राजकीय

विधान परिषदेत महायुतीतच रंगणार सामना! मनसे, राष्ट्रवादी मैदानात; भाजपचाही दावा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लढत पाहायला मिळणार आहे.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून, शिवसेना ठाकरे गटाने काही उमेदवार जाहीर केले. मात्र, दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्षही कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीत समन्वय दिसत नाही. कारण मनसेने आधीच कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजीराव नलावडे यांना मैदानात उतरविले आणि याच जागेवर भाजपनेही दावा ठोकला असून, या मतदारसंघात शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनीही निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

राज्यात मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई, पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ या चार ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीत एकत्र आलेले मित्रपक्षच आता वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी या सर्व हालचालींवर बारकाव्याने नजर ठेवून आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून अ‍ॅड. अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यातच महायुतीतही या निवडणुकीवरून मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मनसेने महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा न करता कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. खरे तर ही भाजपची हक्काची जागा आहे. या ठिकाणी भाजपचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने येथे निवडणूक लागली आहे. या ठिकाणाहून पुन्हा डावखरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु मनसेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने लोकसभेनंतर मनसे आता वेगळा मार्ग स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघातही अशीच स्थिती झाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. कारण मागच्या १८ वर्षांपासून संजीवनी रायकर भाजपच्या पाठिंब्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हीदेखील हक्काची जागा आहे. परंतु येथे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने येथून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु येथे आता अनिल बोरनारे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी गेल्या ४ वर्षांपासून तयारी केली असून, ते शिक्षकांच्या प्रश्नांच्या निमित्ताने सतत शिक्षकांत राहणारे आणि भाजपच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे बोरनारे इच्छुक

एक शिक्षक या नात्याने आपण गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न सोडवित आलो आहे. त्यामुळे मला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून शिक्षकांचे प्रश्न धसास लावण्याचे काम मी केले. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ वर्षांपासून मतदारसंघाच्या बांधणीच्या दृष्टीने काम केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, या जागेवरूनही महायुतीत बेबनाव झाल्याने मित्रपक्षांतच सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी