न्यूयॉर्क : एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने यंदाच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंतचे दोन्ही सामने कडव्या संघर्षानंतर जिंकले आहेत. आता सोमवारी न्यूयॉर्कच्या नासाउ कौंटी क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या लढतीत आफ्रिकसमोर बांगलादेशचे आव्हान असेल. उभय संघांतील या लढतीत ड-गटात अग्रस्थान पटकावण्यासाठी जुगलबंदी पाहायला मिळेल.
आफ्रिकेने असंख्य तारांकित खेळाडूंचा भरणा असूनही अद्याप एकदाही टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठलेली नाही. यंदा त्यांना ही कामगिरी करण्याची उत्तम संधी आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेवर मात केली, तर दुसऱ्या लढतीत नेदरलँड्सवर अथक परिश्रमानंतर सरशी साधली. आफ्रिका सध्या ड-गटात २ सामन्यांतील २ विजयांच्या ४ गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यामुळे सोमवारी विजयी हॅट्ट्रिक साकारण्यासह सुपर-८ फेरीतील स्थान पक्के करण्याचा आफ्रिकेचा मानस असेल.
क्विंटन डीकॉक, हेनरिच क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर असे प्रतिभावान फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. विशेषतः मिलरने नेदरलँड्सविरुद्ध झुंजार खेळी साकारली. तसेच वेगवान गोलंदाजी हे आफ्रिकेचे प्रमुख अस्त्र आहे. आनरिख नॉर्किए, कॅगिसो रबाडा, मार्को यान्सेन, ओटनिल बार्टमन ही वेगवान चौकडी कोणत्याही खेळपट्टीवर धमाल करू शकते. फिरकीपटू केशव महाराज आफ्रिकेसाठी मधल्या षटकांत छाप पाडत आहे. त्यामुळे आफ्रिकेचे पारडे निश्चितच जड आहे.
दुसरीकडे नजमूल होसेन शांतोच्या नेतृत्वाखाली खेळताना बांगलादेशने पहिल्या लढतीत श्रीलंकेला धूळ चारली. आता आफ्रिकेला धक्का देत बांगलादेश अग्रस्थानासाठी दावेदारी पेश करू शकते. सध्या ते गटात दुसऱ्या स्थानी आहेत. बांगलादेशलासुद्धा अद्याप एकदाही विश्वचषकाची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे ते यंदा काही चमत्कार करणार का, हे पहावे लागेल.
फलंदाजीत तांजिद हसन, शाकिब अल हसन, महमदुल्ला रियाद यांच्यावर प्रामुख्याने बांगलादेश अवलंबून आहे. तसेच मुस्तफिझूर रहमान व शोरीफुल इस्लाम या वेगवान जोडीकडून त्यांना अपेक्षा आहेत. कागदावर तरी आफ्रिकेचा संघ बलवान असला तरी बांगलादेश त्यांना नक्कीच धक्का देऊ शकते. अशा स्थितीत चाहत्यांना नक्कीच रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.
वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी