BCCI Twitter
क्रीडा

Asia Cup Cricket Tournament: भारत थाटात उपांत्य फेरीत! महिला संघाचे यूएईवर ७८ धावांनी वर्चस्व; रिचा, हरमनप्रीतची आक्रमक अर्धशतके

भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७८ धावांनी धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या विजयासह भारताने अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

दाम्बुला : यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने २९ चेंडूंतच साकारलेल्या नाबाद ६४ धावांच्या आक्रमक खेळीला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (४७ चेंडूंत ६६) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७८ धावांनी धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या विजयासह भारताने अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दाम्बुलाच्या रणगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना अमिरातीला २० षटकांत ७ बाद १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने पहिल्या लढतीत पाकिस्तानला ७ गडी राखून धूळ चारली होती. दोन विजयांच्या ४ गुणांसह भारतीय संघ गटात अग्रस्थानी असून त्यांची धावगती (३.३८६) गटातील अन्य तीन संघांच्या तुलनेत फार सरस आहे. त्यामुळे भारताने २३ जुलै रोजी नेपाळविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या साखळी सामन्यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २० वर्षीय रिचाला अमिरातीविरुद्ध सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्मृती मानधना (१३), दयालन हेमलता (२) स्वस्तात बाद झाले. मात्र शफालीने १८ चेंडूंक ३७ धावांची दमदार सुरुवात केली. तीसुद्धा बाद झाल्यावर भारतीय संघ ३ बाद ५२ असा संकटात होता. मात्र हरमनप्रीत व जेमिमा रॉड्रिग्ज (१४) यांनी चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. जेमिमा बाद झाल्यावर हरमनप्रीत व रिचा यांची जोडी जमली.

दोघींनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचताना गोलंदाजांची धुलाई केली. हरमनप्रीतने ७ चौकार व १ षटकारासह १२वे अर्धशतक साकारले. तर रिचाने पहिलेच टी-२० अर्धशतक झळकावताना १२ चौकार व १ षटकार लगावला. हरमनप्रीत अखेरच्या षटकात बाद झाली. मात्र रिचाने नाबाद राहून संघाला २० षटकांत ५ बाद २०१ धावांचा डोंगर उभारून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना कविशा गोडगे (नाबाद ४०) आणि कर्णधार इशा ओझा (३८) यांच्याव्यतिरिक्त अमिरातीचे फलंदाज झुंज देऊ शकले नाहीत. फिरकीपटी दीप्ती शर्माने दोन, तर पूजा वस्त्रकार, रेणुका सिंग, पदार्पणवीर तनुजा कन्वर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यामुळे अमिरातीला १२३ धावांत रोखण्यात भारताला यश आले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ५ बाद २०१ (रिचा घोष नाबाद ६४, हरमनप्रीत कौर ६६; कविशा गोडगे २/३६) विजयी वि.

संयुक्त अरब अमिराती : २० षटकांत ७ बाद १२३ (कविशा गोडगे नाबाद ४०, इशा ओझा ३८; दीप्ती शर्मा २/२३)

सामनावीर : रिचा घोष ( २९ चेंडू, १२ चौकार, १ षटकार)

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी