऱ्या भोंदू बुवा, बाबांना बळ लाभत आहे आणि त्यांचे बळी मुख्यतः हिंदूच ठरत आहेत. विवेकाची आणि आधुनिक विज्ञानाची कास धरण्याऐवजी समाजाची पावले मागे पडत आहेत. म्हणून, लोकांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबांविरोधात आवाज उठवून, शोषण रोखणाऱ्या अंनिस चळवळीस तुमचा विरोध का, असा प्रश्न आता लोकांनीच या हिंदुत्ववाद्यांना विचारला पाहिजे आणि संविधानातील ५१-ए एच या अनुच्छेदास अभिप्रेत असलेल्या कर्तव्यास जागले पाहिजे.
uttamjogdand@gmail.com