Asian Games 2026 : क्रिकेट, हॉकीमध्ये दुहेरी सुवर्णपदकाची संधी! 
क्रीडा

Asian Games 2026 : क्रिकेट, हॉकीमध्ये दुहेरी सुवर्णपदकाची संधी!

आशियाई क्रीडा स्पर्धेतील १२व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारताला सोनेरी यशाने हुलकावणी दिली. दिवसभरात भारताने २ रौप्य व ४ कांस्यपदके जिंकली. मात्र त्यापेक्षा हॉकी आणि क्रिकेटमध्ये भारताने मिळवलेल्या विजयाची अधिक चर्चा आहे. दोन्हीकडे भारताला दुहेरी सुवर्णपदक काबिज करण्याची संधी आहे.

Swapnil S

आशियाई क्रीडा स्पर्धेतील १२व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारताला सोनेरी यशाने हुलकावणी दिली. दिवसभरात भारताने २ रौप्य व ४ कांस्यपदके जिंकली. मात्र त्यापेक्षा हॉकी आणि क्रिकेटमध्ये भारताने मिळवलेल्या विजयाची अधिक चर्चा आहे. दोन्हीकडे भारताला दुहेरी सुवर्णपदक काबिज करण्याची संधी आहे. एकीकडे पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानवर सरशी साधून अंतिम फेरी गाठली, तर पुरुषांच्या क्रिकेट संघाने श्रीलंकेचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत धडक मारली. त्याशिवाय सेलिंग, तिरंदाजी व स्क्वॉशमध्ये भारताने कांस्यपदके पटकावली. त्यामुळे पदकतालिकेत सध्या आठव्या स्थानी असलेल्या भारताच्या खात्यात १० सुवर्ण, २३ रौप्य, ३३ कांस्य अशी ६६ पदके जमा आहेत.

क्रिकेट - किशनची कमाल, श्रीलंकेचा फडशा

निशिन : कठीण आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इशान किशनने साकारलेल्या ४६ चेंडूंतील नाबाद ८० धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर गतविजेत्या भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी फडशा पाडला. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट विभागात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी होणाऱ्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. भारतीय महिला संघाने आधीच सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे आता पुरुष संघही त्यांचा कित्ता गिरवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत ७ बाद १६९ धावा केल्या. किशनसोबत वैभव सूर्यवंशीने २१ चेंडूंत ३८ धावांची आक्रमक खेळी करत भारताच्या डावाला गती दिली. मात्र, त्याच्या आणि अभिषेक शर्माच्या विकेट्सनंतर कर्णधार श्रेयस अय्यर व अक्षर पटेलही स्वस्तात बाद झाले. त्यानंतर इशान किशनने डावाची सूत्रे हाती घेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध थेट फटके खेळले. त्याने सहा षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा केल्या.

१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले, तर अक्षर पटेलनेही दोन गडी बाद रकून श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेची अवस्था ६ बाद ३१ अशी झाली. अखेर संपूर्ण संघ ९.५ षटकांत अवघ्या ४५ धावांत बाद झाला. कसोटी खेळणाऱ्या संघाचा हा संयुक्तपणे सर्वात कमी टी-२० आंतरराष्ट्रीय धावसंख्या ठरली. २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजचाही संघ ४५ धावांत बाद झाला होता. एकूणच भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले.

अंतिम फेरीत पाकिस्तानशी गाठ

शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी भारताचा अंतिम सामना पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. श्रीलंका कांस्यपदकासाठी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलन होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर मात्र दोन्ही संघांना पदक वितरणाच्या वेळी पोडियमवर एकत्रित उभे रहावे लागू शकते.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाला सलग दुसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. २०२२मध्येदेखील भारताने सुवर्ण जिंकले होते. तसेच यंदा महिला संघानेही आधीच सुवर्ण पटकावले आहे. त्यामुळे पुरुषांकडेही आता लक्ष असेल.

एकूण पदके ६६

भारताने गुरुवारी दिवसभरात सहा पदकांची कमाई केली. यामध्ये २ रौप्या, ४ कांस्यपदकांचा समावेश होता. सध्या १० सुवर्ण, २३ रौप्य, ३३ कांस्य अशा एकूण ६६ पदकांसह भारत पदकतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. दोन दिवसांपूर्वी भारत १२व्या स्थानी होता.

हॉकी - पाकिस्तानवर रोमहर्षक विजय

काकामिगाहारा : अभिषेक नैनने सामना संपायला अवघे ४५ सेकंद असताना निर्णायक चौथा नोंदवला. त्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील रोमहर्षक उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-३ अशी सरशी साधून अंतिम फेरीत धडक मारली. गतविजेत्या भारताला आता सलग दुसऱ्यांदा आशियाई सुवर्ण जिंकण्याची संधी असून शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाअंतिम लढतीत भारताची मलेशियाशी गाठ पडणार आहे. त्यामुळे भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही हॉकी संघांना सुवर्णपदकाची संधी आहे.

२०२८च्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरण्याचा मान आशियाई स्पर्धेतील सुवर्ण विजेत्याला मिळतो. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने साखळी फेरीत अपराजित राहण्याची कामगिरी केली. त्यांनी अ-गटातील पाचही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतही भारताचेच पारडे जड मानले जात होते. पाकिस्तानने अन्य गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली होती. त्यांनी भारताला उपांत्य लढतीत कडवी झुंज दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने चेंडूवर ताबा राखला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने पाचव्या आणि १३व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नरचे गोल केले. सुखजीत सिंगने २३व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी ३-० अशी मजबूत केली. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केले. पाकिस्तानकडून अबू महमूदने ३०व्या, हन्नान शाहिदने ४५व्या आणि वहीद राणाने ४९व्या मिनिटाला गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. भारताची आघाडी धोक्यात आली होती आणि सामना पेनल्टी शूटआऊटकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. भारतावर दबाव वाढत असतानाच अखेरच्या क्षणी अभिषेकने गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या फटक्याला पाकिस्तानच्या सुफियानचा स्पर्श झाल्याने चेंडू गोलरक्षक अली रझाला चकवत जाळ्यात गेला.

पहिल्या सत्रात भारताने आक्रमक खेळ केला. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून दोन अचूक गोल केले, तर सुखजीतने शिलानंद लाक्राच्या अचूक पासवर गोल केला. मात्र, मध्यंतराच्या अवघ्या ३५ सेकंद आधी पाकिस्तानने गोल करत सामन्यात चुरस निर्माण केली. दुसऱ्या सत्रात भारताचा खेळ मंदावला. मध्यफळीवरील नियंत्रण गमावल्याने पाकिस्तानच्या आक्रमक खेळाडूंना संधी मिळाली. शाहिदने ४५व्या मिनिटाला गोल करत फरक २-३ असा कमी केला. त्यानंतर राणाने गोल करून सामना बरोबरीत आणला होता.

तीन गोलांची आघाडी गमावल्यानंतर झालेल्या या संघर्षातून भारताला आपल्या बचावफळी आणि मध्यफळीतील चुका सुधारण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनीही हे मान्य केले. “मला दिलासा मिळाला आहे. ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर सामना ३-३ असा बरोबरीत येणे आणि मग ४-३ ने जिंकणे, या गोष्टीवर पूर्णपणे समाधानी राहता येत नाही. मी आनंदी आहे, पण ही कामगिरी आदर्श नव्हती,” असे फुल्टन म्हणाले.

भारतीय पुरुषांना सलग दुसऱ्यांदा सुवर्ण जिंकून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. २०२२मध्ये भारताने जपानला अंतिम फेरीत धूळ चारली होती. भारताने एकंदर चार वेळा आतापर्यंत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

महिलांचा आज चीनशी अंतिम सामना

भारतीय महिला हॉकी संघाचा शुक्रवारी होणाऱ्या महाअंतिम लढतीत चीनशी मुकाबला होईल. बुधवारी दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ४४ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकण्यापासून भारत अवघा एक पाऊल दूर आहे. चीनने दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानचा शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला होता. २०२२मध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर चीनने त्यावेळीदेखील सुवर्ण जिंकले होते. त्यामुळे भारत त्यांना रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल. स्पर्धेत सर्वाधिक २१ गोल करणाऱ्या दीपिका सेहरावतची कामगिरी निर्णायक ठरेल.

वेळ : दुपारी ३.३० वाजता थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३ वाहिनी

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

Pune : ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

'त्या' पायलटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव

Mumbai : फ्री प्रेस मार्गावर दुसऱ्या दिवशीही कारवाई; पालिका पथकाने १५ हून अधिक फेरीवाल्यांना हटवले

पार्थ पवार आरोपी का नाहीत? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल