दुबई : बहुप्रतीक्षित आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचा थरार अखेर मंगळवारपासून चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत यंदा प्रथमच ८ संघ आशियातील वर्चस्वासाठी भिडणार आहेत. त्यामुळे गतविजेत्या भारतापुढे यावेळी जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग लढतीने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. रविवार, १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना मिळायला मिळेल.
भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी सर्व सामने अमिरातीतील दुबई व अबुधाबी येथे होतील. गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडले असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात भारताच्या अनेक नागरिकांचा बळी गेला. त्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशीही मागणी काहींनी केली होती. मात्र आशिया चषक तसेच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान लढती होत राहतील. फक्त या लढती भारत किंवा पाकिस्तानात होणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
त्यामुळेच भारत-पाकिस्तान यांनी आयसीसीशीसुद्धा करार केला. २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीशी केलेल्या करारानुसार पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. तसेच भारतही कोणत्याही सामन्यासाठी पाकिस्तानात जात नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळला. तसेच आता संपूर्ण स्पर्धा अमिरातीत होणार आहे. २०२७ पर्यंत हा करार कायम असेल.
दरम्यान, आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत. त्यामुळे एकूणच आता आशिया चषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आशिया चषकाच्या इतिहासावर एक नजर
१९८४पासून आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया चषकाचे यंदा १७वे पर्व आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, या हेतूने यंदा टी-२० प्रकारात आशिया चषक खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक ८ वेळा ही स्पर्धा जिंकली असून श्रीलंका ६ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने दोन वेळा जेतेपद मिळवले आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा टी-२० स्वरूपात ही स्पर्धा होत आहे. त्यावेळी श्रीलंकेने जेतेपद पटकावले होते, तर २०२३मध्ये एकदिवसीय स्वरूपात झालेल्या आशिया चषकात भारताने बाजी मारली. २०१६ व २०२२ नंतर एकंदर तिसऱ्यांदा ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप कसे?
-यंदा या स्पर्धेत प्रथमच ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ओमान देश प्रथमच आशिया चषकात सहभागी होत आहे.
-प्रत्येक संघ साखळी फेरीत ३ सामने खेळणार असून दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ सुपर-फोर फेरीसाठी पात्र ठरतील.
-सुपर-फोर फेरीत प्रत्येक संघ पुन्हा ३-३ लढती खेळेल. त्यानंतर आघाडीचे दोन संघ थेट २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
-स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. दुपारची लढत असल्यास ५.३० वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स वाहिन्यांवर तसेच सोनी लिव्ह अॅपवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
तीन वेळा भारत-पाकिस्तान लढत?
यंदाच्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरुद्ध उभे ठाकू शकतात. १४ सप्टेंबरला साखळी लढत झाल्यावर भारत-पाकिस्तान या दोघांनीही अ-गटातून आगेकूच केली, तर २१ सप्टेंबरला सुपर-४ लढतीत ते पुन्हा आमनेसामने येतील. तसेच या दोघांनीही अंतिम फेरी गाठली, तर रविवार, २८ सप्टेंबरला चाहत्यांना पुन्हा भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. एकूणच हे सर्व दोन्ही संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
हाँगकाँगविरुद्ध अफगाणिस्तानचे पारडे जड
आशिया चषकातील अबूधाबी येथे होणाऱ्या सलामीच्या सामन्यात रशिद खानच्या नेतृत्वात खेळणारा अफगाणिस्तानचा संघ हाँगकाँगशी दोन हात करेल. हाँगकाँगने आजवर आशिया चषकात एकही लढत जिंकलेली नाही. ते पाचव्यांदा या स्पर्धेत खेळतील. फिरकीला पोषक खेळपट्टीवर अफगाणी खेळाडू वर्चस्व गाजवू शकतात. रशिद, अल्लाह गझनफर व मोहम्मद नबी यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल.
आशिया चषकाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक