शारजा : रहमनुल्ला गुरबाझने (९४ चेंडूंत ८९ धावा) साकारलेल्या धडाकेबाज खेळीनंतरही अफगाणिस्तानला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पहिल्या दोन लढतींमध्ये मिळवलेल्या विजयाच्या बळावर अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलावहिला ऐतिहासिक मालिका विजय साकारला. आफ्रिकेने तिसऱ्या लढतीत ७ गडी राखून सरशी साधली, मात्र मालिकेत अफगाणिस्तानने २-१ अशी बाजी मारली.
शारजा येथे झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ ३४ षटकांत १६९ धावांत गारद झाला. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या गुरबाझने यावेळी ७ चौकार व ४ षटकारांसह ८९ धावा फटकावल्या. मात्र अँडीले फेहलुकवायो आणि लुंगी एन्गिडी यांच्या भेदक माऱ्यापुढे अन्य फलंदाज निष्प्रभ ठरले. कर्णधार हश्मतुल्ला शाहिदी (१०), अझमतुल्ला ओमरझाई (२), मोहम्मद नबी (५), रहमत शाह (१) यांनी निराशा केली.
त्यानंतर आफ्रिकने ३३ षटकांतच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. कर्णधार तेम्बा बव्हुमा (२२), टॉनी डी झॉर्झी (२६) यांनी सावध सुरुवात केली. मात्र एडीन मार्करम (नाबाद ६९) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद २६) यांनी चौथ्या विकेटसाठी ९० धावांची अभेद्य भागीदारी रचून विजय साकारला. गुरबाझ सामनावीर तसेच मालिकावीर ठरला.
अशी रंगली मालिका
पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी (४ बळी) व फिरकीपटू मोहम्मद गझनफर (३ बळी) यांच्यामुळे अफगाणिस्तानने आफ्रिकेला १०६ धावांत गुंडाळले. मग २६ षटकांत लक्ष्य गाठून लढत जिंकली.
दुसऱ्या सामन्यात गुरबाझचे (१०५) शतक आणि राशिद खानच्या पाच बळींच्या जोरावर अफगाणिस्तानने बाजी मारून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ३१२ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १३४ धावांत आटोपला.