PTI
क्रीडा

Vinesh Phogat: ‘त्या’ सर्वांवर कारवाई करावी! कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांची मागणी

Paris Olympics 2024: विनेश फोगटच्या वजनाशी संबंधित असणाऱ्या सपोर्ट स्टाफमधील ‘त्या’ सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्याचा निर्णय धक्कादायक असून अंतिम फेरीसाठी तिचे वजन नियंत्रणात न आणणे ही सर्वात मोठी घोडचूक आहे. त्यामुळे विनेश फोगटच्या वजनाशी संबंधित असणाऱ्या सपोर्ट स्टाफमधील ‘त्या’ सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी केली आहे.

अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँड हिच्याविरुद्धच्या अंतिम लढतीआधी भारतीयांसाठी धक्कादायक बातमी आली. विनेश फोगटचे वजन ५० किलोच्या मर्यादेपेक्षा १०० ग्रॅमने जास्त आले. त्यामुळे तिला संपूर्ण स्पर्धेतूनच अपात्र ठरवण्यात आले. विनेशही तिचे बेल्जियमचे वैयक्तिक प्रशिक्षक वुलर अकॉस आणि दक्षिण आफ्रिकेचे मेंटल कंडिशनिंग कोच वेन लोम्बार्ड यांच्यासोबत प्रशिक्षण घेत होती.

“यात विनेशची काहीच चूक नाही. तिने आपले काम चोखपणे पार पाडले होते. प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, आहारतज्त्र या सर्वांनी या घोडचुकीची जबाबदारी घेतली पाहिजे. असे काय घडू नये, याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी होती. एका दिवसात विनेशचे वजन कसे काढू शकते?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“विनेशचं वजन दोन दिवस स्थिर होते. मात्र रातोरात तिचे वजन वाढले. तिचे वजन कशामुळे वाढले, ते केवळ तिचे प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञच सांगू शकतात. आम्ही याप्रकरणी काही कायदेशीर उपाययोजना करू शकतो का? याची चाचपणी करत आहोत. भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा पॅरिसमध्येच आहेत. आम्ही त्यांच्याशीदेखील चर्चा करत आहोत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जागतिक संयुक्त कुस्ती संघटनेसमोर कोणकोणते मुद्दे उपस्थित करता येतील यावर आम्ही चर्चा करत आहोत.”

“आता याप्रकरणी कार्यवाहीची पुढची दिशा काय असेल, याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाची समिती घेणार आहे. आम्ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. तसेच काय करता येईल का, याबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे प्रमुख नेनाद लॅलोव्हिच यांच्याशीही चर्चा करणार आहोत. आम्ही याप्रकरणी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाशी बोललो असून तिला अंतिम फेरीत खेळण्याची संधी देण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहारसुद्धा केला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी