नवी दिल्ली : इंग्लंडचा निवृत्त वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसू शकतो. सौदी अरेबियातील जेद्दा येथे २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘आयपीएल’ लिलावासाठी १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली असून यात ४२ वर्षीय अँडरसनचा समावेश आहे. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने मात्र लिलावासाठी नाव नोंदवलेले नाही. त्यामुळे तो आगामी हंगामाला मुकणार आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे भारताच्या सर्वच आघाडीच्या खेळाडूंचा लिलाव यादीत समावेश आहे.
लिलावासाठी १५७४ खेळाडूंनी आपली नावे नोंदवलेली असली, तरी सर्व फ्रँचायझींशी चर्चा केल्यानंतर यातील बरीचशी नावे वगळण्यात येतील. ‘आयपीएल’मधील सर्व १० फ्रँचायझींनी काही दिवसांपूर्वीच काही खेळाडूंना संघात कायम ठेवले होते, तर अन्य खेळाडूंना संघमुक्त केले होते. संघमुक्त करण्यात आलेले ऋषभ पंत, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांसारखे आघाडीचे भारतीय खेळाडू लिलावादरम्यान उपलब्ध असतील. मुंबईकर फलंदाज सर्फराज खानला गेल्या हंगामात कोणत्याही संघाने संधी दिली नव्हती. मात्र, कसोटी पदार्पण केल्यापासून त्याने काही चांगल्या खेळी केल्या आहे. त्यामुळे ‘आयपीएल’च्या आगामी हंगामात त्याचे पुनरागमन होऊ शकेल.
तसेच मूळचा भारतीय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेकडून चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरही ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसू शकेल. वेगवान गोलंदाज थॉमस ड्रागा हा ‘आयपीएल’ लिलावासाठी नाव नोंदवणारा इटलीचा पहिला खेळाडू ठरला आहे. याच वर्षी जूनमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
१.२५ कोटी अँडरसनची मूळ किंमत
अँडरसनची क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याने १८८ सामन्यांत ७०४ बळी मिळवले. मात्र, तो बऱ्याच काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहे. अँडरसनने अखेरचा टी-२० सामना १० वर्षांपूर्वी खेळला होता. आता त्याने ‘आयपीएल’ लिलावासाठी प्रथमच आपले नाव नोंदवले आहे. त्याची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये असणार आहे. ४२ वर्षीय अँडरसनला ‘आयपीएल’ पदार्पणाची संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र स्टोक्सच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांची निराशा झाली आहे.