क्रीडा

अश्विन @500

अश्विन मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिला. वेगवान क्रिकेटमुळे त्याने एकदिवसीय व टी-२० संघातील स्थान गमावले.

Swapnil S

- ऋषिकेश बामणे

तामिळनाडूच्या एका सुशिक्षित कुटुंबात जन्मलेला मुलगा इंजिनिअरिंगच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करून जेव्हा पूर्णपणे क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. मात्र तसे झाले नसते, तर कदाचित भारतीय संघ एक महान क्रिकेटपटू किंबहुना त्यापेक्षाही चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाला मुकला असता, हेच खरे. हा क्रिकेटपटू म्हणजे दुसरा कोणी नसून भारताचा ३७ वर्षीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन. एकेकाळी सलामीवीर म्हणून क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात करणारा अश्विन आज फिरकीतील साम्राज्याच्या बळावर ‘ऑल टाइम ग्रेट’ खेळाडूंच्या पक्तींत विराजमान झाला आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

३७ वर्षीय अश्विनने शुक्रवारी ९८व्या सामन्यात कसोटी कारकीर्दीतील ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. इंग्लंडचा झॅक क्रॉली अश्विनचा ५००वा शिकार ठरला. गेली १३ वर्षे क्रिकेटच्या अंतराळात सक्षमपणे चमकणाऱ्या अश्विनने २०११मध्ये क्रिकेटच्या सर्वाधिक आव्हानात्मक प्रकारात पदार्पण केले. अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांसारख्या महारथींची पोकळी भरून काढण्याची जबाबदारी या २५ वर्षीय मुलावर सोपवण्यात आली होती. एकदिवसीय व टी-२०मध्येही तो तितकाच प्रभावी होता. २०११चा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात त्याचेही थोडेसे का होईना, पण योगदान होते. मात्र कसोटीतील यश हे सर्वांना दीर्घकाळ स्मरणात राहते. त्यामुळे या पटलावर जो चमकतो, तोच खरा क्रिकेटपटू, असा समज पूर्वीपासूनच रूढ आहे. आपल्या कामगिरीच्या बळावर एका तपाहून अधिक काळ हा अवलिया कसोटी प्रकारात प्रतिस्पर्ध्यांना फिरकीच्या तालावर नाचवत आहे.

मुख्य म्हणजे अश्विनची तुलना नेहमीच समकाळातील अन्य फिरकीपटूंशी करण्यात आली. विशेषत: विदेशातील खेळपट्ट्यांवर डावलण्यात आल्याने अनेकदा त्याच्या कौशल्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गोलंदाजी शैलीत केलेला बदल त्याला महागात पडला. यामुळे अश्विनची कारकीर्द लवकरच संपुष्टात येईल, असे भाकीतही तज्ज्ञांनी वर्तवले. २०१६मध्ये आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या अश्विनला त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळेही काहींनी विरोध केला. क्रिकेटशी निगडीत कोणताही नियम अथवा गोलंदाजांवर होणारा अन्याय, याविरोधात अश्विनने नेहमीच आवाज उठवला. त्याच्या ‘मंकडिंग’ प्रकरणाची चर्चा आजही क्रिकेटप्रेमींमध्ये रंगते. क्रीडा विश्वात कुठे काय घडते आहे, याकडे अश्विनचे बारीक लक्ष असते. त्यामुळे समाज माध्यमांवर त्याचे ट्वीट वाचण्यात तसेच विविध मुद्द्यांविषयीचे व्हिडीयो पाहण्यात वेगळीच मजा आहे. एकेकाळी चाहत्यांना न आवडणाऱ्या याच अश्विनला २०२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीत भारतीय संघाबाहेर ठेवण्यात आले, तेव्हा त्याच्या पाठिराख्यांसह विरोधकांनाही वाईट वाटले असावे. त्यावेळी अश्विन जागतिक गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता, हे विशेष.

अश्विन मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिला. वेगवान क्रिकेटमुळे त्याने एकदिवसीय व टी-२० संघातील स्थान गमावले. मात्र आयपीएलमध्ये तो गरजेनुसार खेळात बदल करत राहिला. २०२३च्या विश्वचषकात त्याला संधी लाभली तेव्हा भारताचा संघ परिपूर्ण झाला, अशी भावनाही चाहत्यांनी व्यक्त केली. गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही अश्विन वेळोवेळी योगदान देत राहिला. कदाचित यामुळेच कसोटीत ३,००० धावा व ५०० बळी अशी कामगिरी करणारा तो भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे.

अश्विनची तंदुरुस्ती व खेळण्याची जिद्द पाहता तो आणखी २ ते ३ वर्षे सहज क्रिकेट खेळेल, असे वाटते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, अनिल कुंबळेच्या ६१९ बळींच्या विक्रमापासून तो अद्याप दूर असला तरी हे साध्य करणे त्याच्यासाठी अशक्य मुळीच नाही. तूर्तास मात्र अश्विन असाच फलंदाजांना जाळ्यात अडकवत राहो व त्याने भारताला २०२५मध्ये कसोटीचे जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान द्यावे, इतकीच अपेक्षा.

९८ सर्वात वेगवान ५०० कसोटी बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अश्विनने दुसरे स्थान मिळवले. अश्विनने ९८ कसोटींमध्ये, तर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने अवघ्या ८७ कसोटींत ५०० गडी बाद केले होते.

९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा अश्विन हा एकंदर नववा गोलंदाज आहे. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन, अनिल कुंबळे, स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅकग्रा, कर्टनी वॉल्श, नॅथन लायन यांनी असा पराक्रम केला आहे.

३४६ अश्विनने मिळवलेल्या ५०० बळींपैकी ३४६ बळींचा भारताच्या विजयात हातभार लागला आहे. त्याने कारकीर्दीत जेव्हा-जेव्हा डावात पाच बळी मिळवले आहेत, तेव्हा भारताने एकही लढत गमावलेली नाही.

अश्विन हा भारतासाठी ५०० कसोटी बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळेने (६१९ बळी) अशी कामगिरी केली आहे.

माझे यश मी वडिलांना समर्पित करतो. पहिल्या सामन्यापासून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मी सध्या ३७ वर्षांचा आहे. त्यामुळे कुंबळेच्या ६१९ बळींचा पाठलाग करण्याचा विचारही मी केलेला नाही. ५०० बळींचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे याविषयी चर्चा करणे थांबवा. भारतासाठी १२ वर्षांहून अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, यातच मी स्वत:ला धन्य मानतो.

- रविचंद्रन अश्विन

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी