राजकीय

"निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधाल तर हेच होणार"; मतमोजणीच्या निर्णयावर रोहित पवारांचा घणाघात

मतमोजणीच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली असली तरी निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधाल तर हेच होणार, असे म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.

किशोरी घायवट-उबाळे

आज (२ डिसेंबर) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २६४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडत आहेत. अशातच, सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दर्शवली. तर, "निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधाल तर हेच होणार", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली

"राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी ही ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी एकत्रित करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली आहे. २१ डिसेंबरपर्यंत सर्वांनाच खूप काळजी घ्यावी लागणार आहे!" असे म्हणत रोहित पवार व्यक्त झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी हे विसरू नये...

आमदार रोहित पवार म्हणाले, "आज उच्च न्यायालयाने निवडणुकाचा निकाल पुढे ढकलण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर केलेलं शिक्कामोर्तबच आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली असली तरी निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधाल तर हेच होणार, हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये", असे म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.

निवडणूक आयोगासह भाजपा तेवढीच जबाबदार

"राज्यात आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजपादेखील तेवढीच जबाबदार आहे", असे म्हणत त्यांनी पक्षावर ताशेरे ओढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज

न्यायालयाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा निर्णय खंडपीठाने दिला आहे, तर तो सगळ्यांना मान्यच करावा लागेल. मी मागील २५ ते ३० वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आलो आहे. पण असं पहिल्यांदा घडत आहे की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. त्याचे निकाल पुढे चालले आहेत. ही जी काही पद्धत आहे ती योग्य वाटत नाही", असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

निकाल एकाच दिवशी होणार जाहीर

२० नगरपरिषदांमध्ये प्रलंबित न्यायप्रक्रियेमुळे मतदान उशिरा होत आहे. वेगवेगळ्या दिवशी निकाल जाहीर झाल्यास गैरसमज व गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी याचिकाकर्त्यांची भूमिका कोर्टाने मान्य केली आणि निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश कायम ठेवले. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार, आता राज्यातील सर्व नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला एकत्रितरीत्या जाहीर होतील. 

Google Drive चा ऑटो-बॅकअप बंद; फोटो-व्हिडीओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' सेटिंग्स आताच बदला

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

एल निनोमुळे किंमतवाढ; कुटुंबांना फटका बसण्याची 'एस अँड पी'ला भीती

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन