अंबानी कुटुंबातील प्रत्येक सोहळा आणि त्यांचा शाही अंदाज नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच ईशा अंबानीने दोहा येथे आयोजित फॅशन ट्रस्ट अरेबिया प्राइजच्या आठव्या सोहळ्यात आपल्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमासाठी तिने खास डिझाइन केलेला गडद तपकिरी रंगाचा गाऊन परिधान केला होता. मात्र, तिच्या या गाऊनचे सर्वाधिक आकर्षण ठरले ते त्यावर लावलेले १९० कॅरेटचे हिरे. विशेष म्हणजे हे हिरे तिची आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक दागिन्यांच्या संग्रहातील असल्याचे वृत्त आहे.
ईशाच्या या खास गाऊनवर मध्यभागी उभ्या रेषेत चमकदार हिऱ्यांची सजावट करण्यात आली होती. या हिऱ्यांचे एकूण वजन १९० कॅरेट असल्याचे सांगितले जात आहे. हे हिरे नीता अंबानी यांच्या वैयक्तिक दागिन्यांच्या संग्रहातून घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या पोशाखाला केवळ शाही रूपच नाही, तर कौटुंबिक वारशाचीही जोड मिळाली.
फॅशन समीक्षक जॅक सावोई यांच्या माहितीनुसार, या सजावटीतील सर्वांत मोठा हिरा ५२ कॅरेटपेक्षा अधिक वजनाचा आहे. यामध्ये पिअर, राउंड, हार्ट आणि एमराल्ड अशा वेगवेगळ्या आकारांतील हिऱ्यांचा समावेश आहे. गाऊनच्या वरच्या भागावर या हिऱ्यांची केलेली मांडणी विशेष लक्षवेधी ठरली.
ईशाने लंडनमधील हॉट कुट्युअर फॅशन ब्रँड 'स्टँडिंग ग्राउंड'चा हा खास गाऊन परिधान केला होता. हा गाऊन फॉल २०२६ कलेक्शनमधील एका डिझाइनपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आला होता. मखमली कापड आणि त्यावरील बारकाईने केलेली नक्षी यामुळे गाऊनला आकर्षक लूक मिळाला होता.
या गाऊनला स्ट्रॅपलेस डिझाइन देण्यात आले होते. त्याचा वरचा भाग कॉर्सेट स्टाइलमध्ये तयार केला होता, तर गळ्याची रचना कमानीच्या आकाराची होती. गाऊनचा स्कर्ट खालच्या बाजूला मोठ्या घेरात पसरलेला होता. मध्यभागी केलेल्या घड्यांमुळे त्याला उठावदार आकार मिळाला होता.
गाऊनच्या मागील बाजूला छोटा ट्रेल देण्यात आला होता. यासोबत ईशाने त्याच रंगाचे मखमली ओपेरा ग्लोव्ह्ज घातले होते. तसेच गळ्याभोवती मॅचिंग स्कार्फ घेतला होता. सेलिब्रिटी स्टायलिस्ट अँड्र्यू मुकामल यांनी ईशाचा हा संपूर्ण लूक तयार केला होता. त्यांनी २९ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर या लूकचे फोटो शेअर केले.
या कार्यक्रमात ईशा अंबानी केवळ आपल्या फॅशन लूकमुळेच चर्चेत नव्हती, तर तिने एका विशेष पुरस्काराचे वितरणही केले. तिच्या हस्ते पहिल्यांदाच 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) क्राफ्ट्समनशिप रेसिडेन्सी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वदेशच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश फॅशन क्षेत्रातील डिझायनर्सना भारतातील कुशल कारागिरांसोबत काम करण्याची संधी देणे हा आहे.
या माध्यमातून डिझायनर्सना भारतीय पारंपरिक कला, हस्तकला आणि कारागिरांचे कौशल्य जवळून शिकता येणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात ईशाच्या फॅशन लूकसोबतच भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचीही चर्चा झाली.