पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीत त्यांनी सर्वप्रथम DNI 'तुलसी गबार्ड' यांची भेट घेतली. त्यानंतर त्या कोण आहेत याची चर्चा सुरू आहे. 'तुलसी गबार्ड' या अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर (Director of National Intelligence - DNI) आहेत.'तुलसी गबार्ड' यांनी काल बुधवारी (दि.१२) अमेरिकेच्या राष्ट्रीय इंटेलिजन्स डायरेक्टर (Director of National Intelligence - DNI) म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 'तुलसी' यांचा जन्म अमेरिकेच्या सामोआ प्रदेशात झाला होता आणि बालपणाचा काही काळ हवाई आणि फिलीपिन्समध्ये गेला. त्यांनी तरुण वयात राजकारणात प्रवेश केला आणि अवघ्या २१ व्या वर्षी हवाईच्या प्रतिनिधी सभागृहात जागा जिंकली. 'FirstPost' च्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सभागृहात भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या पहिल्या हिंदू सदस्या म्हणून त्यांनी इतिहास रचला. 'तुलसी' या भारतीय वंशाच्या नाहीत तरीही त्यांचे नाव भारतीय नावाप्रमाणे का आहे याची सध्या चर्चा होत आहे. 'तुलसी' यांच्या आईने हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यांनी त्यांच्या सर्व मुलांना हिंदू नावे दिली. त्यामुळे त्यांचे नाव 'तुलसी' आहे, असे 'FirstPost' ने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची DNI म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे.