मुंबई : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्सने मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर २१ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० मुंबई लीगमध्ये आपल्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली. हार्दिक तामोरे आणि आयुष वर्तक यांनी चमकदार कामगिरी केली.
२१० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य गाठताना बदली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) म्हणून मैदानात उतरलेल्या नूतन गोयलने ५६ चेंडूंमध्ये झुंजार ९३ धावा करून डावाला आधार दिला, तरीही नाइट्स संघाला आवश्यक धावगतीशी जुळवून घेणे कठीण जात होते. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने पाठलागाची सुरुवात डळमळीत झाली. त्यानंतर वानखेडेच्या प्रेक्षकांच्या जोरदार जल्लोषात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव क्रीजवर आला. सूर्यकुमारने सकारात्मक दृष्टिकोनाने चार चौकार मारले आणि पॉवरप्लेच्या अखेरीस नाइट्स संघाने ५६/२ अशी धावसंख्या उभारली.
मात्र, डावखुरा फिरकी गोलंदाज राहुल सावंतने सूर्यकुमारला १९ धावांवर बाद केले. मग सागर मिश्राला बाद करून सामन्याचे पारडे पँथर्सच्या बाजूने फिरवले. हर्षल जाधव आणि नूतन यांनी पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तर २० वर्षीय नूतनने २४ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत सलग दोन षटकारांसह ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण आवश्यक धावगती सातत्याने वाढत असल्याने, नाईट्स संघाला बरोबरी साधणे कठीण जात होते आणि अखेरीस त्यांचा डाव ८ बाद ११८ धावांवर संपला.
तत्पूर्वी, तामोरेने फलंदाजीत चमक दाखवत स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक झळकावले आणि पँथर्सला या हंगामातील पहिली २००हून अधिक धावसंख्या उभारण्यास मदत केली. सपाट खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीसाठी पाठवलेल्या पँथर्सने रहाणे (२४) आणि तामोरे यांच्या जोरावर दमदार सुरुवात केली, ज्यांनी पॉवरप्लेमध्ये सलामीच्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या.
रहाणे वेगवान सुरुवातीनंतर बाद झाला, तर तामोरने खेळ पुढे चालू ठेवत ४३ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांसह शानदार ६७ धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये आयुष झिमारे (२३) आणि आयुष वर्तक (३९) यांनी धावफलक पुढे नेला, त्यानंतर तनुष कोटियनने अखेरच्या षटकांमध्ये केवळ १५ चेंडूंमध्ये नाबाद ३० धावा करून धावसंख्येला गती दिली आणि पँथर्सला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.
दरम्यान, १९९ रुपयांपासून सामन्याची तिकीटे उपलब्ध असून सर्व सामने जिओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.
पहिल्याच दिवशी सुपर ओव्हर
सोमवारी रात्री पुरुषांच्या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब आणि मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. यामध्ये सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील रॉयल्सने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. दोन्ही संघांनी आपापल्या २० षटकांत १६५ धावांवर बरोबरी साधल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, जिथे गतविजेत्या रॉयल्सने १ बाद १६ धावा करून सरफराज खानच्या नेतृत्वाखालील टायगर्सला ११ धावांवर रोखले. १ ते १३ जून या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत ३० सामन्यांचा थरार चाहत्यांना अनुभवता येईल.