मुंबई : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील धुसफूस वाढू लागली आहे. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट हे बैठकीला उपस्थित होते. पण सेनेच्या अन्य मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारली. भाजपकडून सुरू असलेल्या पळवापळवीमुळे शिंदे सेनेत नाराजी आहे. शिंदे सेनेचे आमदार असलेल्या, वर्चस्व असलेल्या भागांमध्ये भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले.
राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आपल्या पक्षाचा वरचष्मा दाखवण्यासाठी महायुतीतच माजी आमदार, माजी नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे. उल्हासनगरमधील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि महायुतीत धुसफूस सुरू झाली. प्रत्युत्तर म्हणून डोंबिवलीतील शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात खेचून आणत शिंदे सेनेला चपराक लगावली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याआधी शिवसेना मंत्री प्री-मिटिंगला उपस्थित राहिले. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकत आपली नाराजी प्रकट केली. त्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. मात्र, आधी तुम्ही फोडाफोडीला सुरुवात केली, असे सांगत पथ्य सगळ्यांनीच पाळा, असा दम फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना भरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज्यात डिसेंबर २०२४ मध्ये महायुतीची सत्ता पुन्हा स्थापन झाली, त्यावेळेपासून भाजप विरुद्ध शिंदेसेनेत सतत वाद सुरू आहे. आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या काही माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने त्याचे पडसाद थेट मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी अचानक बहिष्कार घातला. शिंदे सेनेच्या कल्याण डोंबिवलीतील काही माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने शिंदे गटात नाराजी पसरली. केवळ याच ठिकाणी नाही, तर अन्य ठिकाणीही भाजपने शिंदे सेनेला शह देण्याचा आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करीत मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहत आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचीच उलट कानउघाडणी केली. शिंदे सेनेने भाजपच्या माजी नगरसेवकांना उल्हासनगरमध्ये आपल्या पक्षात देऊन सुरुवात केली. तुम्ही केलेले चालते, मग आम्ही केलेले का चालत नाही, आम्हालासुद्धा आमचा पक्ष वाढवायचा आहे? असे खडेबोल फडणवीस यांनी सुनावले.
भाजपचे प्रत्युत्तर
भाजपनेही या पक्ष प्रवेशास जोरदार प्रत्युत्तर देत शिंदेसेनेचे डोंबिवली येथील माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे तसेच माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला.
महायुतीतील नाराजीची कारणे
दादा भुसेंविरुद्ध अद्वय हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश, भरत गोगावलेंविरुद्ध स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शंभूराज देसाईंविरुद्ध सत्यजित पाटणकर यांना भाजपमध्ये प्रवेश, किशोर आप्पा पाटीलविरुद्ध वैशाली सूर्यवंशी यांना भाजप प्रवेश, महेंद्र दळवींविरुद्ध सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश, संजय शिरसाटांविरुद्ध राजू शिंदे यांना भाजपात प्रवेश दिला जाणार आहे.
अशी झाली नाराजीला सुरुवात
भाजपच्या उल्हासनगर येथील सहा माजी नगरसेवकांना शिंदे सेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला. यामध्ये किशोर वनवारी, मीना सोंडे यांना थेट शिवसेना शिंदे गटात, तर शिंदे सेनेची युती असलेल्या टीम ओमी कल्याणी यांच्या गटात जमनु पुरसवाणी, प्रकाश मखिजा, महेश सुखरानी, चार्ली परवानी यांना प्रवेश देण्यात आला. तसेच डोंबिवली येथील विकास म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती, कविता म्हात्रे या माजी नगरसेवकांना शिंदे सेनेत पक्षप्रवेश देण्यात आला.
यापुढे दोन्ही पक्ष फोडाफोडी टाळणार
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून मंत्र्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर यापुढे एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देणे टाळावे. दोन्ही पक्षांनी ही पथ्य पाळली पाहिजेत. त्यामुळे यापुढे कोणालाही पक्ष प्रवेश देऊ नये, असा तोडगा निघाला असून हा प्रश्न येत्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल, असे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.
आज परत कोणीतरी गावी जाणार - आदित्य ठाकरे
यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिंदे सेनेवर जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवेफुगवे सांभाळायला नाहीत. कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाय - अजित पवार
प्रत्येक जण आपापले पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रमाण निवडणुकीच्या काळात वाढलेले असते. तिकिटे देण्याच्या निमित्ताने त्यात वाढ होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली.